पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारे व्यासंगी आजच्या पिढीतही आढळतात. नव्या मोबाइलच्या बॉक्सइतकाच कोऱ्या पुस्तकाचा वास जपणारे वाचनवेडे आसपास दिसतातच. पुस्तक वाचताना कोपराही दुमडलेला त्यांना चालत नाही. त्यांच्या या पुस्तकप्रेमाची गोष्ट.

‘पीपल कॅन लूज देअर लाइव्हज इन लायब्ररी. दे ऑट टू बी वॉन्र्ड’.. सोल बेलोचा हा विचार वाचनाचा व्यासंग असणाऱ्यांचं तीव्र वाचनवेड अगदी नेमकेपणाने मांडतो. काळ कुठलाही असो. प्रत्येक पिढीत वाचनवेडी मंडळी असायलाच हवीत. असतातच. टेक्नॉलॉजीचं रांगतं बाळ अकलेने मोठं आणि शरीराने हाताच्या पंजात मावेल इतकं ‘नॅनो’ झालेलं असलं तरी मोबाइलच्या बॉक्सइतकंच पुस्तकांचा वास जपणारे वाचनवेडे व्यासंगी आजही आहेत. अर्थात, वर्षांनुर्वष पुस्तकं संग्रही ठेवणं ये कोई हर एक बंदे के बस की बात नही। अशी आवड उपजतच असते. उत्तरोत्तर जोपासली जाते. मग ही पुस्तकंसुद्धा आपल्या रोजच्या जगण्याचाच एक भाग होऊन जातात. बऱ्याचदा हॅरी पॉटर चाइल्डहुड क्रश म्हणून मिरवलेला असतो तर कुण्या एकाची आएन रॅण्ड अगदी डाìलगच असते. एखादी ललना वयात आल्यापासून ‘युगंधर’, ‘ययाती’तच मन गुंतवून बसलेली असते तर एखादा तरुण वीररसाने रक्त उसळल्यागत लढवय्या योद्धय़ांच्या समरगाथा स्वत: पुन्हा पुन्हा वाचतोच आणि इतरांना उत्साहाने ऐकवतोही. असे हे व्यासंगी त्यांच्या प्राणप्रिय पुस्तकांच्या बाबतीत नेहमीच पझेसिव्ह असतात.
पुस्तकांविषयीचा त्यांचा हा सॉफ्ट कॉर्नर नीटनेटकेपणाचा अभाव असलेल्या मित्रमत्रिणींना पुस्तकं वाचायला द्यायला मुळीच धजावत नाही. मग ते मित्रमत्रिणी कितीही जवळचे का असेनात.. एखाद्या लाडक्या पुस्तकाच्या एका जरी पानाचा कोपरा दुमडला गेलेला आढळला की यांना अगदी कससंच होतं. अशांकडून बऱ्याचदा ई-बुक्सपेक्षा नॉर्मल पुस्तकांना पहिला प्रेफरन्स दिला जातो. मुंबईची पल्लवी तिच्या पुस्तकांना माणसांसारखंच वागवते. ई-बुक्स वाचणं काही हिला पटत नाही. तिने संग्रही ठेवलेल्या प्रत्येक पुस्तकाची स्वत:ची अशी एक वेगळी कव्‍‌र्ह, एक स्वतंत्र आवाज आणि एक स्वतंत्र श्वास असतो असं हिचं म्हणणं.. त्यामुळे प्रत्येक वेळी पुस्तकं वाचताना त्यांचा जिवंतपणा तिला जाणवत राहतो. ‘गोष्टीच्या शेवटानंतर पुस्तक मिटताना माझं आणि त्या पुस्तकाचं नातं प्रत्येक पानापानांत भरून राहिलेलं असतं’, पल्लवी म्हणते.
पुण्याच्या नचिकेतचा सूर याहून काहीसा वेगळा.. नचिकेतकडे गीतरामायणाची सगळ्यात पहिली आवृत्ती आहे. आजवर त्याने ती कोणालाही दिलेली नाही. ‘वाचायचंच असेल तर घरी येऊन खुशाल वाचा, पण मी काही तुम्हाला हे पुस्तक तुमच्या घरी नेऊ देणार नाही’, नचिकेत त्याच्या मित्रमत्रिणींना असं ठणकावूनच सांगतो. गीतरामायणाच्या पुस्तकाबाबत नचिकेत विशेष पझेसिव्ह आहे.
कधी कधी माणसांपेक्षाही पुस्तकांचा सहवास काहींना हवाहवासा वाटतो.. एकटं वाटत असताना जवळच्या व्यक्तीपेक्षा जिवलग पुस्तकाचा स्पर्श एखादीला खूप बोलका वाटतो. एका मत्रिणीचं पुस्तकांवरचं प्रेम अनेकांना बऱ्याचदा अतिरेकी वाटतं. पण ही मत्रीण एकटं वाटत असताना व. पुं.च्या पुस्तकांना पोटाशी अगदी कवटाळून बसते. ‘पुस्तकं माणसांपेक्षाही जास्त कडकडून भेटतात’ असं हिचं म्हणणं. काही पुस्तकवेडय़ांच्या दानतीला दाद द्यावी ती थोडीच! प्रसंगी किमती आयफोनही स्वाहा करण्याची यांची तयारी असते.. केवळ पुस्तकांवरल्या प्रेमापोटीच! पूजा त्यातलीच एक. ‘माझा आयफोन देईन एक वेळ. पण पुस्तक देणार नाही’, इति पूजा!
आता ज्यांच्यापरीस हे एवडं भसाभसा लिवलंय त्यांचा पत्त्या कुटं हाय? आमी लिवत बसलो की यांच्या बुका बुकाच्या गोष्टी.. हे समद्य्ो बसले असतील कुटंतरी येड्यावानी.. बुकं वाचीत.. यांच्यावर लक्ष असू द्या वं बाबाजी!
लीना दातार – viva.loksatta@gmail.com
(संकलन साहाय्य : भक्ती तांबे)