मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
नावातच दोन स्वर आहेत. आणि जवळ गेल्यावर जाणवतं.
की इथल्या काही माणसांचा जगण्यातला सा लागला आहे.
डिसेंबर महिन्यातली सकाळ. नागपूरला विमानानी उतरल्यावर एक कारनी आमचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला अर्धा तास रस्ता फार चांगला होता. मग खड्डे, खडी, धक्के, ब्रेक! आधी गाडीचा ड्रायव्हर अगदी फ्रेश आणि मज्जेत होता. गाणी लावू का, एसी बरोबर आहे ना. इ. खातिरदारी करत होता. तीन तासांनंतर चंद्रपूर आलं. तिथे जेवणासाठी थांबून मग पुढे निघालो. मात्र. ड्रायव्हर साहेबांचा रागरंग काही ठीक दिसेना. ते मागच्या गाडीतल्या ड्रायव्हरला फोन करायला लागले. रस्ता चुकले. अथक बडबडायला लागले. अत्यंत चुकीच्या माणसांना अलापल्ली? मेटपल्ली? असे पुटपुटत विचारायला लागले. अध्र्या-पाऊण तासाच्या त्यांच्या अस्वस्थ वर्तनानंतर लक्षात आलं की, आधीच्या अहो मी इथलाच आहे. हा रस्ता माझ्या पायाखालचा आहे. डोळे मिटूनही मी गाडी चालवू शकतो. इ. सगळ्या थापा होत्या. त्यांना तसं म्हणायला सांगितलं गेलं होतं. जेणेकरून बिझनेस हातातून जाऊ नये. आम्ही त्यांच्या थरकाप उडालेल्या हातांना शांत करण्यासाठी जनरल गप्पा सुरू केल्या तेव्हा ते म्हणाले, 'मी फक्त ऐकून आहे, पण तुम्हाला जायचंय त्या गावाला मी कध्धीच गेलो नाहीए. नक्षलवाद्यांचा परिसर आहे तो.'
ते असं म्हणतायत तोपर्यंत आमच्या मोबाइलचं नेटवर्क गायब व्हायला लागलं. सूर्य कलायला लागला. घनदाट जंगल सुरू झालं. आजूबाजूला चिटपाखरू दिसेना. मैलाचे दगड/पाटय़ा दिसेनाशा झाल्या. पंधरा-पंधरा-वीस वीस मिनिटं समोरून दुसरं वाहनसुद्धा यायचं नाही. फारच तुरळक. एके ठिकाणी बरेच लाइट वगैरे दिसले म्हणून म्हटलं इथे रस्ता विचारावा. तर एव्हान ड्रा. साहेबांची बोबडीच वळली होती. मी काच खाली करू नये म्हणून त्यांनी वेग वाढवून पोबारा केला. आश्चर्यानी त्यांच्या घबराटीकडे पाहायला लागल्यावर ते म्हणाले- तो नक्षलवाद्यांचा कॅम्प असला तर? नक्षली साध्या वेषातपण असतात. त्यांनी गाडी अडवली तर? मला त्यांचा भित्रा आडमुठेपणा कळेना. आता थोडय़ा थोडय़ा वेळानी ते भामरागडत येईल, भामरागड कुठे असं पुटपुटायला लागले. पूर्ण काळोख झाला. अगदी गर्द. तेव्हा आम्हीही अस्वस्थ झालो. शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली. की कधी येणार ते गाव? किती दूर आहे. काय हा रस्ता.! कधी संपणार प्रवास.! दर थोडय़ा वेळानी नदी यायची कुठलीतरी. कुठे शांत पाणी असायचं तर कुठे कोरडं-वाळूचं पात्र. अशा निर्जन जंगलात, किर्र्र अंधारात बाथरूमला थांबायची पण छाती होईना. कंटाळा, वैताग आणि साशंकतेचे छे! बापरे! किती लांब! असे उद्गार उमटायला लागले. इतका सारा वेळ सहकार्य करत असलेलं माझं बाळही कंटाळल्यासारखं झालं. आणि अचानक उजव्या हाताला ती पाटी दिसली- लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा!
गाडी आत आली आणि उतरल्यावर सगळ्यात आधी मला कोण भेटावं? मी ज्यांची भूमिका साकारणार होते- त्या डॉ. मंदा आमटे! पाठोपाठ डॉ. प्रकाश आणि त्यांचं कुटुंब भेटलं. सगळ्यांशी गप्पा झाल्या. त्यांच्या कामावर बनवलेली डॉक्युमेंटरी पाहिली. हळूहळू तिथला साधेपणा आणि शिस्त लक्षात यायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांच्या बरोबर संपूर्ण प्रकल्पाची चक्कर मारली. त्यात त्यांचे शेपूट असलेले कुटुंबीयही भेटले. डॉक्टरांची, त्यांच्या नातवांची प्राण्यांबरोबर वावरतानाची सहजता अविश्वसनीय होती. माझ्या मनातल्या-डासांमुळे लहान मुलांना होणाऱ्या सेरेब्रल मलेरिया विषयीच्या शंका मी विचारून घेतल्या. त्यावर अति खरं आणि प्रांजळ उत्तर मिळालं. त्यात 'काही होणार नाही'चा खोटा आत्मविश्वास नव्हता आणि शहरातल्या पाहुण्यांना इम्प्रेस करायला कृत्रिम काळजीही नव्हती. आमचीही मुलं इथेच आहेत. ह्य़ा एका मधल्या वाक्यानं आमचं शांत निरसन झालं.
हेमलकसाचे दिवस श्वास घेण्याइतके सहज होते. डॉक्टर असणं किती भाग्याचं! इतर पर्यटकांप्रमाणे एक-दोन दिवस येऊन पाहणी करून परतावं नाही लागलं आम्हाला. आम्ही ठिय्या मारून राहू शकलो तिथे. आमटे कुटुंबीयांच्या दैनंदिनीत भाग घेऊ शकलो. ह्य़ा वास्तव्यात अनेक प्रसंग घडले. पण कुठलीच घटना शांती ढळवणारी ठरली नाही. त्यात दिवसा/ रात्री-अपरात्री डॉक्टरांकडे धाव घेणारे स्थानिक पेशंट असोत की आमच्या शूटिंगच्या भलभलत्या अडचणी, सगळ्यावर आपसूक उपाय निघत गेले.
डॉ. प्रकाश आणि मंदा आमटेंच्या जगण्यात एक विलक्षण विश्वास आहे. तो स्वत:वर आहे, नात्यांवर आहे, निसर्गावर आहे. माझ्या मनात आलं. हे दमत नसतील? रोज नवे पाहुणे येतात. त्यांना कामाबद्दल माहिती द्यायची. रोजच्या रोज पेशंट येतात- त्यांना तपासायचं, ऑपरेशनं करायची, रुग्णांना बरं करायचं, शेपूटवाल्या कुटुंबीयांची देखभाल, त्यांच्यासोबत वेळ घालवायचा, नेमानं फिरायला जायचं, पत्र्यव्यवहार, फोन. मेसमध्ये खाण्याच्या वेळा पाळायच्या. संपूर्ण प्रकल्पात एकी, निष्ठा आणि मैत्री जोपासायची. कबूल आहे आता दिगंत, अनघा, अनिकेत, समीक्षा हे सगळे ही काम वाटून घेतात. इतर सहकारीही आहेत. पण १९७३ ला सुरू झालेल्या ह्य़ा प्रकल्पात, म्हणजे गेल्या ३९ वर्षांत- 'दमणे' ही संकल्पना मंदा-प्रकाश ह्य़ा दाम्पत्याच्या जवळ यायलाच धजलेली नाही. त्यांच्यात तळापर्यंत पाझरलेला दिसतो तो माणसांबद्दलचा नम्र कृतज्ञ भाव आणि प्रदर्शनाच्या घाईत नसलेली अपार आपुलकी.
कसं काय ठरवलं असेल त्यांनी 'हेमलकसा' नावाच्या नागपूरच्या पुढे आंध्र आणि मध्य प्रदेशालगत असलेल्या गडचिरोली भागात काम करणं? कुणाशी कमिटमेंट आहे त्यांची? गप्पांमध्ये वैचित्र्य, साहस, दु:ख, आव्हानांनी भरलेले किस्से हसत हसत सांगितले जातात. त्यात कुठेही अनंत अडचणी येऊनसुद्धा आम्ही कसे हटलो नाही.. अशा अहंकाराचा लवलेशही नाही. यंदा खूप थंडी आहे. असं म्हणावं इतक्या सहजतेनं साप पकडतात. आज ट्रॅफिक खूप जास्त होता असं म्हणावं इतक्या सहजतेने स्थलांतरित पक्ष्यांबद्दल बोलतात. नव्या मोबाइलची नावं आपण कशी मिरवू, तसे पक्ष्यांची किंवा पामुलगौतमी, इंद्रावती ह्य़ा नद्यांची नावं सांगतात. त्यांच्या मनात पेशंट आदिवासी आहे की नक्षलवादी आहे, गरीब आहे की म्हातारा आहे हा विचारही येत नाही. भेदभावाचा तर प्रश्नच नाही. प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी अमूल्य आहे. माणूस वाचवणं, शिक्षित करणे, स्वावलंबी करणं हे त्यांचं ध्येय आहे. रोज समाधानाचं आश्वस्त स्मित घेऊन झोपतात. आणि पहाटे, माणुसकीला दिलेल्या वचनाला स्मरून जबाबदारीनी उठतात. आणि नव्या आव्हानांना, समस्यांना, परिस्थितीला भिडतात. जिथे त्यांनी क्रांती घडवली आहे, पण अजून त्यांना खूप काही बदलायचं आहे.
एखादा माणूस शहराकडे पळून आला असता, किंवा त्याच्या बायकोनं तरी ह्य़ा आजीवन चालणाऱ्या जनजागरणातून माघार घेतली असती. सुख-सोयीचं निवांत आयुष्य निवडलं असतं. पण ते दोघं आणि त्यांचे सच्चे सहकारी खिंडीतच थांबले आहेत. झुंजत आहेत. त्यांच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या मेहनतीतून ह्य़ा आख्ख्या परिसराचा कायापालट झाला आहे. असं वाटतं की हे आकाशगंगेसारखं हे स्वप्न सत्यात कसं उतरलं? हे खरं आहे का? असं कुणी जगलं असेल का? असेल तर का? खूप आतून जगण्याबद्दलचा उत्साह उसळून आला आहे. परिसस्पर्श झाल्यासारखं वाटायला लागलंय. त्यांनी प्रेम केलेल्या, त्यांच्या सोबत असलेल्या प्राण्यांच्या इतकं सहज, स्वच्छ आणि निर्भय वाटायला लागलंय.
- सोनाली
ता. क. पुढच्या वेळी अजून सांगते. पण त्याआधी दिग्दर्शिका समृद्धी पोरे, तुझे आभार. मला ह्य़ा सिनेमासाठी विचारल्याबद्दल. आणि नाना पाटेकर सर. तुम्हाला तर अभिनय येतच नाही. असे. तुम्ही जगता!
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















