आपल्या आवडत्या टेलिव्हिजन मालिका हल्ली मोबाइलवर बघितल्या जातात. त्याबरोबरच वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून खास इंटरनेटच्या प्रेक्षकांसाठी वेगळ्या मालिकाही बनवल्या जाऊ लागल्या आहेत. मनोरंजनाच्या या नव्या दुनियेत वेगवगळ्या वेब चॅनेल्सची दररोज भर पडतेय.गेल्या वर्षी एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चुकून घेतल्यावर अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावरची विदूषकच बनून गेली होती. एका मर्यादेपर्यंत होणाऱ्या मस्करीची कुस्करी झाल्यावर मात्र ‘आता माझी सटकली’ हा पवित्रा तिने घेतला. त्यातूनच ‘जिनिअस ऑफ द इयर’ या व्हिडीओचा जन्म झाला. शक्यतो माध्यमांमध्ये आपली खिल्ली उडल्यावर बॉलीवूड सेलिब्रिटीज भांबावून रागात अजून एखादी चूक करतात. पण आलियाचे पाऊल सर्वानाच चोख उत्तर होते. आठवडय़ातच व्हिडीयोला सहा कोटी व्ह्य़ूज मिळाले आणि ती ‘युथ आयकॉन’ बनली. आलियासोबतच उदयाला येणाऱ्या ‘यू टय़ूब चॅनल्स’कडेसुद्धा लोकांचे लक्ष वेधले गेले. टीव्ही सिरीअल्स इंटरनेटवर बघणारी पिढी तयार होते आहे. जगभरात त्यासाठी ‘यू टय़ूब’सोबतच ‘व्हिमेलो’, ‘डेलिमोशन’, ‘ट्विच’, ‘हुलू’, ‘याहू स्क्रिन’ असे अनेक डिजीटल प्लॅटफॉम्र्स आहेत, पण भारतात सध्यातरी ‘यू टय़ूब’चे प्रस्थ मोठे आहे.तरुणाईचे लोकप्रिय तरुण माध्यमआजच्या घडीला टीव्हीवरील अनेक वाहिन्यांची आणि हिंदी चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची स्वतंत्र यू टय़ूब चॅनल्स आहेत. या चॅनल्सचा उपयोग ते केवळ मालिका आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी करतात. पण याखेरीज कित्येक तरुणांनी एकत्र येऊन केवळ यू टय़ूब चॅनल्ससाठी मालिका, व्हिडीओज, चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वाना तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आहे. राजश्री मराठी यू टय़ूब चॅनेलचा व्हिडीओ दिग्दर्शक नारायण ठाकूर सांगतो, ‘वेब चॅनल्सवर तरुणांना त्यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब बघायला आवडते. आमच्या कुकरी चॅनलवर सर्वात लोकप्रिय रेसिपी ताकाची आहे. हा व्हिडीयो पाहून अमेरिकेतल्या एका भारतीय तरुणीने तिच्या आईच्या वाढदिवसाला स्वत: ताक केले आणि तीच वाढदिवसाची गिफ्ट म्हणून दिले. तिने स्वतच प्रतिक्रियेच्या माध्यमातून आम्हाला हा किस्सा कळविला होता. एरवी आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीच या व्हिडीओजच्या माध्यमातून जास्त लोकप्रिय होतात.’ इथे पाहिलेल्या व्हिडीयोवर लगेच प्रतिक्रिया नोंदवता येते, मित्रांना सोशल मीडियावर शेअर करता येतात, कधीही कितीही वेळा हे व्हिडीयोज पाहता येतात आणि या व्हिडीयोचे कलाकार, लेखक यांच्याशी सहज संवाद साधता येतो. त्यामुळे तरुणांमध्ये हे व्हिडीयोज लोकप्रिय आहेत.‘ऑल इंडिया बकचोद’, ‘द व्हाइरल फिव्हर’, ‘बीइंग इंडियन’, ‘शुद्ध देसी एंडिंग’, ‘इस्ट इंडिया कंपनी’ अशा कित्येक यू टय़ूब चॅनल्सची नित्यनियमाने तरुणाईमध्ये चर्चा होत असते. आयआयटीमधून डिग्री घेतल्यावर मोठय़ा पगाराची नोकरी करण्याऐवजी ‘द व्हाइरल फिव्हर’ हे यू टय़ूब चॅनल सुरू करणाऱ्या पाच मित्रांच्या चॅनलवर स्वत: शाहरुख खानने त्याच्या चित्रपटाच्या प्रसिद्धी करण्याविषयी विचारणा केली होती. नुकतेच या चॅनलने तयार केलेली ‘परफेक्ट रुममेट’ ही पाच भागांची मालिका यू टय़ूबवर तुफान गाजली होती. सध्या ‘टीव्हीएफ बॉक्स ऑफिस’ या संकल्पनेतंर्गत कमी बजेटमुळे चित्रपटगृहापर्यंत पोहोचू न शकणारे चित्रपट केवळ एक रुपयात त्यांच्या चॅनलवर दाखवण्यात येणार आहेत. भारतातील पहिल्या यू टय़ूब फॅशन मॅगझीनचा एडिटर दिग्दर्शक करण जोहर आहे. ‘इंडियन आयडॉल’सारखे टीव्हीवरील यशस्वी रिअॅलिटी शोज देणारी फ्रीमँटल निर्मिती संस्था लवकरच ‘इंडियाज डिजिटल सुपरस्टटार’ ही ऑन लाइन टॅलेंट हंट स्पर्धा घेऊन येत आहे. ज्यात स्पर्धक आपले सादरीकरण यू टय़ूबवर अपलोड करतील आणि प्रेक्षकांच्या जास्तीत जास्त संख्येवरून विजेता निवडला जाईल. यावरून हा पसारा वाढतो आहे, याचा अंदाज येऊ शकतो.घरात टीव्हीचा रिमोट तरुणांच्या हातात येण्याचा योग आधीच कमी असतो, त्यात त्यावेळी आपल्या आवडीचा कार्यक्रम टीव्हीवर असेलच असे नाही. यापेक्षा मोबाइल किंवा लॅपटॉपवर हवे तेव्हा पाहता येणारे यू टय़ूब व्हिडीयोज तरुणांना जास्त प्रिय वाटू लागले आहेत, असे राजश्री प्रोड्क्शनचे हेड ??? राजत ??? बडजात्या सांगतात. राजश्री प्रॉडक्शनचे ३० हून अधिक यू टय़ूब चॅनल्स असून त्यावर केवळ ऑनलाइनसाठी कण्टेंट बनविला जातो. ‘राजश्री मराठी’ हे केवळ ऑनलाइनसाठी कण्टेंट बनविणारे पहिले मराठी चॅनल आहे. अगदी ५ किंवा ७ डीएसएलआर कॅमेराच्या मदतीने आणि कमीतकमी साधनसामग्रीची गरज हे व्हिडीयोज बनवताना लागते त्यामुळे टीव्हीवरील मालिकेच्या तुलनेत या व्हिडीयोजचा खर्च खूप कमी असल्याचे नारायण ठाकूर सांगतो. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये मनोरंजनाचा हा पडदा इतरांना हादरवून सोडणार हे नक्की..मृणाल भगत