चारुता (वय २३) नुकतीच एमबीए झालेली. पहिल्या नोकरीचा पहिला पगार हाती पडला, तेव्हा चारुता प्रचंड खूश होती. वीकएण्डला काय काय करायचं याची यादी मनातल्या मनात जुळवतच ती शुक्रवारी संध्याकाळी घरी आली. या यादीत होत्या घरातल्यांसाठी काही ना काही भेटवस्तू.. आणि स्वतसाठीचं शॉपिंग. महिन्याभरापूर्वी तिनं खरं तर कपडे खरेदी केले होते. पण आताची खरेदी वेगळी. पहिल्या पगारातून स्वतलाच दिलेली गिफ्ट.

पीयूष (वय २५) बंगलोरसारख्या नवीन शहरात राहायला येऊन वर्ष झालं आणि वर्षभरात या शहरानं त्याला आपलंसं केलं. पीयूष म्हणूनच आनंदी होता. नव्या शहरात बसलेल्या बस्तानाची ‘फर्स्ट अ‍ॅनिव्हर्सरी’ म्हणून त्यानं स्वतसाठी नवीन म्युझिक सिस्टीम विकत घ्यायचं ठरवलं.

अवनी (वय १७) आता सीनिअर कॉलेजला जायचंय म्हणून खूश. छान मार्क मिळाल्यानं दोन गिफ्ट्स आई-वडिलांकडून मिळालेली – कपडे आणि नवा मोबाइल फोन.. बट इट्स सो टिपिकल! काहीतरी सरप्राइज गिफ्ट हवी होती, म्हणून ती झुरतेय. मग स्वतच जाऊन एक छानसा हेअरकट विथ हायलाइट्स करून आली.. मेक ओव्हर! सरप्राइज टू सेल्फ.

प्रियाला (वय ३०) नवीन जॉबमध्ये सेटल झाल्यावर आता स्वतसाठी वेळ काढून काहीतरी करावंसं वाटतंय. सेल्फ पॅम्परिंग.. एका छानशा बुटिकमध्ये स्पा ट्रीटमेंट घ्यायचा तिचा विचार आहे. ट्रीट टू सेल्फ.

सावनीला (वय २४) सरप्राइझ गिफ्ट्स फार आवडतात. तिचा ‘एक्स बॉयफ्रेण्ड’ नेहमी तिला गिफ्ट्स द्यायचा. पण त्यात सरप्राइझ नसायचं. तिला घेऊनच जायचा खरेदीला. आता तर ब्रेकअपनंतर बॉयफ्रेण्डही नाही.. या वाढदिवसाला कोण गिफ्ट देणार? तिनं चक्क सरप्राइज गिफ्ट देणाऱ्या ई शॉपिंग वेबसाईटचं सबस्क्रिप्शन घेतलंय आता.

चारुता, पीयूष, अवनी, सावनी आणि प्रिया या चौघांमधली कॉमन गोष्ट लक्षात आली असेल. आपल्याला आवडेल असं काही ना काही त्यांनी स्वतलाच ‘गिफ्ट’ दिलंय. ते स्वतच स्वतचे लाड करून घेताहेत. स्वतच्या गरजेपोटी केलेली खरेदी हा भाग वेगळा. इथे त्या वस्तूंची खरेदी ही गरज म्हणून नाही, पण स्वतला खूश करण्याचा, स्वतवर खूश असण्याचा हा परिणाम आहे. ‘सेल्फ गिफ्टिंग’ हा ट्रेण्ड आता पाश्चिमात्य देशांनंतर आपल्याकडेही रुळू लागलाय. नवी तरुणाई अर्थात ‘जेन वाय’ म्हणजे १९८० पासून २००० दरम्यान जन्मलेली पिढी (या पिढीला ‘मिलेनियल जनरेशन’ असंही म्हटलं जातं.) या ‘सेल्फ गिफ्टिंग’वर फिदा आहे. मॉल कल्चर, वेगवेगळ्या शॉपिंग कार्डवरच्या ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स, ऑनलाइन शॉपिंग अशा गोष्टी या ‘सेल्फ गिफ्टिंग’ला पूरक ठरत आहेत. सेल्फ गिफ्टिंग आयडिया देणाऱ्या वेबसाइट्सही आल्या आहेत आता.
साधारण पाच-सात वर्षांपूर्वीपासून युरोप आणि अमेरिकेत ‘सेल्फ गिफ्टिंग’चं प्रमाण वाढायला सुरुवात झाली. ख्रिसमसचा महिना हा तिथल्या रिटेल बाजारातला सुकाळ. संबंध वर्षांत होते तेवढी उलाढाल या एका महिन्यात होते. ख्रिसमसनिमित्ताने नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, आप्त-स्वकीयांना गिफ्ट द्यायची पद्धत तिथं पूर्वापार चालत आली आहे. सांताक्लॉज हा ख्रिसमसचा चेहरा भेटवस्तू आणतो, म्हणूनच प्रसिद्ध. पण गेल्या काही वर्षांत भेटवस्तूसाठी सांताक्लॉज किंवा अन्य कुणाची वाट न पाहता तरुणाई स्वतच स्वतसाठी खरेदी करू लागली आहे. अमेरिकेत काही समाजशास्त्रज्ञांनी आणि अर्थशास्रज्ञांनी या ट्रेण्डचा अभ्यास केला आणि गेल्या वर्षीच्या ख्रिसमसच्या सुट्टीत ३५ टक्क्य़ांवर लोकांनी सेल्फ गिफ्टिंगवर सर्वाधिक पैसे खर्च केल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
एकूणच ही नवी तरुणाई आत्मकेंद्री झाली आहे, असं या पिढीतल्या अनेक गोष्टींवरून दिसतं. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर पडणारे स्वतचेच फोटो, वारंवार बदलण्यात येणारे प्रोफाइल पिक्स.. स्वतकडेच लक्ष वेधून घ्यायचे प्रकार असले, तरी त्यातून तरुणाई स्वतकडेच किती लक्ष देतेय, हे कळतं. ‘सेल्फी’च्या वैश्विक वेडाचं हेच विश्लेषण केलं जातंय. या संदर्भात काही सर्वेक्षणंही झाली आहेत. आत्मसंतुष्ट, आत्मकेंद्री असणं, स्वार्थीपणा या गोष्टी मागच्या पिढीपर्यंत ‘वाईट’ समजल्या जायच्या. त्याच आता ‘ट्रेण्ड’ बनून आधीच्या पिढय़ांनाही खुणावू लागल्या आहेत. स्वयंकेंद्री असण्यात गैर काय.. असं विचारलं जातंय आणि हल्लीच्या जगात थोडंसं स्वार्थी असणं काही वाईट नाही, असंही म्हटलं जातंय. ‘सेल्फिश’ हा शब्द सकारात्मक म्हणून वापरला जातोय.
खरं तर सध्याचं जगणं इतकं वेगवान झालंय की, स्वतसाठी आवर्जून वेळ काढायची गरज कधी नव्हे तेवढी आज निर्माण झाली आहे. आजचं जगणं पूर्वीपेक्षा खूपच अनिश्चित झालंय. कधी कुणाला काय होईल याची शाश्वती राहिलेली नाही आणि म्हणून आला तो क्षण समरसून जगण्याकडे तरुणाईचा कल आहे. किंबहुना तरुणाईच्या आजच्या समस्य बघता, असे क्षण समरसून जगा असा सल्लाच त्यांना मनोविश्लेषकांकडून मिळत आहे. आजच्या तरुण पिढीत एकीकडे नैराश्याने घेरलेले, मानसिक ताणाने वाकलेले अनेक जण दिसत आहेत, तर दुसरीकडे असे स्वच्छंदी आयुष्य जगणारेही कित्येक आहेत. आजची लाइफस्टाइलच इतकी दमवतेय की, स्वतसाठी विचार करा, असं सांगावं लागतंय. आजचे मानसोपचारतज्ज्ञही हेच सांगताहेत.
म्हणून कुठलाही आनंद ‘साजरा’ करण्याकडे हल्ली कल दिसतो. त्यासाठी भेटवस्तू हव्यातच. दुसऱ्याकडून मिळतील तेव्हा मिळतील, स्वतच खरेदी केलेल्या चांगल्या. आजकाल गिफ्ट्ससुद्धा पर्सनलाइज्ड लागतात. तुमचे फोटो असलेले, तुमची कविता असलेले खास बनवून घेतलेले मग, बॅग, उशा, आणखी बरंच काही.. तुम्ही स्पेशल आहात, असं सतत कुणी तरी सांगणारं जवळ हवं असतं. आपण कुणीतरी विशेष असल्याची भावना आजच्या तरुणाईला आवश्यक वाटते. ‘सेल्फ पॅम्परिंग’ हा तणावातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचं अमेरिकेतलं एक मनोविश्लेषणात्मक सर्वेक्षण सांगतं.
स्वतसाठी आवर्जून काही खरेदी केलं, तर गेल्या पिढीतल्या विशेषत स्त्रियांना ओशाळल्यासारखं वाटायचं. आपल्याला काय आवडतं, काय अपेक्षित आहे, हे आडून आडून सांगितलं जायचं. विशेष भेटवस्तूसाठी वाढदिवसाची किंवा सणाची वाट पाहिली जायची. आर्थिक सुबत्ता आणि स्वातंत्र्य या गोष्टींचाही हा परिणाम असला, तरी मानसिकता बदलली हे नाकारता येणार नाही.
ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या मते, ‘आजच्या पिढीवर इतिहासाचं, संस्कृतीचं ओझं नाही. आधीच्या पिढीनं वाहिलं तसं भूतकाळाचं ओझं या पिढीनं झुगारून दिलेलं आहे. ते स्वतंत्र आहेत, स्पष्टपणे बोलणारे आहेत.’ या स्पष्टपणातून कदाचित स्वतबद्दलचं प्रेम असं व्यक्त होत असेल.