मला हवा असणारा आयडियल बॉयफ्रेण्ड कसा असावा? त्याच्यात कुठले गुण असावेत, तो कसा नसावा? त्याचा लूक कसा असावा याच्या चर्चा कॉलेजच्या गर्ली गँगमध्ये कायम रंगलेल्या असतात. आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराची ‘रफ इमेज’ शेअर करायला एक हक्काचं व्यासपीठ असतं ही गर्ली गँग. कट्टय़ावरच्या अशा गँगच्या गप्पांचा कानोसा.         
‘कैसा है, कौन है वो जाने कहा है.?’ हा प्रश्न काजोलने दोन दशकांपूर्वी विचारला होता आणि हाच प्रश्न प्रत्येक मुलीच्या मनात आजही असतो. उत्तर लगेच मिळत नाही असं, पण कालांतराने उत्तर मिळतच. तोपर्यंत ‘मेरे खाँबो में जो आएं’चं वर्णन कट्टय़ावरच्या गर्ली गँगला ऐकवलं जातं.  बॉयफ्रेण्ड कसा असावा, असा जेव्हा प्रश्न पडायला सुरुवात होते तेव्हा सुरू होतं ते ‘इमेज डिझायनिंग’. येसससस.. डिआयनिंगच ते. कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या ग्रूपच्या गप्पांचा कानोसा घेतला तर ही डिझायनिंगची प्रक्रिया लक्षात येईल.
‘‘ए, ऐक ना ..तो ‘सी’ डिव्हिजनमधला किती क्यूट आहे ना.. मला अशी क्यूट मुलंच आवडतात..’’ असले संवाद कॉलेजमधल्या मुलींच्या घोळक्यात अगदी हटकून ऐकू येतात. आपल्याला हवा असणारा बॉयफ्रेण्ड कसा असावा, त्याच्यात कुठले गुण असावेत, त्याचा लूक कसा असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात किती प्रकारचे टॅलेंट्स असावेत याची एक रफ इमेज तयार व्हायला सुरुवात होते, ते कॉलेजच्या अशा मुलींच्या गप्पांमधूनच. या सगळ्या पॅरामिटर्समध्ये कोणी बसतं का? मग अगदी कोणी बसलंच तर ते माझ्या सोशल स्टेटसला सूट होतं का? असे काही विचार आणि प्रश्न मनात काहूर माजवू लागतात, आणि हे सगळं शेअर करण्यासाठी असतं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजेच आपली गर्ली गँग.. त्या गँगमधले काही सदस्य ज्यांना आपण या विषयात अगदी पीएच.डी. केल्यासारखं वाटत असतं अशा आपल्या जिवलग मैत्रिणी सल्ले देण्यास सज्ज असतात. चर्चाना रंग चढतो आणि वैचारिक गप्पा रंगाव्यात तसं काहीसं वातावरण तयार झालेलं असतं.
या सगळ्या रंगीत गप्पांनंतर काही कॉमन पॉइंट्स समोर येतात, आता या सगळ्यामधला सर्वात कॉमन पॉइंट म्हणजे ‘टॉल, डार्क, हॅण्डसम गाय’चा. अगदी मागच्या पिढीतल्या मुलींपासून हे ‘गुण’ मुलांच्यात पाहिले जातात. या ट्रेण्डची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, राणी मुखर्जीचा ‘अय्या’ हा चित्रपट याच थीमवर बेतला गेला. या चित्रपटातून हा जुनाच ट्रेण्ड प्रेक्षकांपुढे नव्यानं आणला गेला. पण आता निव्वळ या गुणांवर बाजी मारणाऱ्या मुलांची क्रेझ जरा कमी होतेय बरं का!
मुली त्यापेक्षा वेगळंही काही मुलांमध्ये शोधताना दिसताहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर ‘टॉल, डार्क, हॅण्डसम गाय’मध्ये अजून एक शब्द अ‍ॅड करावा लागेल आणि तो म्हणजे ‘सुपरटॅलेंटेड’. आता सुपरटॅलेंटेड म्हणजे नक्की काय..     
तर याचा अर्थ असा की त्यांत अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गुण असावेत.. जसे गायन, नृत्य, संगीत यामध्येही त्याला गती असावी. अगदीच काही नाही तर एखादं वाद्य तरी वाजवता आलं पाहिजे. आता वाद्यांचा मुद्दा निघालाच आहे तर आजच्या मुलींचा गिटार वाजवणाऱ्या मुलांमध्ये अधिक इंटरेस्ट दिसतो.

मुलांच्या दिसण्याबाबतीत विचारलं तर असं म्हणता येईल की कूल लूकिंग, ‘क्यूट’ गाइजची डिमांड वाढली आहे. म्हणजे सिक्स पॅक वगैरे नसलं तरी चालेल एक वेळ. पण ‘सेन्स ऑफ ह्य़ूमर’ पाहिजे. क्लीन शेव्ह्ड नसला तरी चालेल, पण वाढलेली दाढी व्यवस्थित मेन्टेण्ड हवी. एक काळ होता जेव्हा क्लीन शेव्ह लूकची चलती होती. पण आजकाल हेही लोप पावत चाललंय. आताच्या मुलांना पाहून असं म्हणता येईल की क्लीनपेक्षा ‘वेल मेन्टेण्ड शेव्ह’ची क्रेझ अधिक वाढली आहे. या सगळ्या गुणांबरोबरच आपला बॉयफ्रेण्ड ‘केअरिंग’ आणि ‘रिस्पॉन्सिबल’ असावा पण जास्त ‘पझेसिव्ह’ नसावा. अशी काही छोटी छोटी स्वप्नंदेखील मुली आपल्या मनात बाळगून असतात. म्हणजे त्यानं तुमच्यातले बदल टिपले पाहिजेत, तुमची दखल घेतली पाहिजे, पण त्यावर आक्षेप घेता कामा नयेत.
तर या सगळ्याचा मथितार्थ लक्षात घेता आपण असं म्हणू शकतो की, केअिरग, मुलींच्या मनाची काळजी घेणारा, त्यांना हसवणारा, त्यांच्यात मिसळणारा मुलगा मुलींना भावतोय. तेव्हा मुलांनो.. मुलींची मनं जिंकून घेण्यासाठी आता नुसतं शरीर कमावून चालणार नाही, त्यांच्या ‘सुपरटॅलेंटेण्ड’ बिरुदावलीत बसण्यासाठी थोडे आणखी कष्ट घ्यायला हवेत. सो.. ऑल द बेस्ट गाइज!