आजच्या ब्रँडिंगच्या जगात टाचणीपासून सगळ्याच गोष्टी ब्रॅण्डेड झाल्या आहेत. आपण कोणत्या ब्रॅण्डचा प्रॉडक्ट वापरतो यावरून आपलं सोशल स्टेटस ठरताना दिसतं. सोशल स्टेटस आणि लाइफस्टाइल एकमेकांच्या जणू हातात हात घालून फिरत असतात. या ब्रॅण्डेड जगात मग गाडय़ा तरी कशा मागे राहतील? किंबहुना या गाडय़ांनी मुळात ब्रँडेड लाइफस्टाइलला सुरुवात केली असं म्हणता येईल. कपडे, दागिने, अ‍ॅक्सेसरीज यांचे ब्रँड येण्याअगोदर गाडय़ांचे ब्रँड आले होते. तुम्ही कोणती गाडी वापरता यातून तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमची आíथक पत दिसून येतं. मोठेपणाच्या स्वप्नात ती ब्रँडेड ड्रीम कार आवर्जून यायला लागली.
बी.एम.डब्लू., ऑडी, मर्सडिीज, फेरारी, लेम्बोíगनी, डस्टर, पोर्शे या मंदियाळीतली एखादी कार घेण्याचे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असतो. आता या गाडय़ा केवळ हॉलीवूडपटात दिसत नाहीत तर मुंबई-पुण्याच्या रस्त्यांवरसुद्धा बघायला मिळतात. भारतीय बाजारपेठेत अशा परदेशी कार्सना मागणी आहे.
लक्झरी कार मार्केटमध्ये जर्मन कार आघाडीवर आहेत. ‘अ रिअल ड्रायव्हर्स कार’ अशी बिरुदावली मिरवणारी ‘बी.एम.डब्ल्यू’असो वा  जून १९२६ मध्ये कार्ल बेन्झ व पॉल डायम्लेरनं स्थापन केलेली ‘मर्सिडिज बेन्झ’ असो. हिटलरच्या नाझीपर्वातही मर्सिडीझ कार लोकप्रिय होती. ‘द बेस्ट ऑर निथग’ अशी या कारची ओळख आहे व त्यातून त्याची पात्रता दर्शवते. ‘जर्मन बिग थ्री लक्झरी ऑटो मेकर्स’मध्ये तिसरी कार म्हणजे ऑडी! ऑगस्ट हॉर्च यांनी ही कंपनी जून २९, १९३२ रोजी सुरू केली. कंपनीचे नाव संस्थापकांच्या आडनावावरून ठेवण्यात आले आहे. जर्मन भाषेत ‘हॉर्श’ म्हणजे ऐकणे; जेव्हा लॅटिन भाषेत याचे भाषांतर करण्यात आले तेव्हा ‘ऑडी’ असे नाव ठेवण्यात आले. तंत्रज्ञान, उत्तम डिझाईन, स्टायलिश लूक नजर खिळवून ठेवतो.
अशा मोठय़ा गाडय़ांच्या शोरूमच्या बाहेर आणि कारसमोरून गेल्यावर पाहणारे बरेच असतात. वरळी सी फेस, मरीन लाइन्स अशा भागात सिग्नलला या गाडय़ा हमखास पाहायला मिळतात व त्या पाहण्यात रमणारे कार क्रेझीही! एकूणच या महागडय़ा कार असणारे सगळ्यांच्या नजरेत भाव खाऊन जातात.