आम्हा घरी धन. शब्दांचिच रत्ने
शब्दांचिच शस्त्रे. यत्न करू
शब्दचि आमुच्या. जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन. जन लोका
माझ्या मुलीला अचानक ताप भरला. सासऱ्यांना वांद्रय़ाच्या- जसलोक (?) हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावं लागलं. घराची भिंत कोसळली.. मोठ्ठा अ‍ॅक्सिडेंट झाला. शेजारच्या बाईंनी जाळून घेतलं. ओढा आला. कुकरचा स्फोट झाला. नवरा पिऊन आला. त्यांनी मारलं. आमच्याकडे काम करणाऱ्या संगीताच्या घशाला कोरड पडायची. पण तिच्या थापा संपायच्या नाहीत. कामावर आली की घर लख्ख करून जायची. पण आली नाही तर दुसऱ्या दिवशी करमणुकीचा तास ठरलेला. नशीब पंधरा वर्षांपूर्वी ती जेव्हा आमच्याकडे कामाला यायची, तेव्हा सीरियल आणि मोबाइल हे जगण्यात अविभाज्य झाले नव्हते. नाहीतर तिच्या कल्पनांना किती धुमारे फुटले असते कोण जाणे!
माणसं खोटं का बोलतात? मला वाटतं, ८० टक्के लोक उशीर का झाला हे पटवून देण्यासाठी खोटं बोलतात. खरं म्हणजे कधीतरी उशीर होणं किती ‘ह्य़ुमन’ आहे; पण ते लपवायला गाडी पंक्चर, मेगा ब्लॉक ते थेट नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत मजल का मारावी लागते? माझी एक सहकलाकार- दोन वर्षांनी तिचं लग्नं होणार होतं. पण होणाऱ्या सासूचा ‘पाय मुरगळला’ म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ने घेऊन गेली होती- म्हणून उशीर! माझ्या क्षेत्रातली माणसं काय काय फिल्मी कारणं शोधून काढतील. त्यावर मी एक पुस्तकच लिहू शकेन. सरळ- आज उठायला उशीर झाला- असं तोंड उघडून का सांगत नाहीत? त्यामुळे खऱ्या कारणाची आपली आपल्यालाच जाणीव होते. कितीही चांगला अभिनय केला तरी समोरचा माणूस खोटं बोलतोय याची कुणकुण लागतेच आपल्याला. सांगणारा कितीही गंभीर/ रंजक गोष्टी भरू दे- तो परफॉरमन्सच राहतो.
मी अकरावी-बारावीत असताना बऱ्याचदा खोटं बोलले. तेही एकाच व्यक्तीशी- आईशी. आमच्या घरी पॉकेटमनी नावाची संकल्पनाच नव्हती. घरी लक्ष्मीच्या चित्राचा डबा होता. (अजूनही आहे). त्यात नोटा नीट ठेवलेल्या असायच्या. त्यातून पैसे घेताना ‘आई पन्नास रुपये ट्रीपची फी भरायला घेतले’ असं सांगायची पद्धत होती. बाकी पंक्चर, दळण, भाजी इ. छोटय़ा गोष्टींसाठी सुट्टय़ा पैशांचं एक जुनं फुलपात्र होतं. त्यातून वरखर्च सहज होऊन जायचे. पण कॉलेजमधलं नवं विश्व. सतत चहा पिणारे-पाजणारे नाटकातले सीनियर्स, ‘वैशाली’मध्ये वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या मैत्रिणी. यांची कधीतरी परतफेड करावीशी वाटायची. मग काही वेळेला न सांगता दहाच्या नोटा मी लक्ष्मीच्या डब्यातून उचलल्या. शंभराची नोट उचलताना सदसद्विवेकबुद्धी ठेचकाळली आणि कपाटाचा आवाज झाला. आईच्या कोण आहे.च्या प्रश्नाला उत्तर देताना मुखातून खोटेपणाची सरस्वती ओघवू लागली. आईच्या समोर जायचीसुद्धा लाज वाटली. या खोटं बोलण्यामुळे सतत चोराच्या मनात चांदणं आणि पकडलं जाण्याची भीती असायची. कमवायची अक्कल आल्यावर, पैशाचं मूल्य समजल्यावर या खोटय़ाबद्दल अतोनात पश्चात्ताप झाला.
मधे माझ्या एका प्रीमियरला माझ्या मैत्रिणीला बोलावलं होतं. ती येऊ शकली नाही. न येण्याबद्दल फोन, मेसेज काहीच नाही. मी मनाशी म्हटलं, नसेल जमलं. काहीतरी काम निघालं असेल, ऐनवेळी. पुढे खूप दिवसांनी मैत्रीण अचानक भेटली. तोपर्यंत मी प्रीमिअरचं विसरून गेले होते. मैत्रीण गडबडीचं निमित्त करत मला टाळायला लागली. पण तिच्या नवऱ्याचा निवांतपणा आड आला. तिने एकदम प्रीमिअरचा विषय काढला. त्या दिवशी कशा एकामागून एक अडचणी उत्पन्न झाल्या वगैरे सांगायला लागली. त्यावर नवऱ्यानं चतुरपणे बाळबोध चेहरा करत कधी. कुठे. काहीतरीच काय- असं म्हणत तिला गोत्यात आणलं. असू दे गं. पुढच्या वेळी नक्की असं सांगताना तिचा हात घट्ट धरून- दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून स्वत:ची उलघाल करत खोटं बोलू नकोस गं- असंही म्हणावंसं वाटलं होतं. तिच्या नवऱ्याचा आगाऊ, नामानिराळं राहण्याचा प्रयत्न तिलाच काय मलाही दुखवून गेला.
नाहीच बोलायचं खोटं- असं मी आता ठरवून टाकलंय. मीटिंगला उशीर झाल्यावर कसला ट्रॅफिक वगैरे बडबड हल्ली मी करीतच नाही. किती वेळेला कारण नसताना म्युनिसिपालिटी आणि रस्त्यांच्या नावानी श्राद्ध घालायचं ना. नव्या नाटक-सिनेमाची स्क्रिप्ट आवडली नाही तर हल्ली मी सरळ का आवडली नाही ते खरं सांगते. कधीतरी आपली जीभ, आपले शब्द यांना भानावर आणायलाच पाहिजे. खोटं बोलणं किती अर्थहीन असतं. त्यासाठी आपलं सुपीक डोकं कामाला लावणं किती व्यर्थ आहे. अपरिहार्यता प्रत्येकालाच असते. पण त्यासाठी चोरटेपणानं पळवाटा शोधण्यापेक्षा खरं बोलावं. म्हणजे आपण स्वच्छ हलके राहतो. एक खोटं बोलल्यावर ते लपवायला अनेक खोटय़ांच्या भाराभार चिंध्या जमवाव्या लागत नाहीत. आपली क्रिएटिव्हिटी थापा रचण्यात खर्ची पडत नाही.
ज्योती सुभाष यांनी ‘आम्हा घरी धन..’ नावाची एक सीडी केली आहे. त्यात गो. पु. देशपांडेंनी तुकारामांच्या त्या अभंगाचा उल्लेख केला आहे.
आम्हा घरी धन. शब्दांचीच रत्ने.. किती पटतो त्याचा अर्थ मनाला. आपणच आपली संपत्ती कवडीमोलानं वाया घालवली- तर बाकीचे त्याची काय किंमत ठेवतील? ‘व्हॉट वुई गिव्ह आऊट-कम्स बॅक टू अस’- या न्यायानं खोटं ही फक्त सुरस, चमत्कारिक आणि अर्थहीन देवाण आहे. त्याच्या बदल्यात आपल्या तोंडावर अवघड काळात कुणी खोटं बोललं- तर ते आपल्याला पटेल का, पचेल का, परवडेल का?