उन्हाळ्यात तापमानाचा पारा जसा चढतो, तसे घरातही हे सीझनल चेंजेस जाणवायला लागतात. जेवणाच्या पानातून, संध्याकाळच्या फिरण्यातून, फ्रिजमधल्या पाण्यातून आणि गच्चीवरच्या वाळवणातून उन्हाळा जाणवायला लागतो. घराघरांतले संवाद तापू लागतात आणि सोशल नेटवर्किंगवर आंब्याबरोबरचा सेल्फीच काय तो कूल वाटायला लागतो.

‘काय मरणाचं उकडतंय.. नुसता घाम येतोय सारखा..’ असं बोलणं ऐकू आलं की समजायचं उन्हाळा तीव्र झालाय आता. तापलेल्या सूर्याची किरणं डोक्यावर पडली की कोकिळाही त्यांना शांत करीत तिच्या कुहु स्वरांनी उन्हाळ्याचं स्वागत करते. पण बाहेर पडणाऱ्या उन्हामुळे घरात मात्र ‘सीझनल चेंजेस’चे चटके बसायला सुरुवात होते. माळ्यावरचा माठ काढला जातो, कपाटात चार महिने वर असणारे स्वेटर्स सर्वात खाली जाऊन कॉटनचे कपडे, स्कार्फ आपोआप वर येऊन बसतात. ड्रेसिंग टेबलावरचं कोल्ड क्रीम कपाटात जाऊन तिथे सनस्क्रीन दिसायला लागतं. बाथरूममधल्या गीझरलाही अचानक एक दिवस सुट्टी मिळते ती डायरेक्ट चार महिन्यांसाठी आणि मुख्य म्हणजे घरात होणाऱ्या वादांचे विषयही बदलतात.
सकाळी उठवण्यासाठी बाबा अंगावरचं पांघरूण काढण्याऐवजी खोलीत येऊन फक्त पंख्याचं बटण बंद करून जातात. मग अंथरुणातूनच मोठ्ठा आवाज येतो.. ‘बाबा पहिले येऊन पंखा लावा..!’ संध्याकाळी आई घरी आल्यावर पाणी पिण्यासाठी फ्रिझ उघडते आणि स्वयंपाकघरातून आवाज येतो.. ‘फ्रिझमधलं पाणी प्यायलं की बाटली भरून ठेवायची.. हज्जार वेळा सांगितलंय. रिकामी बाटली फ्रिझमध्ये ठेवली जातेच कशी!!!’ दुपारी आपल्या प्लॅननुसार आपण आवरून घरातून बाहेर पडत असतो. अचानक हॉलमध्येच जरा वेळ पडलेल्या आज्जीचा आवाज येतो.. ‘३ च्या टळटळीत उन्हात कुठे निघाली आहेस? डोक्याला बांधून जा. तीनच्या झळा तब्येतीस चांगल्या नाहीत.’ आरशात बघणारी नात आतूनच ओरडते, ‘हो गं आज्जी! एवढं काही होत नाही. इथेच चाललेय.’
वातावरण, घरातले वाद-संवाद, कपडे या सगळ्या गोष्टींबरोबरच बदलते ती पेटपूजा! उन्हाळा सुरू होतो ना होतो तोच कैरी घालून भेळेची पार्टी होतेच प्रत्येकाच्या घरी आणि आईस्क्रीम पार्टी करायला तर काय काहीही कारणं चालतात आपल्याला. कैरीनंतर प्रतीक्षा असते फळांच्या राजाची.. आजकाल तर ‘फर्स्ट मँगो ऑफ दि सीझन’ म्हणत सेल्फीही अपलोड होतो सोशल नेटवर्किंगवर आणि या आमरसाबरोबरच कोकम सरबत, आज्जीचं खास तुळशीचं बी असे ‘युनिक’ पदार्थही हाच उन्हाळा आपल्याला देतो. पूर्वी अंगणातली वाळवणंही असायची या उन्हाळ्याचं स्वागत करायला, पण आडव्या घरांची उभी घरं झाल्यावर घराच्या गॅलरीत सूर्य पोहोचला तरी पुष्कळ असं म्हणायला हवं. वाळवणातले पापड, चिकोडय़ा आई-आज्जीच्या नकळत जाऊन खाण्याची मजा मात्र हरवली या गगनाला भिडणाऱ्या बिल्डिंगांमध्ये! पण हे व्हायचंच.. पिढी बदलणार, काळ बदलणार, उन्हाळाही बदलणार.
वाढणाऱ्या दिवसागणिक आपली चिडचिडही वाढते उन्हाळ्यात.. नाही? सतत येणारा घाम.. ट्रेनमध्ये/ बसमध्ये असणाऱ्या गर्दीचा नकोसा वाटणारा वास.. गरम झळा.. आणि त्यामुळे कधी कधी नकोसा वाटणारा चहा. या सगळ्यात उन्हाची कितीही भकभक जाणवली तरी उन्हाळ्याचंही एक वैशिष्टय़ आहेच. उन्हाळ्यातच आपण निसर्गाच्या जवळ जात असतो. सतत पाण्यात जावंसं वाटतं आपल्याला. जास्त झाडं असणाऱ्या ठिकाणी ओढले जातो आपण आपोआप. शनिवार-रविवार पाण्याच्या ठिकाणी पिकनिक प्लॅन होत असेल तर एका पायावर तयार होतो आपण. ए.सी. कितीही सोयीचा वाटला आपल्याला, तरी गच्चीत झोपण्याची स्वप्नं प्रत्येक जण रंगवत असतो, रात्री येणारा गार वारा अक्षरश: सुखावून जातो आपल्याला आणि हेच निसर्गाचं देणं आहे. आपण फक्त उन्हाळ्यात होणारा चिकचिकाट, पावसाळ्यातला चिखल आणि थंडीतल्या सर्दीकडे पाहत बसतो म्हणून गमवतो हे निसर्गाचं देणं. निसर्गावर प्रेम केलं की आपोआप होणारा त्रास कमी होतो आपला. शेवटी काय ‘आयुष्यात उन्हाळे, पावसाळे येणारच! ते थांबणार नाहीत.. आपण प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत राहणं आपल्या हातात आहे..!’ सो एंजॉय समर!
श्रुती आगाशे

pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
ST bus, msrtc, caught fire, thane, Pali, passengers, safe,
ठाण्यात एसटी बसगाडीमध्ये आग, प्रवासी सुखरूप
Trick For Lemon Tree Add turmeric water to the root of a lemon tree, the plant will get lots of lemons throughout the year
Trick For Lemon Tree: लिंबाच्या रोपाच्या मुळाशी टाका ‘या’ गोष्टी, वर्षभर रोपाला येतील भरपूर लिंबू