vn18सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
मीडियाच्या दोन बाजू..
‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे’च्या निमित्तानं ट्विटरकरांनी भरभरून ट्विट्स केल्या. एवढय़ा की तो हा ट्रेण्ड पाचव्या रँकवर होता. या दिवसाच्या निमित्तानं अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा महत्त्वाचा मुद्दा, पेड न्यूज, पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांसाठी डेंजरस प्लेसेस वगरे विषयांवर उलटसुलट ट्विटस् आणि फोटो अपलोड केले गेले. एकूणच पत्रकारांच्या कामगिरीची दखल जगभरात घेतली गेली. तर दुसऱ्या बाजूला याच दिवशी योगायोग म्हणा की आणखी काही, #GoHomeIndianMediaomeIndianMedia या हॅशटॅगचा ट्रेण्ड सोशल मीडियावर अव्वल स्थानी होता. विशेषत: ट्विटरवर नेपाळच्या भूकंपाला आठवडा उलटल्यानंतर नेपाळमध्ये हा टॉप ट्रेण्डिंग टॉपिक होता. काही नेपाळी लोकांनी भारतीय मीडियाला इनसेन्सेटिव्ह संबोधलंय. मीडिया कव्हरेजची पद्धत नेपाळकरांच्या नाराजीचं कारण ठरलेय. विशेषत: How are you feeling? सारखे प्रश्न नेपाळींना काटय़ासारखे बोचताहेत. या ट्विटसमध्ये भारतीय मीडियाच्या अग्रेसिव्हपणावर, असंवेदनशीलपणावर बोट ठेवलं गेलंय. भारताच्या मदतीचा मोलाचा हात मान्य असला तरीही मीडियाच्या वागण्यामुळं काही प्रश्न निर्माण होताहेत, असंही म्हटलं गेलंय.
 
‘२ आर’ की नय्या पार..
टीम इंडियाचा यंग नि स्टायलिश बॅट्समन रोहित शर्माविषयी सोशल मीडियावर चर्चा चाललेय, ती क्रिकेट वगळून वेगळ्याच संदर्भात. स्पोर्ट्स मॅनेजर रितिका सजदेहच्या लव्हबॉलवर क्लीन बोल्ड झालेल्या रोहितनं तिला प्रपोज केलं नि तिनं हे प्रपोजल अर्थातच स्वीकारलं. रोहितनं तिच्यासोबतचा फोटो ट्विटरवर अपलोड केलाय. ‘फ्रॉम बेस्ट फ्रेण्ड्स टू सोलमेट्स कुडण्ट गेट एनी बेटर’ असं ट्विटही रोहितनं केलंय. मग ओघानंच #रितिका हा हॅशटॅग ‘ट्विटर’वर नि रोहित हा ट्रेण्ड ‘फेसबुक’वर टॉप ट्रेण्डिंगमध्ये असला तर त्यात काय नवल..
 
नशीब छोटय़ांचं..
vt09ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज विल्यम्स- केट मिडलटन यांना ‘मुलगी झाली हो..’ अशी ग्वाही फिरवण्यात आल्येय. केनिझग्टन पॅलेसमध्ये याविषयीची घोषणा करण्यात आली नि पाठोपाठ आई-बाबांसोबत छोटीचे फोटो झळकले.. आईच्या कुशीतला वगरे.. ते व्हायरल झाले. तिकडं नेपाळमधल्या भूकंपामुळं झालेलं नुकसान अजूनही उजेडात येतंय. या विपरीत परिस्थितीतही काही आशेचे किरण दिसताहेत. एका अडीच वर्षांच्या लहानगीला तिच्या अवघ्या चार वर्षांच्या भावानं मायेनं कुशीत घेतलंय.. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणखीन काय सांगणार.. फोटोच किती बोलका आहे.

खंडेराया नि बानूबया..
काही महिने गाजत असलेल्या खंडोबा नि बानू यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर वऱ्हाडय़ांनी अर्थात प्रेक्षकांनी बहुसंख्येनं गाठला. मात्र त्याआधी सोशल मीडियावर या लग्नासंदर्भातल्या अनेक पोस्ट, मेसेजेस व्हायरल होत होत्या. अगदी त्यांच्या लग्नपत्रिकेतील मजकुरापासून ते म्हाळसाच्या स्टेटस अपडेटपर्यंत कितीतरी गोष्टी फॉरवर्ड होत होत्या. त्यात ‘खंडोबा-बानूचा संसार नवीन आहे. म्हाळसेनं सर्व प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली आहे. म्हणून आहेर आणाच’ इथपासून ते ‘म्हाळसाचा स्टेटस- फिलिंग अलोन.. विसराल ना रे जानू, जेव्हा तुला भेटली बानू..’ इथपर्यंतची व्हरायटी होती. शिवाय या दुसऱ्या लग्नाच्या विरोधापासून ते आवरा खंडोबाला आता अशा पोस्टही केल्या जात होत्या.

vt10डेव्हिड बॅकहम ‘इन्स्टाग्राम’वर
प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहमनं ४०व्या वाढदिवसानिमित्त आपला पहिलावहिला फोटो ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट केला.

गब्बर रुलिंग हार्ट्स
खिलाडीमॅन अक्षय कुमारच्या ‘गब्बर इज बॅक’नं बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज ओपिनग केली आहे. देशभरात शुक्रवारी प्रदíशत झालेल्या ‘गब्बर इज बॅक’नं एकाच दिवसात १ कोटींचा गल्ला जमवलाय. २०१५ मधील सर्वाधिक ओपिनग मिळवणारा हिंदीतील हा पहिला सिनेमा ठरलाय. ‘गब्बर इज बॅक’मध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा चíचला गेलाय. २००२ मधील तामीळ चित्रपट ‘रमना’चा ‘गब्बर’ हा रिमेक आहे. आधी ‘बेबी’ नि आता ‘गब्बर’ असं अक्षयच्या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगलं ओपिनग मिळल्यानं २०१५ त्याच्यासाठी लकी ठरतंय. ‘अक्कीयन्स’ अर्थात अक्षयकुमारच्या फॅन्सनी हाच मुद्दा उचलून धरत ‘गब्बर’ला वेलकम केलंय. ‘आणखी एक मास्टरस्ट्रोक’, ‘अक्षयकुमार ट्रेण्ड बॅक ऑन ट्रेण्डस्’ आदी ट्विट्सचा भडिमार होतोय. ट्विटरवर हा ट्रेण्ड भारतात चौथ्या क्रमांकावर होता. फेसबुकवरही तो वरचढ होताच. क्योंकी ‘गब्बर इज बॅक’..
 
शशांक-दीपिकाचा यारा
सध्या बहुसंख्य टीव्ही प्रेक्षकांच्या चच्रेचा विषय झालेल्या शशांक केतकरचा ‘यारा’ हा व्हिडीओ रिलिज झालाय. ‘सागरिका म्युझिक’च्या या व्हिडीओला हृषीकेश, सौरभ, (लोकसत्ता ‘व्हिवा’चा सदर लेखक) जसराज यांचं संगीत लाभलं असून शब्द वैभव जोशींचे आहेत. शशांक केतकर नि दीपिका जोग अभिनीत या व्हिडीओला एका दिवसात अकरा हजारांवर व्ह्य़ूज मिळाले होते.
 
 बॉम्बे मेरी जान
‘मुंबई’ हे ऑफिशअल नाव असूनही, अजूनही सर्रासपणं ‘बॉम्बे’ असंच म्हटलं जातं. तर या मुंबईचं फक्त एका शब्दात वर्णन करा, असा ट्रेण्ड ट्विटरवर तिसऱ्या स्थानी होता. #बॉम्बेइनअवर्ड असा हॅशटॅग असणाऱ्या ट्रेण्डवर ट्विटरकरांनी एक सो एक ट्विट केले. मुंबईचं केवळ एका शब्दात वर्णन करणं हे येरागबाळ्याचं काम नाही. तरीही मुंबईकरांनी हे आवाहन स्वीकारत सक्सेस, होम, ह्य़ुमिड, स्पीड, लाइफलाइन, ड्रिम्स, गिव्हर, डायव्हर्सिटी, हेवन, मान्सून, उन्हाळा, अनस्टॉपेबल आदी अनेकार्थी शब्दांत वर्णन करायचा प्रयत्न केलाय. शेवटी मुंबई माझी लाडकी हेच खरं, नाही का?

महाराष्ट्र दिन
vt08बुद्ध पौर्णिमा नि महाराष्ट्र दिनाचं टॉप ट्रेण्डिंग जगाला करुणा नि शांतीच्या संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना अनेक नेटकरांनी अभिवादन केलं. #बुद्धपौर्णिमा हा हॅशटॅग ट्विटर, फेसबुकसह सोशल मीडियाच्या भारतीय ट्रेण्डिंगमध्ये अव्वल स्थानी होता. यानिमित्तानं बुद्धांचे फोटो, वचने पोस्ट होत होते. नेपाळ भूकंपाशी सांगड घालत करुणा नि शांतीचं महत्त्व विशद केलं जात होतं.  
#महाराष्ट्रदिन हा हॅशटॅग ऑल इंडिया ट्रेिण्डगमध्ये अव्वल स्थानी होता. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ट्विटरकरांनी या मराठी हॅशटॅगचा वापर केलेला दिसला. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा, महाराष्ट्राची वैशिष्टय़ दाखवणारे विशेषत: शिवाजीमहाराज, गड-किल्ले वगरेंचा समावेश असणारे फोटोज सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. गर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र माझा आदी स्टेट्स प्रामुख्यानं झळकत होते. त्याखेरीज कामगार दिनानिमित्त ‘गुगल’नं खास ‘डुडल’ तयार केलं होतं. पान्हा, टेप, हातमोजे आदींचा वापर करून तयार केलेल्या या ‘डुडल’मध्ये कामगारांच्या योगदानाचा चित्रांकित सन्मान करण्यात आला.
राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com