‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.

एम टीव्ही आणि व्ही चॅनल सुरू झाले तेव्हा भारतात गाणी ‘पाहणाऱ्या’ पिढीचा दृष्टिविस्तार झाला. दूरदर्शनवर चित्रगीत, छायागीत, रंगोली आदी कार्यक्रम आवडीने पाहिले जात होते; पण चोवीस तास जगभरातील गाण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळायला लागल्यानंतर या आवडीचे रूप बदलले. यूटय़ूब आल्यानंतर त्यात आमूलाग्र बदल झाला. गेल्या शतकभरातील कोणत्याही भाषेतील लोकप्रिय गाणे सचित्र पाहण्यासाठी फक्त योग्य सर्च देणे आवश्यक बनले. दरम्यान, आपल्याकडे ढिगांनी वाढलेल्या वाहिन्यांच्या तितक्याच अंताक्षऱ्या, संगीत स्पर्धा, आयडॉल यांनी जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांचा वीट येईल इतका मारा केला. त्याचा परिणाम इथे तरुण पिढीला पाश्चात्त्य गाण्यांकडे आकर्षित करण्यात मोठय़ा प्रमाणावर आहे.

आपल्याकडचा संगीत श्रोतृवर्ग खूपच गंमतशीर आहे. तो मैफलीतील संगीत ऐकण्या-पाहण्यासाठी मोफत पासाची चाचपणी करतो. सशुल्क संगीत कार्यक्रम नेहमीच कमी गर्दीचे असतात. पुण्या-मुंबईतील बडय़ा संगीत उत्सवांना गर्दी करणाऱ्यांत दर्दीपणापेक्षा अधिक फॅशनच असते. संगीताकलनापेक्षा आपली तेथील उपस्थिती तिथल्या स्वघोषित संगीत जाणकारांशी स्पर्धा करण्यासाठी अधिक प्रमाणात लावली जाते. हा मुद्दा वादातीत आहे, तरी बहुतांश टक्क्य़ांनी खरा आहे. मैफली, जलशांबाबत पाश्चात्त्य राष्ट्रांतील श्रोतेसम्राट आपल्यापेक्षा किती पुढारलेले आहेत, याचा पुरावा कित्येक लाइव्ह कॉन्सर्टच्या व्हिडीओजमध्ये दिसतो. सिगर रॉस नावाचा आइसलॅण्ड या देशाचा बॅण्ड १९९४ पासून कार्यरत आहे; पण गेल्या दहाएक वर्षांत त्यांची गाणी जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांची गाणी इंग्रजी नाहीत; पण त्यातील शब्दसंख्याच इतकी मर्यादित असते, की ते तरी कुठल्या भाषेत आहेत की नाही, हे कळत नाही; किंबहुना ती निव्वळ गुणगुण असते. वाद्य आणि त्या गुणगुणण्याचा अगदीच हलका वापर करून तयार होणारे त्यांचे संयतसंगीत कानांना नेहमीच सुखावणारे असते. या बॅण्डचे ‘ओल्सन ओल्सन’ हे तब्बल आठ मिनिटांचे चित्रित करण्यात आलेले गाणे या कलाकारांऐवजी श्रोत्यांची खरी संगीतभक्ती दर्शविणारे आहे. देखणे पहाड आणि लांबच लांब पठार असलेल्या एका शेततळावर या गायकांनी आपली वाद्ये मांडून गायन-वादनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. गाणे सुरू होते ते लोक कोणत्याही नियोजनाशिवाय शिस्तीने कार्यक्रमस्थळी गोळा होऊन गाण्याची निवांतता अनुभवतात. फुलबाज्या घेऊन समोर कानांना लाभणारे संगीत अनुभवणारे लहान पोर दिसते, त्याप्रमाणे लॉलीपॉप चघळत अत्ंयत शांतचित्ताने संगीत रिचवणारी मध्यमवयीन बाईही पाहायला मिळते. कुणीही उगाच गालावर हात ठेवून किंवा बोटांची मोड करून संगीत जाणकार असल्याचा दिखावा करीत नाही. जो तो या संगीत जलशात पुरता रमलेला पाहायला मिळतो.

‘द कोर्स’ हा तीन बहिणी आणि एका भावाचा आयरिश बॅण्ड जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये येणाऱ्या श्रोत्यांची संख्याच आपल्याला गांगरून टाकणारी आहे. पन्नास हजारांहून अधिक लोक आयरिश बासरी-व्हायोलियनच्या सुरांवर बेहोश झालेले पाहायला मिळतात, तेव्हा ‘संगीताची ताकद’ या शब्दांवर विश्वास बसायला लागतो. लोक कलाकारांना वाजविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासोबत शिस्तीत टॅपडान्स करताना पाहायला मिळतात. अमेरिकी बॅण्डमेंबर डेव्ह मॅथ्यूज (व्होकल, गिटार) आणि टीम रेनॉल्ड (गिटार) यांच्या लाइव्ह गाण्यांचा व्हिडीओ आणि त्यातल्या उन्मादी स्वरांना अद्भुतरीत्या कवेत घेणारे प्रेक्षक पाहणे सुंदर अनुभूती ठरू शकते. दोन गिटारांव्यतिरिक्त कोणतेही वाद्य न वापरता अध्र्या लाखभर प्रेक्षकांना तल्लीन करणारे कलाकार मोठे आहेतच, पण त्यांना गायन-वादनातील स्वर्गावस्था प्राप्त करून देणाऱ्या श्रोत्यांचे महत्त्व जराही कमी नाही. हैदोसरहित संगीतप्रेमाचे हे कन्सर्ट श्रोतेपण अभ्यासण्यासाठी उपयुक्त आहेत. व्यावसायिक आणि प्रायोगिक संगीत मासिकांना आश्रय देऊन संगीतभक्ती साजरी करणाऱ्या अमेरिकी-युरोपातील श्रोत्यांना खरेखुरे श्रोतेसम्राट म्हणावे लागेल. शेवटी त्यांचे असणे   गायक-वादक यांना लोकप्रिय बनवत असतात. यातील प्रत्येक गायक-वादक संगीतसम्राट आहेच, पण त्यांना घडविणाऱ्या श्रोतेसम्राटांसाठी या क्लिप्स एकदा पाहाच. त्यातील गाण्यातील बोनसचे सौंदर्यही मिळेल.

श्रोत्यांसाठी बघावेत असे काही व्हिडीओ..

पंकज भोसले

viva@expressindia.com