आपल्याला नवी गोष्ट कायमच आवडत असते. त्यात ताजेपणा असतो. पण जुन्यामधे एक अवीट गोडी असते. त्याच्याशी आपले ऋणानुबंध जुळलेले असतात. तो कप्पा माझ्यासाठी तरी-कधीच न बंद करता येणारा असा आहे.
दोन महिन्यांपूर्वी मुंबई आकाशवाणीच्या उषा दीक्षित यांनी मला एक मालिका रेकॉर्ड करण्यासाठी ए.आय.आर.च्या स्टुडिओत बोलवलं होतं. संहिता होती प्रतिमा जोशी ह्य़ांची. त्यात त्यांनी महिलांच्या संदर्भात अतिशय उपयुक्त माहिती, टक्केवारी, प्रगती, आव्हान आणि सुधारणेच्या शक्यता-ह्य़ाचा सखोल गोषवारा घेतला होता. तेरा भागांच्या ह्य़ा श्रृतिकेमध्ये विविध मान्यवर तज्ञांचे मुलाखतवजा तुकडेही होते. नुसतं वाचतानाच मला इतकी माहिती मिळत होती, खेद वाटत होता, आश्चर्याचे धक्के बसत होते, अभिमान वाटत होता! ऐकणाऱ्यांना तर किती प्रेरणा मिळाली असेल. मला पुन्हा एकदा आकाशवाणीचं आणि त्याचबरोबर प्रतिमा जोशी, उषा दीक्षित ह्य़ांच्या टीमचं कौतुक वाटलं. एरवी नुसता अभ्यासू वाटणारा असा कार्यक्रम दुसऱ्या कुठल्या वाहिनीनी घेतला असता का?
पण माझ्या मनात आलं, की ‘इंटिरीअर महाराष्ट्रा’ सोडल्यास ही श्रृतिका कोण ऐकेल? रेडिओ ऐकणारी माणसं आता हिंदीच ऐकण्यात जुंपली गेली आहेत- अपरिहार्यपणे. आपल्या ज्ञानकोषात भर टाकणारा कार्यक्रम ऐकण्याचा उत्साह कोणामधे असेल? शहरातल्या श्रोत्यांना चटापट चॅनल बदलण्याची सवय लागली आहे. आपल्या आवडत्या रेडिओ जॉकीला जरावेळ तरी ऐकलं जातं. पण पेशन्स नाममात्रच. लगेच बटणं दाबून स्वत:ला आवडणारी गाणी शोधली जातात. ट्रॅफिक जाममधे अडकलो असलो तर ती सुद्धा नकोशी होतात. हिट करण्यासाठी सतत वाजवली जाणारी किंवा हिट झाल्यावर सतत कानावर आदळणारी गाणी, थोडय़ाच अवधीत कर्णकटू वाटायला लागतात. मग गप्पा/ चर्चा अशा गोष्टी ऐकणं फार दूरच. शिवाय शहरातल्या चॅनल्सवर बोलणारे वक्ते.. वक्ते कसले, सेलिब्रिटी! तेही सदासर्वकाळ अतिशय ‘पेपी’ मूडमध्ये असतात. त्यामुळे आर. जे. बरोबर वरच्या पट्टीत, अर्धवट आंग्लाळलेल्या भाषेत ओह, य्या.. थँक्स असं बोलणं किंवा खळखळून हसण्याचा प्रयत्नच जास्त. शिवाय त्यांना आवडणारी पावसाची गाणीही अगदी ठराविक.
कुणालाच. रिमझिम झरती श्रावणधारा/ सजल नयन नितधार बरसती किंवा अलिकडचं पाऊस दाटलेला माझ्या मनावरी हा-हे ऐकावसं वाटत नाही का? म्हणजे असेलही कदाचित, पण स्वत:कडे कॅसेट/ सीडी नसेल तर आवडती गाणी ऐकायची कशी? कारण रेडिओवर मराठी गाणी ऐकण्याचं भाग्य संपलं आता. बाकी वाहिन्यांवर क्वचित पॉप्युलर गाणी ऐकायला मिळतात. पण तेही गुढीपाडवा किंवा एक मे असे शुभदिवस आसपास असतील तर. नाहीतर जुन्या-नव्या, सर्व दशकांतल्या मराठी गाण्यांचा त्राता एकच- ए. आय. आर- एफ. एम. रेनबो.
‘सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे’- हे वाक्य कानावर पडलं, की मी दूध पिऊन, डबा दप्तरात भरून, बूट घालून शाळेत जायला निघायचे. शाळेतून घरी आल्यावर आईबरोबर जेवताना, बारा चाळीस ते एक- अतिशय सुंदर मराठी गाणी लागायची. सहावी-सातवीतून तर गाणी लावल्याशिवाय चैनच पडायची नाही. लोककथा जशा सांगण्यातून पुढे जातात, आरत्या ऐकून ऐकूनच मुखोद्गत होतात, तशी ही जुनी भावगीतं. चित्रपट गीतं कानावर पडली तरच लक्षात राहणार ना. आणि दहा-पंधरा वर्षांपूर्वीची गाणी-म्हणजे काही ‘जुनी’ नव्हेत. ती सुद्धा स्मृतीत नोंदवली जात नाहीत. सिनेमा बघताना गाणं ऐकू येतं, आवडतं, विषय संपतो. नंतर कधी कुठे ऐकायची संधीच नाही. कारण रेडिओवर, दहीहंडी, गणेशोत्सवात फक्त जोषपूर्ण ‘हीट’ गाणी वाजवली जातात. ती सुद्धा जास्त करून हिंदी.
दत्ता डावजेकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, आनंद मोडक ह्य़ा संगीतकारांच्या रचना सहज म्हणून ऐकता येणारच नाहीत का? एकतर रेडिओ चॅनलवाले काही चांगल्या प्रथा का बंद करतात कळत नाही. पूर्वी कसं, गाण्याच्या आधी चित्रपट, गीतकार, संगीतकार आणि गायक ह्य़ांची नावं सांगायचे. त्यामुळेच हिंदीची-जयदेव, शंकर जयकिशन, मजरुह सुलतानपुरी ही नावं तरी ओळखीची झाली. गायकांचे आवाज ओळखीचे झाले. आजही गीता दत्त/ सुमन कल्याणपूर/ भूपिंदर सिंग/ अनुराधा पौडवाल ह्य़ांच्या गाण्यांची, आवाजाची-आठवण झाली, की किती आनंद होतो. हा असा आनंद शेअर करण्याचं सुख जवळजवळ संपुष्टात आलंय की काय- अशी भिती वाटायला लागली आहे.
क्रिकेटपेक्षाही ‘संगीत’ हा माझ्यासाठी भारतीय जीवनशैलीचा कणा आहे. त्यातले पन्नास टक्के नक्कीच मराठी सुगम संगीतानी व्यापले आहेत. त्या पन्नासातले फक्त तीन-चार टक्के ‘बघायला’ मिळतात-काही टीव्ही चॅनल मराठी ‘हिट’ गाणी दाखवतात त्यामुळे. एक खोल खोल आनंद  कळत नकळत बुजत चालला आहे. त्याबद्दल दक्ष होऊन आपण आवाज उठवलाच पाहिजे. ‘फौजी भाईयोंके लिए’ हा कार्यक्रम एके काळी किती आतुरतेनी ऐकला जायचा. किती गोडवा होता त्यात. आता आपण बॉर्डरवर जाऊन आलेल्यांच्या, सैनिकांनी शेकहॅण्ड केलेल्याच्या ‘एक्साइटेट’ आवाजातल्या मुलाखती,- आय मीन बाईटस’- ऐकतो. नाही नाही. ‘आपली आवड’ रिव्हिजिट केलीच पाहिजे. ह्य़ासाठी पहिलं निवेदन आलं आहे, ते- एरंडवणे, पुणे येथून व्ही. जी. कुलकर्णी, तसंच त्यांची मुंबई येथील रहिवासी कन्या सोनाली कुलकर्णी ह्य़ांच्याकडून. ह्य़ा दोघांना ऐकायची आहेत जुनी, नवी अनेक मराठी गाणी…

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत