सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

गजानना.. गजानना..
असंख्य मनामनांवर अखंडपणे अधिराज्य गाजवणाऱ्या गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा होतोय. घरगुती गणपतींचं विसर्जन झालं असलं तरीही बाप्पा अजूनही अनेक मंडपांत विराजमान आहेत. #गणेश चतुर्थी, #सेल्फी विथ गणेशा आदी टॉपिक्स सोशल मीडियात टॉपमध्ये होते. दरवर्षीच्या रीतीरिवाजांप्रमाणे बाप्पाचं आगतस्वागत नि पूजन सोशल मीडियावर शेअर केलं गेलं. बाप्पांचे फोटो, सेल्फीज विथ बाप्पा आणि फॅमिली सेलिब्रेशन असा फोटोसेशन्सचा जोरदार धडाका चालू होता. त्यात ‘बाप्पा घरी येताना त्यांनाही सीटबेल्ट लावायचा नियम लागू होतो’ अशा मेसेजपासून ते ‘एक होता उंदिर, Q a w z x h m w z s j k r. s g o t k d. P j k g r t b f s. h y. f k e o wx m z h. K j. L… तो मेसेज कुरतडून गेला.. नाहीतर इतका सॉलिड मेसेज होता ना की बास..’ किंवा ‘मराठी पोरं परीक्षेचा अभ्यास आदल्या रात्री करतात आणि गणपतीची तयारी दोन महिने आधीपासून.’ असे मजेशीर मेसेजेस फॉरवर्ड होत होते.
भक्तांच्या सेल्फीजचं प्रमाण बघून शंकर-पार्वतीसह सेल्फी काढायचा मोह बाप्पांनाही आवरला नाही, असा आशय व्यक्त होणाऱ्या गणेशमूर्तीचा ‘सेल्फिस्टिक की तो हद्द हो गई’ या फोटोओळींसकटचा फोटो व्हायरल झाला.
vv06गणेशोत्सवातील नेहमीच्या अगत्याच्या निमंत्रणांत ‘नित्यनियमाप्रमाणे आमच्याकडे बाप्पा दीड दिवस राहायला येतील. तेव्हा तुम्हीही नेहमीच्याच भरघोस उत्साहाने त्यांना भेटायला या, असा आग्रह! आणि हो.. बाप्पांनी सक्त ताकीद दिलीय या वेळी की, भेटायला येणाऱ्या प्रत्येकाने आपला हातरुमाल घेऊन आलंच पाहिजे. तीर्थ-प्रसादानंतर हात धुवायला पाणी वापरायचं नाही म्हणे! तसे बाप्पा प्रयत्न करत आहेतच, वरुणदेवाचं मन वळवण्याचा.. तेव्हा बाप्पांचं वरुणदेवाशी निगोसिएशन यशस्वी व्हावं, म्हणून त्यांना सपोर्ट द्यायला याच नक्की!’ हे निमंत्रण लक्षवेधी ठरलं होतं.
गणेशोत्सवाचं निमित्त साधून दोन गाणी रिलीज करण्यात आलेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘गजानना’ हे गाणं थाटामाटात रिलीज करण्यात आलं. सुखविंदर सिंगच्या आवाजातील या गणेशगीतानं सोशल मीडियावर चिक्कार लाइक्स मिळवलेत. अंकुश चौधरीची भूमिका असणाऱ्या ‘दगडी चाळ’ या चित्रपटातील मोरया हे आदर्श शिंदे यांनी गायलेलं गाणं रिलीज करण्यात आलंय.

फेसबुक स्पेशल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ‘फेसबुक’च्या मुख्यालयाला भेट देणारेत. या बातमीपाठोपाठच फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या ऑफिसची सफर घडविणारा एक व्हिडीओ फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला नि तो सोशल मीडियावर गाजला.
फेसबुकवर एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओसाठी ‘लाइक’प्रमाणेच ‘डिसलाइक’चाही पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय फेसबुकने घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून फेसबुक युजर्सकडून डिसलाइक पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. आपल्या भावना व्यक्त करण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. त्याची याची दखल घेत फेसबुकने हा निर्णय घेतलाय.

सेल्फी लव्हर्ससाठी
सेल्फीप्रेमींना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्यासोबतच असण्याची गरज नाही. कारण जगाच्या पाठीवर कुठंही असलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणीला आपल्यासाबेत सेल्फी काढण्यासाठी इनव्हाइट करण्याची नि सोबत नसतानाही एकत्र सेल्फी काढण्याची सुविधा असलेलं एक अ‍ॅप लाँच झालंय. ‘पीकपल’ नावाचं हे अ‍ॅप सध्या अ‍ॅण्ड्रॉइड नि आयओएससाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. या अ‍ॅपच्या साहाय्याने जास्तीतजास्त तीन मित्रांना आपल्यासोबत सेल्फी काढण्यासाठी ‘इनव्हाइट’ करता येईल. हे ‘इनव्हिटेशन’ १५ मिनिटं चालू राहील. ‘इनव्हिटेशन मिळालेल्या व्यक्तीने १५ मिनिटांत इनव्हिटेशन स्वीकारून आपली सेल्फी काढून इनव्हिटेशन पाठविलेल्या मित्राला पाठवावी. या सेल्फी मिळाल्यानंतर संबंधित मित्र स्वत:ची सेल्फी काढेल नि अ‍ॅपमधल्या फीचर्सच्या साहाय्याने सगळे सेल्फी एकत्र करून एकच सेल्फी तयार होईल. सोशल मीडियाद्वारे ही सेल्फी शेअर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

द जंगल बुक
मोगलीच्या ‘द जंगल बुक’ या लाइव्ह अ‍ॅक्शन चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. त्यात एकाच मानवी पात्राखेरीज बाकी प्राणिजीवन दाखवण्यात आलंय. भारतीय वंशाचा बालकलाकार नील सेठीने ‘मोगली’ची भूमिका साकारलेय. बेन किंग्जलेंनी मोगलीचा जिवलग मित्र बगिराला आवाज दिलाय. ‘बल्लू’ला सुप्रसिद्ध कॉमेडियन बिल मरेनी आवाज दिलाय. मुळातच ‘मोगली’ अनेकांचा लाडका असल्यानं हा टॉपिक ट्रेण्डिंगमध्ये होता.

मराठी चित्रपटांचा धमाका
‘लालबागची राणी’ या नावापासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झालाय. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात वीणा जामकरची मुख्य भूमिका आहे. ‘राजवाडे अँड सन्स’ या सचिन कुंडलकर दिग्दर्शित एकसो एक कलाकारांची टीम असणाऱ्या चित्रपटाचा फर्स्ट टीझर लाँच झालाय. गायिका नेहा राजपाल निर्मित नि विजय मौर्या दिग्दर्शित आणि पर्ण पेठे, चेतन चिटणीसांच्या भूमिका असणाऱ्या ‘फोटोकॉपी’चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आलाय.

ये हैं व्हायरल..
vv08‘हाइट ऑफ मेसेज सिम्बॉल’ या आशयाचे अनेक मेसेजेस व्हायरल होताहेत. शब्दांचे शॉर्टफॉम्र्स किंवा सिम्बॉल्सचा सर्रास वापर करून लिहिल्या गेलेल्या या मेसेजेसनी अनेकांचं रंजन केलं.

व्हॉट्स अ‍ॅप?
‘नॅशनल डाटा एन्क्रिप्शन पॉलिसी’मधील तरतुदींवरून वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपला यातून वगळलंय. यामुळे व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील साइट्स वापरणाऱ्यांना दिलासा मिळालाय. व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर आदी सोशल मीडियावरून पाठवलेले संदेश डिलीट करणं, हा गुन्हा ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या दृष्टीने सरकारनं राष्ट्रीय सांकेतिक धोरणामध्ये मेसेज केल्यानंतर तो मेसेज ९० दिवसांपर्यंत डिलीट करता येऊ नये, यासाठी या धोरणाच्या प्रस्तावामध्ये तरतूद केली होती. नागरिकांकडून प्रतिक्रियाही मागविण्यात आल्या. त्यावर नेटिझन्सनी तीव्र टीका केली. ट्विटरवर #व्हॉट्स अ‍ॅप हा ट्रेण्ड टॉपला होता. यापूर्वीही ‘नेट न्युट्रॅलिटी’संदर्भातही अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. सोशल मीडियासंदर्भातील निर्णयांबाबत युजर्स जागरूक असल्याचं दिसतंय.
viva.loksatta@gmail.com