कॉलेज सुरू होऊन आता पुरेसा वेळ गेलाय खरा. तेव्हा मुंबईमधल्या कॉलेज महोत्सवांची तयारी सुरू झाल्याचं चित्र सगळीकडे दिसतंय.
मल्हार, उमंग, एनिग्मा, युथ फेस्टिवल सगळेच ऑगस्टच्या तोंडावर आले आहेत. तेव्हा या रंगीबेरंगी आणि फुल ऑफ व्हरायटीने भरलेल्या कॉलेज फेस्टमध्ये उतरण्यासाठी सज्ज व्हायला हवं.  
एन एम कॉलेजचा ‘उमंग’ फेस्टिवल यंदा १४ ते १७ ऑगस्टदरम्यान होणार आहे. सेंट झेविअर्सचा ‘मल्हार’देखील त्याच सुमारास आहे. सुरुवात मात्र  आर. ए. पोदार कॉलेजच्या ‘एनिग्मा’ फेस्टने होणार आहे.
‘एनिग्मा’ने सुरुवात
कॉलेज सुरू झाले की लगबग सुरू होते ती कॉलेज फेस्टची. ऑडिशन, प्रॅक्टिस, मीटिंग, तयारी यामुळे कॉलेजचा माहोलच बदलून जातो. यंदा कॉलेज फेस्टचा शुभारंभ आर. ए. पोदार कॉलेजच्या ‘एनिग्मा २०१४’ या आंतरमहाविद्यालयीन फेस्टने  होत आहे. हा फेस्ट ७ ते १० ऑगस्ट या कालावधीत होणार असून ‘ द क्वेस्ट’ अशी यंदाची थीम ठेवण्यात आली आहे. ‘रीच फॉर ग्लोरी’ हे बोधवाक्य असलेल्या या फेस्टची संपूर्ण बांधणी थीमला अनुसरून करण्यात आली आहे. नृत्य, खेळ, सिनेमा, फाइन आर्ट, नाटक, वाङ्मय या शाखांशी निगडित विविध स्पर्धा असणार आहेत. ‘क्वीझर्स अरिना’ ही प्रश्नमंजूषा व ‘ऋतुरंग’ हा सांस्कृतिक बाजाचा कार्यक्रम असेल.  कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू झालीय. नुकताच ‘हुज् द अँकर?’ हा प्री इव्हेंट पार पडला. वीरदास, कवी शास्त्री, अनंदिता नायर हे या कार्यक्रमाला परीक्षक लाभले होते.
‘एनिग्मा’च्या आयोजन समितीमधील विशाल करलकर म्हणाला, ‘‘यंदा एनिग्मा ग्रॅण्ड करायचाय, बी.एम.डब्लू. आम्हाला स्पॉन्सर करत आहे. थीमनुसार क्रिएटिव्ह डिपार्टमेंट कामाला लागलेय. सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही काळजी घेतोय आणि त्यासाठी आम्ही सिक्युरिटी पार्टनर ठेवतोय. सेलिब्रिटीजना बोलवण्याची जुळवाजुळव चालू आहे. यंदा सगळे हा फेस्ट एन्जॉय कराल व त्यासाठी आमची टीम सज्ज आहे.’
‘मल्हार’चा रेनेसाँ
‘मल्हार’ हा सेंट झेविअर्स महाविद्यालयाचा गेली ३६ र्वष चालत आलेला ‘ग्रॅण्ड’ फेस्टिवल. सहसा कॉलेज फेस्टिवलचा श्री गणेशा मल्हारच्या या उत्सवाने होतो. यंदा १४ ते १६ ऑगस्टला मल्हारचा जल्लोष आपल्याला दिसणार आहे. यंदाची त्यांची थीम ‘रेनेसाँ’. मल्हारला मिळणाऱ्या पुनरुज्जीवनाच्या संकल्पनेतून रेनेसाँ हे नाव देणं त्यांनी पसंत केलं. त्यामुळे दरवर्षीचा तोचतोचपणा येथे वगळलेला दिसतो. सुमारे हजार स्वयंसेवक यात सहभागी होऊन या महोत्सवाची तयारी करताहेत.
पुस्तक छपाई    
मल्हार म्हणजे केवळ स्पर्धाचं विश्व नव्हे. तिथे तुम्हाला खूप काही शिकायलाही मिळतं. अशाच एका ‘द कव्हर स्टोरी’ नामक इव्हेंटमध्ये पुस्तक छापण्याची कार्यशाळा घेतली जाईल. साधारणत: आपल्याला पुस्तक कसं लिहावं याची कल्पना असते. पण संहिता प्रकाशकाकडे गेल्यावर तिचं काय होतं याचा अंदाज नसतो. तेव्हा या कार्यशाळेत तुम्हाला मुखपृष्ठाच्या रचनेपासून प्रत्यक्ष प्रत छापून निघाण्यापूर्वीच्या क्रियेपर्यंतची माहिती दिली जाणार आहे.
सोशल कॉज
हल्ली बहुतेक सगळ्याच कॉलेज फेस्टिवल्समधून समाजासाठी काही करण्याचा, सोशल कॉज जपण्याचा उद्देश दिसतो. एनिग्मा टीमतर्फे कॉलेज क्लीनअप करण्यात आले. तसेच अनाथाश्रमात जाऊन मदतसुद्धा या विद्यार्थ्यांनी केली. तसेच ‘ग्रीन इनिशएटिव्ह’च्या माध्यमातून एनिग्मा २०१४ ची टीम पर्यावरणाच्या सुधारणेसाठी योगदान करणार असून हा उपक्रम या फेस्टला मागचा सोशल टच देईल असे म्हणायला हरकत नाही.  यंदा मल्हार उत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी मुंबईच्या रस्त्यांवरील कचरा साफ करण्याचं ठरवलं आहे. तिथे सुमारे चार तास कचरा गोळा करून अधिकाधिक गुण मिळवता येतील. तसंच दोन वर्षांपूर्वी तयार झालेलं ‘यार्ड सेल’ यंदाही तुमच्या पुढय़ात असणार आहे. तुम्हाला नको असलेल्या पण उपयोगी वस्तू येथे कमीत कमीत किमतीत गरजूंना विकता येतील. तसंच त्रिधारा हा भारतीय गायन, वादन व नृत्य यांचा संगम. मग ती ठुमरी असो वा कथ्थक! इधर मफिल तोह जमेगी बॉस.
नवी ‘उमंग’
१४ ते १७ ऑगस्ट दरम्यान एन. एम. कॉलेज मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी नवी ‘उमंग’ घेऊन येत आहे. ‘एन. एम.’चा उमंग फेस्ट या काळात आहे. वायर स्ट्रक्चर, थ्री डी ब्रिज मॉडेल यांसारख्या स्पर्धामध्ये वायर, लाकूड, खिळे, कार्डबोर्ड वगरे साहित्यातून सर्जनशील प्रयोग करता येतील. तुमच्याकडे आíकटेक्चर बनण्याची क्षमता असेल तर नक्कीच हे खेळ एन्जॉय कराल. आफ्टर डेथ हा कल्पनाशक्तीला चालना देणारा इव्हेन्ट. मृत्यूनंतर तुमचं आयुष्य कसं असेल याची कल्पना कथित रूपात इथे प्रदíशत करता येईल.
तसंच तुम्ही खेळवेडे असाल तर इथे बास्केटबॉल, बॅडिमटन तर मिळतीलच. सोबत फ्री स्टाइल फुटबॉल, बॉक्स क्रिकेट आणि अगदी काउंटर स्ट्राइक, ब्लरदेखील खेळता येतील. ‘पेहेल’ या स्पध्रेत तुम्हाला बिझनेसमनची भूमिका घ्यायची आहे. त्याकरता तुमचा बिझनेस कशाचा असेल? कसा असेल? हे त्याच्या मोड्यूलसहित प्रत्यक्ष कृतीत आणावे लागेल. आपण किती उत्तम उद्योजक बनू शकतो हे जाणून घेण्याची ही चाचणीच समजा.
तसंच इथे वॉर ऑफ डी. जे. आणि वॉर ऑफ व्ही. जे. दोन्ही आहेत. सुफी गायनाची स्पर्धाही इथे आहे. ‘अर्बन बुलेवर्ड’ अशी यंदाची थीम असल्यामुळे शहरातलं शहरपण जिवंत करणाऱ्या अनेक गोष्टी इथे आहेत. बिट बॉिक्सग, गिटार वॉर, रॅप बॅटल, स्ट्रीट डान्स याचीही धमाल जोडीला आहे. तसंच डेझर्ट फूड, स्प्रे पेंटिंग, ग्लॅमर फोटोग्राफी, स्केटबोìडग यांसारख्या कार्यशाळाही उमंग आपल्याला देतंय.