मार्च महिना जवळ येतो ती परीक्षांची चाहूल घेऊन. पण परीक्षांच्या आधीच वेध लागलेले असतात सुट्टय़ांचे आणि ते बेत आत्ताच बनायला सुरुवात होते. सध्या पर्यटनात वारं वाहतंय रोड ट्रिपचं. भटकंतीचं वेड असणाऱ्या आणि आपला देश मनापासून बघायची इच्छा असणाऱ्यांसाठी रोड ट्रिपसारखं माध्यम नाही. रोड ट्रिप म्हटल्यावर डोळ्यासमोर काही ठरावीक डेस्टिनेशन्स हमखास येतात.  सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते लडाख. बुलेट घेऊन लडाखच्या वाळवंटातून फिरणं हे तरुणाईसाठीचं प्रमुख आकर्षण असतं. याअगोदर हे आकर्षण गोव्याला होतं. गोव्याला मित्रांबरोबर रोड ट्रिप हा अनेकांसाठी सुट्टीचा ड्रीम प्लॅन असायचा.

अनेकांना रोड ट्रिप अनप्लॅण्ड आवडते. पण त्यात रिस्कही आहे आणि थोडं बजेट कोलमडण्याची चिंतादेखील. मुळात रोड ट्रिप प्रत्यक्षात येण्यासाठी खिशाला परवडणारी हवी, ही अनेकांची अपेक्षा असते. रोड ट्रिपचं डेस्टिनेशन ठरवतानाचा हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. एक दोघेच जर रोड ट्रिपला जात असतील तर राहण्याच्या सोयींपासून ते खाण्यापिण्यापर्यंत आखलेल्या खर्चात वाढच होत राहते. त्यामुळे आपण कुठे जाणार आहोत आणि इतका खर्च खरंच करणं त्या ठिकाणासाठी योग्य आहे का हे ठरवणं महत्त्वाचं.

दक्षिण भारतात हंपी, मुन्नार, कोडाई कॅनॉल अशी अनेक ठिकाणं रोड ट्रिपसाठी आयडियल आहेत. हुबळी नदी, कुर्ग, अलेप्पी, मदुराई, शेवरॉय हिल्स, वेल्लोर अशी बरीच मोठी लिस्ट दक्षिण भारत आपल्या कुशीत घेऊन दिमाखात बसला आहे. उत्तर भारतातली स्पिती व्हॅली, लडाख, अरुणाचल तरुणाईच्या हिट लिस्टवर आहे. रोड ट्रिपसाठी काही जण संपूर्ण तयारी करून म्हणजे हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल प्लॅिनग करून जातात, तर काही अनप्लॅन्ड. त्या त्या प्रदेशातल्या भौतिक आणि सामाजिक परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन निघणं चांगलं. अतिउत्साही पर्यटकांना आयत्या वेळी बॅग घेऊन निघण्यात खुमारी वाटते. बॅगपॅक घेऊन दिवसभर निसर्गाची मजा घेत फिरणं नि रात्री हॉस्टेल किंवा तंबू ठोकून राहणं असे पर्यायदेखील कित्येक जण अवलंबताना  दिसतात. मुळात ही बॅगपॅकची संस्कृती पाश्चात्त्य देशातील पर्यटकांमध्ये जास्त पाहायला मिळते. खूप सामान वागवण्यापेक्षा मोकळंढाकळं फिरणं यात अपेक्षित असतं. राहण्याचा खर्च बराच कमी होतो. राजस्थान, पुष्कर भागांमध्ये लक्झरी टुरिझम आहे तसा हा बॅगपॅक टुरिझमदेखील सध्या फोफावतोय तो या रोड ट्रिपवाल्या उत्साही पर्यटकांमुळे आणि बॅगपॅकर्समुळे.

रोड ट्रिपदरम्यान आपण ज्या भागात जात आहोत त्या प्रदेशाला अनुसरून आपली बॅग भरणं महत्त्वाचं असतं. केवळ मजा करण्याच्या उद्देशाने निघण्याऐवजी नवा प्रदेश न्याहाळण्याचा, नवी माणसं जोडण्याच्या आणि नवीन काही शिकण्याच्या उद्देशानं निघालात तर रोड ट्रिपची मजा जास्त येईल. नवा अनुभव खूप काही शिकवून जाईल.

रोड ट्रिपसाठी फर्स्ट एड बॉक्स, खाण्याचे काही सुके पदार्थ, औषधं, भारतातच जात असलो तरी ओळखपत्रं इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी सोबत हव्यातच. कित्येकदा बुलेट किंवा ओपन जीप अशा गाडय़ा रोड ट्रिपचा फील घेण्यासाठी म्हणून वापरल्या जातात, मात्र आपण जात असलेल्या प्रदेशासाठी त्या योग्य आहेत की नाही याचा नक्की विचार करावा. विशेषत: सिक्किम, अरुणाचल, लडाख, स्पिती अशा ठिकाणी किंवा पश्चिम घाटातदेखील अरुंद, कच्चे रस्ते काही ठरावीक गाडय़ांसाठीच योग्य मानले जातात.

गेली काही र्वष रोड ट्रिप्स करणारा आणि रोड ट्रिपबद्दल मार्गदर्शनही करणारा स्ट्रीट्स ऑफ इंडियाचा सहसंस्थापक दीक्षित मुंद्रा सांगतो, ‘अनेक अनुभव आणि खूप काही शिकवून जातात रोड ट्रिप्स. एकदा आम्ही पंधरा जणं राजस्थानला रोड ट्रिपसाठी गेलो होतो. २६०० कि.मी अंतर आम्ही बाइकवर पार केलं होतं. पुष्करमध्ये दिवाळीनिमित्त भरणाऱ्या प्रसिद्ध ‘पुष्कर मेला’ पाहायला गेलो. संपूर्ण राज्य केवळ बॅगपॅक घेऊन फिरलो. दिल्ली ते हृषीकेश ते हिमाचल प्रदेश अशा लांब पल्ल्याच्या अनेक मोठय़ा रोड ट्रिप्सदेखील आम्ही केल्या आहेत. राहणं आणि खाण्याच्या अगदी मूलभूत सुविधा असूनही निसर्ग आणि फिरण्याची आवड यामुळे सतत अशा ट्रिप्स आयुष्य समृद्ध करून जातात.’

रोड ट्रिपसाठी काही ठिकाणं लोकप्रिय मानली जात असली, तरी मुळात रोड ट्रिप कुठेही केली जाऊ शकते. रोड ट्रिप म्हणजे सोप्या भाषेत कुठल्याही प्रकारची खास तयारी न करता किंवा निसर्गाची मजा घेत फिरणं, पर्यटनस्थळदर्शनाऐवजी तो प्रवासच एन्जॉय करणं आणि डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत त्या प्रवासाचं सौंदर्य आपल्यात सामावून घेणं. त्या त्या जागेचा अनुभव घेत पुढे जाणं आणि ठरावीक खाणं-पिणं-राहण्याची पर्वा न करता एखादा प्रदेश येईल तसा अनुभवत राहणं. अर्थात या सगळ्यात प्रत्येकाच्या अनुभवांत फरक पडणं स्वाभाविक आहे. पण मुद्दा असा की, तुमच्या अगदी बाजूचं शहर किंवा गावदेखील तुमच्यासाठी रोड ट्रिप डेस्टिनेशन ठरू शकतं. ट्रॅव्हिलग स्पिरिट महत्त्वाचं!

काही प्रसिद्ध रोड ट्रिप डेस्टिनेशन्स :

  • लडाख
  • राजस्थान
  • रोहतांग पास
  • बरोत व्हॅली
  • बंगळुरू ते नंदी हिल्स
  • मुंबई – गोवा</li>
  • मुन्नार
  • हम्पी- बदामी
  • मध्य प्रदेश
  • मनाली ते लेह
  • चेन्नई ते पुदुच्चेरी
  • गुवाहाटी ते तवांग