दिल्लीत खाजगी टॅक्सी (रेडियो टॅक्सी) मोबाइलवरून बुक करून प्रवास करणाऱ्या तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केल्याच्या घटनेने देशात खळबळ उडाली. एकटय़ा प्रवास करणाऱ्या कितीतरी तरुणींना या घटनेनं धक्का दिला. टॅक्सीने किंवा एकंदरीतच एकटीनं प्रवास करणं कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न त्यानिमित्ताने निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यायलाच हवं हे खरं, पण त्याचबरोबर स्त्रियांनीही काही साध्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी.
* रात्री उशिरा टॅक्सी /रिक्षा करायची असेल तर ती रेल्वे स्थानकाबाहेरील स्टँडवरून करावी. मुंबईत रात्री बारानंतर प्रत्येक महिला प्रवाशाची नोंद ठेवली जाते. त्यामुळे ते सुरक्षित आहे.
* टॅक्सी / रिक्षाचा क्रमांक न विसरता नोंदवून घ्यावा. आपल्या हातात मोबाइल असतो. त्यात कॅमेरा असतोच. त्यातून त्याचा फोटो काढून घ्यावा. हातावर नंबर लिहिला तर तो घामाने पुसला जातो.
* मुंबईत तर महिला प्रवाशांसाठी खास ९९६९ ७७७ ८८८ ही एसएमएस हेल्पलाइन सेवा आहे. टॅक्सी /रिक्षामध्ये बसल्यावर वाहनाचा क्रमांक या हेल्पलाइन नंबरवर एसएमएस करायचा.
पान १ वरून
* ९९६९ ७७७ ८८८ ही एसएमएस सेवा आहे. यात  वाहन जीपीएस प्रणालीद्वारे ट्रॅक केलं जातं. चालकाची संपूर्ण माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. चालकावरही वचक राहतो.
*  ठाण्यात प्रत्येक रिक्षात ट्रॅफिक स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. त्यावर चालकाची संपूर्ण माहिती आणि हेल्पलाइनचे क्रमांक असतात.
*  काही कारणावरून रिक्षा किंवा टॅक्सी चालकाशी वादाचा प्रसंग ओढवल्यास चालकांशी हुज्जत न घालता त्यांची तक्रार परिवहन खात्याच्या क्रमांकावर आणि पोलिसांकडे करू शकता. अशा तक्रारी करणं हल्ली खूप सोप्पं आहे.
*  एकटीने प्रवास करायचा असेल तर मद्यपान करून जाऊ नये. चालकांकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. दिल्लीच्या प्रकरणात तेच झालं होतं
*  आपण टॅक्सी किंवा रिक्षात बसल्यावर आपल्या कुटुंबीयांना किंवा जवळच्या व्यक्तीला सांगून ठेवावं.
*  प्रवासात असताना बॅटरी पूर्ण चार्ज असावी आणि प्री पेड मोबाइल असेल तर पुरेसा बॅलन्स असावा याची खबरदारी घ्यावी. इस्थर अनुह्य़ा प्रकरणात तिच्या मोबाइलमध्ये बॅलन्स नव्हता. त्यामुळे तिला कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नव्हता.
*  आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, याची माहिती नसेल तर चालकाला माहिती आहे, याची खात्री करूनच त्या वाहनात बसावं. चालक अनोळखी ठिकाणी घेऊन जाऊ शकतो.
*  १०० आणि १०३ या हेल्पलाइनचा संकटकाळी वापर करावा.