पहिली नजरानजर, चिडवाचिडवी, त्यानंतर मैत्री आणि मग प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात.. त्याच जागी पहिली ब्रेक-अपची ठिणगीही पडलेली असते. ती जागा म्हणजे कट्टा. या कट्टय़ावरच्या प्रेमाच्या गोष्टी कट्टे की जबानी! प्रेमाच्या महिन्यात सुरू झालेल्या या शॉर्ट आणि स्वीट लेखमालिकेचा भाग दुसरा.

तर मंडळी गेल्या शुक्रवारी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे माझ्या नजरेतले हे माझे.. तुमचे बडीज.. गाइज अदरवाइज कसे असतात ते तुम्हाला सांगायला आज सज्ज झालोय. आता सध्या माझ्याकडे पडीक असणाऱ्या या ग्रूपबद्दलच सांगतो ना.

पूर्वीच्या  दिवसांमध्ये एक वेगळाच चार्म होता बहुधा.. कारण सध्या ग्रुपमध्ये काही तरी मिस आऊट असल्याचं फीिलग येतंय. त्याचं काय झालं, ते जरा सविस्तरच सांगायला हवं. म्हणजे या तशा तीन गोष्टी.. तीन तऱ्हेच्या. नको तेव्हा इगो, गरसमजुती आड आल्या आणि उगीच ग्रुपचं वातावरण बदलत गेलं. खरं तर म्हणायलाच सगळे एकत्र असावेत आता. म्हणजे, माझ्यापाशी असले की तसला आव आणतात.. एकत्र असल्याचा; पण कुठे तरी काही तरी बिनसलंय प्रत्येकाचंच. (कट्टय़ाचा एक उसासा!) पण मग जुने दिवस आठवले की, मी जरा वेगळ्याच झोनमध्ये जातो.. म्हणजे, आताही जातोय कदाचित.. खूप नॉस्टेल्जिक होतोय का मी? असू दे (कट्टय़ाने मिस्कील हसत हळूच डोळा मारला.)

गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिना.. कसा विसरू शकेन मी तो? एरवी अगदी कुठल्याही गोष्टीसाठी डेअिरग दाखवणारा अन्या.. सॉरी सॉरी अनिकेत. म्हणजे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतोय त्याचं नाव. हां.. तर हा माझा यार अन्या. रिद्धीला प्रपोज करायची वेळ आली तेव्हा साला चोमू निघाला. तसंही अन्याची विकेट काढणारी ही पहिली दीपिका, कंगना नव्हती; पण रिद्धीने याची जी काही दांडी गुल केलीये त्यानंतर अन्या काही नॉर्मलवर आला नाही. ही बया त्याला भेटली होती एका स्पध्रेच्या वेळी. रिद्धी दिखने में तो वैसी कडक है ही.. पर इस बंदे का दिल आ गया उसकी गायकी पे! रिद्धीचा आवाज जरा हस्की टाइप्स आहे. स्पध्रेत तिच्या गाण्याच्या परफॉर्मन्सनंतर पुढचं एकही गाणं त्याच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. तो भानावर आला ते थेट तिला बक्षीस मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतरच. तिचं अभिनंदन करताना तिच्या हातांचा त्याला झालेला स्पर्श, त्या वेळी दोस्तांनी दुरून केलेले इशारे, माझी तर फुल एन्टरटेन्मेंटच होत होती. फायनली अन्याला सीरियसवाला इश्क झाला. पूर्वी कट्टय़ावर उगीच रेललं की पोरींना चेक आऊट करणारा अन्या आता इज्जतीत हेडफोन्स लावून अरिजित सिंग ऐकू लागला. आता आतापर्यंत बोअिरग वाटणारी ‘तुम ही हो’नामक तत्सम रोमँटिक गाणी त्याला अवघड वेळी धावून आल्यासारखी वाटत होती. साल्याने एव्हाना फ्रेंडशिपची पहिली पायरी सर करत गप्पांच्या नावाखाली रिद्धीच्या आवडीनिवडींचे बेसिक डिटेल्स समजून घेत ते मेंदूच्या मेमरीबरोबर व्हच्र्युअल मेमरीतही फीड करून ठेवलेले. त्यामुळे ‘१४ फेब’चं तसं बेसिक प्लािनग झालंच होतं त्याचं. म्हणजे.. टेम्प्टेशन्स आमंड चॉकलेट, वर्साचेचा ‘यलो डायमंड्स’ परफ्युम आणि अरिजितच्या गाण्यांचा एक भारीतला अल्बम.

बाकी अरिजित हा दोघांमधला कॉमन दुवा. दोघांचाही प्रचंड आवडता (म्हणजे अन्याचा हल्लीच प्रचंड आवडता झालेला!) हे एक बरं जमून आलं होतं. तसंही १३ फेब्रुवारीला अरिजितची कॉन्सर्ट आहे हे त्याला फेसबुकच्या कृपेनं कळलं होतंच. त्यामुळे ‘व्ही डे’चे अंदाज बांधायला हाही एक सेफ ऑप्शन होताच. अर्थात ती येणार असली तर. दिवसागणिक त्याच्या मनातली धाकधूक वाढत होती. ‘प्रकरण जरा जास्तच सीरियस झालंय’ हे एव्हाना ग्रुपमधल्यांच्या लक्षात आलेलं. ही केस या टप्प्यावर फारच क्रिटिकल झालेली. ग्रुपमध्ये खेचाखेचीला आलेला ऊत ओसरायला तयारच नव्हता. रिद्धीकडून कॉन्सर्टला जायला ग्रीन सिग्नल मिळाल्यावर हा मजनू सुटलाच. पठ्ठय़ा कॉन्सर्टची तिकिटं काढून मोकळा झाला. १२ तारखेला अन्या बराच वेळ माझ्यापाशी रेंगाळला होता. त्याला गाणीही ऐकावीशी वाटत नव्हती. पोरंपोरी आयुष्यात प्रपोजलच्या मोडवर आली की हमखास माझ्यापाशी येऊन टेकतात. अजूनही म्हणजे या व्हॉट्सअ‍ॅप, हाइकच्या युगातही. शेवटी हाही आयुष्यातला अतिमहत्त्वाच्या निर्णयांपकी एक निर्णय नसतो का! (निदान आयुष्याच्या या टप्प्यावर तरी ज्याला त्याला तसंच वाटत असतं.)

इमोशनल लोच्या झाला की कुठल्याही दोस्तांच्या नसत्या सल्ल्यांपेक्षा ‘तू बोलत रहा.. मी ऐकत राहतो’ असं काहीसं कनेक्शन माझं आणि या दोस्तांचं होऊन जातं. अन्या प्रेमाचा फुलटॉस टाकणारे हे त्याच्या गावीही नव्हतं. अन्या असा रिद्धीच्या विचारांमध्ये गढलेला असताना दूर थोडय़ा अंतरावर मला कुणी तरी वेगळंच अन्याकडे एकटक पाहताना दिसलं.. येस, अनन्याच होती ती. त्या क्षणी अनन्याचे डोळे तुम्ही बघायला हवे होते.. अनन्या.. एक गोड.. मनस्वी मुलगी. अनन्याचं ‘ते’ पत्र मला आजही हलवून टाकतं; पण त्याआधी १४ फेब्रुवारीच्या कॉन्सर्टच्या दिवशी काय झालं ते सांगतो.. (क्रमश)