स्पोर्ट्स वेअर हा तसा महत्त्वाचा, पण दुर्लक्षित राहिलेला भाग आहे; पण सध्या या सेक्शनमध्येही वेगवेगळे बदल होऊ लागले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘एबीसीडी २’ चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. सिनेमा फारसा चालला नसला तरी ‘कॅज्युअल टॉम बॉय’ लुकमधील श्रद्धा कपूर आणि ‘कूल डूड’ अ‍ॅटिटय़ूडच्या वरुण धवनने त्यांच्या चित्रपटातील लुकमुळे वाहवा मिळवली आहे. लूझ टी-शर्ट्स, क्रॉप टॉप्स, जर्सी जॅकेट्स आणि टाइट लेगिंग्स, डेनिम्स, ट्रॅक पॅण्ट्स असा श्रद्धाचा लुक होता, तर लूझ गंजीज, कॉड्रॉय, थ्री फोर्थ पॅण्ट्स हा वरुणचा लुक होता. त्यात नॅचरल मेकअपवर जास्त फोकस देण्यात आला होता. सध्याच्या पावसाळ्यात हा लुक परफेक्ट आहे.
फॅशन किंवा स्टाइलचे धडे आपण अजूनही चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांकडून घेत असतो. सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.
कुठे आणि कसा कॅरी कराल
श्रद्धा आणि वरुणचा हा लुक तुम्ही जीम किंवा डान्स क्लासला जाताना आपल्या नेहमीच्या स्पोर्ट्स वेअरला थोडा ट्विस्ट देण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता. तसेच कॉलेजलाही टॉमबॉय लुक ट्राय करता येतोच की! दिसायला साध्या असलेल्या या लुक्समध्ये सिंपल डिटेलिंगला जास्त महत्त्व आहे. लूझ टी-शर्ट्स हा श्रद्धाच्या लुकचा मुख्य भाग आहे; पण टॅग लाइन्स किंवा कार्टून्स असलेली टी-शर्ट्स वापरता येतील. टँक टॉप्स आणि लूझ टी-शर्ट्ससोबत स्ट्रेच्ड पॅण्ट्स असा साधारण लुक आहे. लेगिंग्सच्या हेमचा रोल्ड अप लुक, टी-शर्ट्ना एक नॉट मारणं असे प्रयोग करा. बारीक चेन्स आणि ब्रेसलेट्स वापरता येतात, पण त्यासाठी तुम्हाला बॉइजच्या अ‍ॅक्सेसरी सेक्शनमध्ये थोडं डोकवावं लागेल.  मेस्सी बन किंवा वेणी तुम्हाला कॅरी करता येईल.
वरुणच्या लुकचे गमक त्याच्या लूझ गंजीमध्ये आहे. लूझ गंजी आणि थ्री फोर्थ ट्राऊझर्स वापरता येतील. जीमला हा लुक कॅरी करता येईल, पण कॉलेजला जाताना गंजीवर एखादा शर्ट घालायला विसरू नका. डार्क शेड स्पोर्ट शूज किंवा ग्रॅफिटी केलेले कॅन्व्हास शूज या लुकसोबत घालता येतील. नवीन शूज विकत घ्यायचे नसतील तर घरच्या घरी जुन्या कॅनव्हासवर स्केचपेनने तुमच्या पसंतीची ग्रॅफिटी करता येते.
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com