vv19सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट


करून दाखवलंच

‘इंडिया का त्योहार’ अशी यंदाच्या ‘आयपीएल’ची जाहिरातबाजी करण्यात आली होती. या ‘आयपीएल’च्या लढतीत जणू ससा-कासवाची गोष्ट आकारली नि ‘दुनिया हिला देंगे’चा नारा लगावत ‘मुंबई इंडियन्स’च्या संघानं ‘चेन्नई सुपर किंग्ज’ला ४१ रन्सनं हरवलं. या क्रिकेट लढतीची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली होती. तिथं ‘मुंबई इंडियन्स’ अर्थात ‘एमआय’चे फॅन्स विरुद्ध ‘चेन्नई सुपर किंग्ज’ अर्थात ‘सीएसके’चे फॅन्स असा सामना रंगला होता. वाढत्या रनस्कोअर प्रमाणं पोस्टचे अपडेटसही वाढत होतेच. आणि जिंकल्यावरचा ‘एमआय’वाल्यांचा भाव काय वर्णावा. ‘मुंबई इंडियन्स जिंकली. यामुळं हे सिद्ध झालंय की, अळङळवाले पण ३स्र् करू शकतात’, असे मेसेजेस व्हायरल होत होते. मात्र काही नेटकरांनी नेट लावून धरत ‘ही मॅच फिक्स होती की काय’ असा संशय व्यक्त केलाय. नाणेफेक जिंकल्यावर धोनीनं घेतलेल्या बॉलिंगच्या निर्णयावर अनेकांनी बोट ठेवलंय. फिक्सिंग झालं असलं तर त्याची उकल होईलच. तूर्तास ‘‘मुंबई इंडिन्स’नी करून दाखवलंच’ हे या क्षणापुरतं मान्य करायलाच हवं.

जयाम्मा रिटर्न्‍स
अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जे. जयललिता या तामीळनाडूवर राज्य करण्यासाठी पुन्हा सिंहासनावर आल्यात. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या घोषणाबाजीलाही सुरुवात झाल्येय. कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांना बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या प्रकरणात निर्दोष ठरविल्यानं त्यांच्या अडचणीत सापडलेल्या राजकीय कारकिर्दीला नवजीवन मिळालंय. हा न्यायालयीन निर्णय आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या निमित्तानं ‘जया रिटर्न्‍स’ हा हॅशटॅग चर्चेत होता. त्यात आता खरा ‘मदर्स डे’ साजरा झाला इथपासून ते जयाम्माच्या शपथविधी वेळच्या हिरव्या रंगाच्या मॅचिंगपर्यंतची चर्चा रंगली होती.

हत्तीचा सेल्फी
माणसांपाठोपाठ आता प्राण्यांमध्येही सेल्फीची क्रेझ आलेली दिसतेय. सोशल मीडियावर सध्या हत्तीनं काढलेला सेल्फी व्हायरल होतोय. ‘एल्फी’ या नावानं या सेल्फीची नेटकरांत चर्चा रंगतेय. थायलंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांनं हा एल्फी शेअर केलाय. हत्तींचे आपल्या कॅमेऱ्यानं फोटो काढत असताना एका हत्तीनं कॅमेरा हिसकावून घेऊन हा एल्फी टिपला गेल्याचं तो सांगतो. कॅमेऱ्यात टायमर सेट केला असल्यानं फोटो आल्याचं स्पष्टीकरणही तो देतोय. काही का असेना, बहुधा पहिला एल्फीचं क्रेडिट ख्रिश्चन लेब्लॅंकला द्यावं लागेल.

हृतिकची खिल्ली
हत्ती सेल्फी काढण्याएवढा हुशार झाला असला तरी बॉलीवूडचा हीरो हृतिक रोशनवर काळाच्या मागं चार पावलं असण्याची वेळ आली. तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका ड्रेसचा रंग ओळखण्याच्या चॅलेंजची पोस्ट खूप व्हायरल झाली होती. या कॉलममध्ये आपणही त्याची दखल घेतली होती. आता एवढय़ा काळानं हृतिकनं तीच पोस्ट शेअर केल्यानं ट्विटर नि फेसबुकवर त्याची जाम खिल्ली उडवण्यात आली. ही खिल्ली एवढी उडवली गेली की हृतिक रोशन हा टॉप ट्रेण्ड ठरला होता.

कुछ हटके.. ‘डबस्मॅश’
आपली पोस्ट इतरांपेक्षा हटके हवी असा हव्यास आता सामन्यापासून सेलेब्रेटींनीही धरलाय. बॉलीवूडमध्ये कधी कसले वारे वाहतील ते सांगणं कठीणच. त्यातही हा वारा ‘दबंग’गिरी करणाऱ्या सलमान खान नि सोनाक्षी सिन्हाचा असेल तर मग बातही कुछ और हैं. त्यांनी ‘डबस्मॅश’ प्रकारातला व्हिडीओ अपलोड केलाय. शॉटगन मॅन शत्रुघ्न सिन्हा आणि माला सिन्हा यांच्या ‘मेरे अपने’मधील संवादांची नक्कल सलमान नि सोनाक्षीनं या व्हिडीओत केल्येय.
‘छय्या छय्या’ गाणं आठवतंय का, ‘दिल से’मधलं? शाहरुख खान नि मलायकाचा तो रेल्वेच्या टपावरचा डान्स. अनेकांच्या गाण्यांची नि डान्स शोजची सोय करून गेला होता. तर मायकल जॅक्सनचं ‘डोण्ट स्टॉप’ हे गाणं अनेकांच्या दिलमध्ये बसणारं. या दोन्ही गाण्यांचा ‘मॅशअप’ करून ‘छय्या छय्या’ हा व्हिडीओ अपलोड केला गेलाय. विद्या, कर्ट श्नायडर, सॅम सुई, शंकर टकर यांच्यावर हा व्हिडिओ शूट झालाय. पाहा नि ठरवा, कसा काय आहे तो.

vv16
‘अझर’ आणि ‘जझबा’चा टीझर

मोहम्मद अझरुद्दिनच्या जीवनावर आधारित अझर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलिज झालंय. इम्रान हाश्मी अझरुद्दिनची भूमिका करतोय. अझरसारखंच व्हाइट हेल्मेट नि ताईत घातलेला हाश्मी पोस्टरवर झळकलाय. खेळाव्यतिरिक्त अझरच्या जीवनावरही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आलाय. अझरच्या गुंतागुंतीच्या आयुष्यातला प्ले आता इम्रान कसा रंगवतोय, हे लवकरच कळेल.
जझाबमधील ऐश्वर्या रायच्या लुकपाठोपाठ इरफान खानचा लुकही रिलिज केला गेलाय. डिरेक्टर संजय गुप्तानं ही पोस्ट ट्विटरवर केलेय. ‘पिकू’मुळं आधीच चर्चेत असणारा इरफान आता या पोस्टरमुळं आणखीन चर्चेत येणार, ही काय सांगायची गोष्ट झाली.

डॉक्टरकी नकोच…
‘तुमचा मुलगा काय करतो?’ हा सगळ्याच आईवडिलांना विचारला जाणारा प्रश्न. त्यातही मुलानं आई-वडिलांसारखं व्हावं, हेही एक पारंपरिक मत. त्यानुसार असेल कदाचित, पण डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर व्हावं असाही एक समज आहे. किंबहुना अनेक डॉक्टरांना असंच वाटत असावंही. पण केरळमधील एक डॉक्टर याला अपवाद ठरलेत. ‘आपल्या मुलांनी लासवेगासमध्ये अगदी पोल डान्सर झालं तरी चालेल. मात्र त्यांना मी भारतात डॉक्टर होण्यासाठी परवानगी देणार नाही.’ असं डॉ. रोशन राधाकृष्णन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. अ‍ॅनेस्थिसियॉलॉजिस्ट असणाऱ्या रोशन राधाकृष्णन यांचा हा ब्लॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांनी लिहिलेला हा ब्लॉग आतापर्यंत फेसबुकवर व्हायलर होतोय. त्यावर अनेक कमेंटही केल्या गेल्यात. डॉक्टरांचं दगदगीचं आयुष्य, कामाच्या अनियमित वेळा, कुटुंबाला वेळ न देता येणं. यांसारख्या अनेक गोष्टींचा त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये उल्लेख केलाय. त्याच उद्विग्नेतून त्यांनी हा ब्लॉग लिहिला असावा असाही काहींनी अंदाज बांधलाय.

रस्किन बॉण्ड@ ८१
तुमच्या-आमच्या घरातल्या आजोबांनी आपल्याला गोष्टी सांगाव्यात नि आपण त्या मन लावून ऐकाव्यात. विशेषत: लांबलचक सुट्टय़ांमध्ये गोष्टींच्या पुस्तकांचा खजिना आपल्या हाती पडला नि हे गोष्ट सांगणारे आजोबा दुसरे-तिसरे कुणी नसून रस्किन बॉण्ड असतील तर तुमची सुट्टी समृद्ध झालीच म्हणून समजा. अशा अनेक पिढय़ांचं आयुष्य समृद्ध करणारे, त्यात जिवंतपणा आणणारे नि त्याला माणूसपणाचा जोड देत निसर्गात रममाण होणारे रस्किन बॉण्ड अवघे ८१ वर्षांचे झालेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ट्वीटर, फेसबुकवरून असंख्य नेटकरांनी त्यांचं अभिनंदन तर केलंच, पण त्यांच्याच शब्दांमुळं आपलं बालपण टिकून राहिल्याबद्दल मनापासून आभारही मानलेत.
राधिका कुंटे