स्पेन २
शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. युरोपीय खाद्यसंस्कृतीवर प्रभाव टाकणाऱ्या स्पेनच्या दौऱ्यावर आपण सध्या आहोत. स्पॅनिश ऑम्लेट बनवल्यावर आणि टोमॅटिना फेस्टिवलची झलक पाहिल्यावर आता तिथल्या बारहॉपिंगच्या प्रथेविषयी जाणून घ्यायलाच हवं.
स्पेनची जगाला देणगी म्हणजे टोमॅटो, बटाटे आणि अ‍ॅव्होकॅडो. आता आज हे टोमॅटो, बटाटे आपल्या किचनमध्ये असे वावरतात की, जसे काही ते इथलेच रहिवासी! आणि आपलंपण यांच्या शिवाय पानच हलत नाही. बरोबर आहे म्हणा, माणूस काही तरी निमित्ताने दुसरीकडे वर्षांनुवष्रे जाऊन राहतो आणि तिथलाच होऊन जातो, तसंच या फळंभाज्यांचं.
आम्ही दोस्त मंडळी बार्सिलोनाला गेलो असताना लंचसाठी, एका छोटय़ा रेस्टोबारमध्ये गेलो. तेथे मला ‘तापाज्’ खायची फार उत्सुकता होती. ‘स्पॅनिश तापाज्’ म्हणजेच छोटय़ा छोटय़ा डिशमध्ये गरम किंवा गार स्नॅक्स सव्‍‌र्ह करतात. आम्ही इतर वेळी क्रूझ शिप वर किंवा हॉटेलमध्ये ‘तापाज्’ सव्‍‌र्ह करायचो, पण स्पेनमधलं ओरिजिनल ‘तापाज्’ टेस्ट करायचा फर्स्ट हॅन्ड एक्सस्पीरियन्स घ्यायचा होता. तापाज्च्या वेगळ्या रेसिपीज नाहीत. फक्त ऑलिव्हज्पासून ते तळलेल्या प्रॉन्स्पर्यंत काहीही असू शकतं. प्रत्येक रेस्टोबारमध्ये तापाज्ची व्हरायटी वेगवेगळी असते. इथे वेगवेगळे तापाज् टेस्ट करायला, ‘बारहॉपिंग’ करायला लोकांना खूप आवडतं.
स्पॅनिशमध्ये तापाज्चा अर्थ आहे ‘झाकणे.’ तापाज्च्या उगमाविषयी अनेक मतं आहेत. शेरी (एक प्रकारची गोड वाइन), ही खूप पूर्वीपासून स्पेनमध्ये प्यायली जाते. ही वाईन गोड असल्यामुळे, ग्लासभोवती माश्या फिरायच्या. माश्या शेरीमध्ये पडू नयेत म्हणून ग्लासवर ब्रेड ठेवायचे. हळूहळू त्या ब्रेडवर खारवलेले मांस, सी फूड ठेवून, शेरीबरोबर खाण्याची पद्धत सुरू झाली. एखाद्या गोष्टीची सुरुवात गरजेतूनच होते आणि नंतर त्याचं स्वरूप किती बदलतं ते बघा! या आठवडय़ात मला आवडलेल्या काही तापाज् रेसिपीज् मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. या रेसिपीज आपल्या किचनमध्ये नक्की ट्राय करून बघा.

कॅरेमलाईज्ड् ऑनियन टार्टलेटस्
टार्टलेटसाठी साहित्य :      ब्रेड स्लाईस – ४, बटर – अर्धा टेबल स्पून,
सारणासाठी साहित्य : कांदा  – २ (मध्यम),  टोमॅटो (बारीक चिरलेले) – १, मीठ – चवीनुसार, मिरी पूड – चवीनुसार, आक्रोड – २ टि स्पून, साखर – २ चिमूट, मशरुम (पाहिजे असल्यास)  – पाऊण (स्लाईस केलेले), प्रोसेस्ड चीज – २ टी स्पून, ऑलिव्ह ऑइल – पाऊण टी स्पून  
कृती : ब्रेडचे स्लाईस गोल कापून, लाटण्याने पातळ लाटून घ्या. टार्ट मोल्डमध्ये (मफीन मोल्ड पण चालेल) गोल ब्रेड नीट खोचून घ्या. वरून त्याला बटर लावून घ्या. १७० डिगरी सेल्सिअसवर हे ब्रेड मोल्ड तांबूस रंग येईपर्यंत (साधारण २० मिनिटे) बेक करून घ्या. सारणासाठी एका पॅनमध्ये ऑलीव्ह ऑइल टाकून कांदा लालसर परतून घ्या. बाकीचे साहित्य टाकून मिक्स करा. आता गरमागरम टार्टलेटमध्ये टाकून सर्व करा.

चिकपी तापाज् विथ रोमेस्को सॉस
साहित्य : उकडलेले काबुली चणे – २ कप, बारीक चिरलेले लसूण – ३ पाकळ्या, लेमन झेस्ट (किसलेले िलबू साल) – अर्धा टी स्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून, जिरेपूड – अर्धा टी स्पून,  तिखट- अर्धा टी स्पून, ब्रेड क्रम्स – अर्धा कप, मदा –  १ टेबल स्पून, मीठ – चवीनुसार, ताजा िलबू रस –  १ टी स्पून, अंडं (फेटलेलं) – १ (पाहिजे असल्यास)
रोमॅस्को सॉससाठी साहित्य : ऑलिव्ह ऑइल –  १ टीस्पून, ब्रेडचे बारीक तुकडे – १ स्लाईस, तेल लावून बेक केलेली सिमला मिरची – १ मध्यम, मीठ – चवीनुसार, बदाम – अर्धा कप, लसूण – २-३ पाकळ्या, तिखट – १ टी स्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून, टोमॅटो प्युरी – २ कप
कृती : रोमॅस्को सॉससाठी पॅनमध्ये ऑइल गरम करून त्यात बदाम, लसूण परतून त्यात ब्रेड तुकडे टाका, नीट परतून मग ते मिश्रण आणि सॉसचे इतर साहित्य मिक्सरमध्ये नीट बारीक करून घ्या. तुमचा सॉस तयार झाला. चकपी तापाजसाठी उकडलेले चणे बारीक वाटून घ्या. बाकीचे साहित्य त्यात टाका, नीट मिक्स करून त्याचे (िलबाएवढे) गोळे करून मंद आचेवर तळून घ्या. या क्रंची चिकपी तापाजबरोबर रोमॅस्को सॉस सव्‍‌र्ह करा.

आजची  सजावट
साधी सोपी गाजर फुले
कृती :-
१. गाजर सोलून देठाकडचा जाडा भाग कापून घ्या.
२. या तुकडय़ावर समान अंतरावर व्ही शेप (श्ह्ण) कट्स द्या.
३. आता या तुकडय़ांच्या पातळ चकत्या कापून घ्या.
४. चित्रात दाखवल्याप्रमाणे पातीचा कांदा, ही गाजर फुले आणि मिरीच्या दाण्यांनी आपली प्लेट सजवा.
viva.loksatta@gmail.com