मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शांघाय चित्रपटाच्या पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर यांचं व्हिवा लाऊंजमध्ये आगमन झाल्यावर ग्लॅमर क्षेत्रातील अभ्यासाशी जवळून ओळख झाली. सिनेमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे पटकथा लेखन. ऊर्मीला या क्षेत्रातील वैविध्यपूर्ण प्रश्न विचारून बोलतं केलं लोकसत्ताचे प्रतिनिधी रेश्मा राईकवार आणि रोहन टिल्लू यांनी.
कथा फुलवावी लागते...
सिनेमा आपण बघतो, पण सिनेमाची पटकथा व कथा यात नेमका फरक काय हे अनेकांना अजून माहीत नाही. अॅक्चुअली झालंय असं की, बरेचसे शब्द आपण वेगळ्या गोष्टींना वापरतो. एक उदाहरण सांगते, सिनेमाची कथा होती की गरीब मुलाच्या वडिलांना सरकारने फाशी दिली, पण चुकीच्या कारणासाठी दिली. ही झाली कथा. पण पटकथा म्हणजे काय? पटकथेमध्ये तुमची मानसिकता समोर येते. एखादा याच घटनेवर सिनेमा बनवेल. तर दुसरी व्यक्ती तो मुलगा गन उचलून त्या लोकांना मारून टाकेल किंवा तो कोर्टात जाऊन सिद्ध करेल. तिसरा लेखक असं मांडेल की तो मुलगा कदाचित वेडा होईल व काहीतरी हॅण्ड ऑफ गॉड येऊन तो गाडी चालवून नेईल. कथा कोणत्या पद्धतीने सांगायची यापेक्षा ती कशा पद्धतीने फुलवायची हे महत्त्वाचं आहे. कथेला फुलवणं म्हणजेच पटकथा.
एखाद्या डॉक्युमेंटरीची पटकथा असते का?
सगळ्यासाठी काहीतरी संहिता लागते. तुमचा पॉइंट ऑफ व्ह्य़ू घटना ही एक गोष्ट आहे. पण घटनेकडे बघायचा दृष्टिकोन ही एक कथा असते. कुठल्याही घटनेला चार बाजू असतात, त्यातून कथा तयार होते. प्रत्येकाची एक बाजू असते. तुमचा पॉइंट व्ह्य़ू सांगता. तेव्हासुद्धा संहिता लिहावी लागते. संहिता म्हणजे घटना ती कशा पद्धतीने सांगितली तो इम्पॅक्ट. मी फ्लॅशबॅकमधूनही सांगू शकते. डॉक्युमेंटरीमध्ये तुम्ही लोकांना सांगू शकत नाही. यात खूप रिसर्च असतो. बऱ्याच लोकांना भेटता, त्यांचे अनुभव ऐकता, पण तुम्ही साधारणपणे ढोबळमानाने एक विचार करा. एखादी गोष्ट इमॅजिन करून लिहू शकता. पण सिनेमा मात्र तसा होत नसतो, त्यामध्ये खूप काळ जातो. स्क्रिप्ट लिहिण्यासाठी किमान दीड वर्षांचा काळ लागतो. ते एक गाणं किंवा जोक नसतो. खूप सारे विचार असतात. कधी कधी तुम्ही अगदी ब्लँक होता. सतत नवीन काहीतरी सुचत असतं. ही सर्व एक प्रकिया आहे. अचानक काही होत नाही. सिनेमासाठी प्री प्लॅनिंग असावं लागतं.
कला आणि आम्ही...
मी किंग जॉर्जमध्ये शाळेतून शिक्षण घेतलं. त्यानंतर निर्मला निकेतनमध्ये होते. पण मी ज्या घरामध्ये वाढले तिथे मात्र मला अनेक गोष्टींचा अनुभव फार जवळून घेता आला. तो कलेचा एक भाग होता. माझी बहीण, मी आम्ही संगीत, नाच, पेटी वाजवाला शिकणं हे मस्ट होतं. कला ही आमच्या आयुष्याचा भाग होता. नाटकात काम करणं हे बऱ्याचशा घरांमध्ये कम्पलसरी आहे, ते माझ्या घरातही होतं. हे असं सर्व वातावरण माझ्या अवतीभवती होतं.
कथा पटकथा डॉक्युमेंटरी हे फॉर्म कसे हॅण्डल केले? याकरता काही फॉर्मल शिक्षण घेतलं होतं का?
हा प्रश्न खूपदा विचारला जातो. पण अगदी खरं सांगू का आज हा प्रश्न विचारतात तो आजच्या काळातला आहे. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते घडत गेलं. मी कॉलेजमध्ये असताना ओम पुरीने सांगितलं होतं, शाम बेनेगल यांना अभिनेत्रीची गरज आहे. मी तिथे गेले. त्यानंतर मला दुसरं काम मिळालं. मी काहीच नाही म्हणून या क्षेत्राकडे कधीही आले नाही. मला मिळणाऱ्या कामांचं प्रमाण हळूहळू वाढलं. शिवाय माझ्याबाबतीत एक महत्त्वाचं घडल ते म्हणजे माझं लग्न नॉन महाराष्ट्रीय माणसाशी झालं. त्यामुळे क्षेत्र खूप जवळ आलं. मग व्हॉइस ओव्हर करणं कुणालातरी असिस्ट करणं अशी अनेक कामं सुरू झाली. माया मेमसाबला केतन मेहतांना असिस्ट केले. काही टेलिव्हजन प्रोग्राम डिरेक्ट केले अशी विविध कामं मी करत गेले. आज आम्हाला या क्षेत्रात यायचंय मग आम्ही कसं येऊ हे असे प्रश्न मला पडलेच नाही. कारण हाती येत गेलेलं काम मी करत गेले.
आता मला पटकथा होते.
मला कविता येत नाही. नाटक करता येत नाही. मला गोष्ट सुचते तेव्हा ती एक छोटी लाइन असते. ती मला स्क्रिप्ट फॉर्ममध्ये सुचते. पटकथा लिहितानाही अनेक बदल होत असतात. मी मगाशी सांगितल्याप्रणाणे पटकथा म्हणजे मी आता उठून स्क्रिप्ट लिहिते असं नाही. पटकथेत अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. तिथे काय आणि कसं वातावरण असायला हवं या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. खूप छोटय़ा गोष्टींचा विचार करावा लागतो. अगदी भिंतीच्या रंगापासून स्क्रिप्ट लिहिताना विचार करावा लागतो. तुम्हाला मुळात सिनेमाची समज असावी लागते.
माध्यम समजणं महत्त्वाचं आहे...
हे खूप कॉम्प्लिकेटेड माध्यम आहे. त्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टींचा आधी विचार करायला सिनेमामध्ये साऊंड व्हिडीओ, नृत्य, म्युझिक आहे. मला आवड आहे म्हणून मी लिहितो इतकं म्हणून चालणार नाही. पण ज्या माध्यमासाठी तुम्ही लिहिताय ते माध्यम कळायलाच हवं. त्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. हे खूप कॉम्प्लेक्स माध्यम आहे. तुम्हाला खूप छाोटय़ा गोष्टींची कल्पना असावी लागते. हे प्रॉडक्ट नेमकं बनतं कसं..
सिनेमात दोन गोष्टी एकत्र येतात - कला आणि बिझनेस
माझ्या पैशांनी मी सिनेमा बनवत नाही, तोपर्यंत मनाला येईल तसा बनवेल असं होत नाही. किमान त्यातून रिटर्नस् यायला हवेत असं असतं, त्यावेळी तो बोलून दाखवण्याच्या कॅटेगरीत बनवावा लागतो. कसा सिनेमा तुमच्या देशात असावा, हे प्रेक्षकच ठरवतात. या क्षेत्रात खूप त्रास असतो. आपण सांगतोय ते लोकांना कळेल की नाही ही एक मोठ्ठी गोष्ट आहे.
मुख्य म्हणजे सिनेमा हा कला आणि धंदा याचं मिश्रण आहे. एखादा सिनेमा केवळ कलेसाठी असू शकतो किंवा एखादा बिझनेससाठी असू शकतो किंवा दोन्हींचं मिश्रण असू शकतो. अनेक सिनेमा आजही लोकांचं मनं घडवताहेत. सरकार वेगळ्या गोष्टींना मदत करत नाही. तोपर्यंत केवळ मार्केट ड्रिव्हन गोष्टीच चालू
राहतील. त्यामुळे कर वगैरे ही सवलत सरकारकडून मिळायलाच हवी असं मला वाटतं.
अशी घडते क्रिएटिव्ह प्रोसेस...
मझ्यामते सर्वजण क्रिएटीव्ह असतात. क्रिएटीव्हीटी वेगळी अशी काही नसते. तुम्ही प्रत्येक कामात वेगळेपण आणण्याचा विचार करता. म्हणजे तुमच्यात क्रिएटीव्हीटी आहे. प्रॅक्टिस करण्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घ्या. तसंच या प्रॅक्टिसच्या जोडीला पेशन्स हवा. एखादी गोष्ट केल्याशिवाय जगू शकत नाही अशी भावना हवी. म्हणतात ना टेन परसेंट इन्सपिरेशन अॅण्ड नाइंटी परसेंट पर्सिपेरेशन.. पटकथा लिहिणं ही एक कला आहे. जसं न्यूजपेपरचं आर्टिकल लिहिणं तसं.. पटकथा लिहितानाही काही नियम आहेत. तसंच आहे. सिनेमा कळल्याखेरीज पटकथा लिहू शकत नाही. मी वेगवेगळ्या कपॅसिटीने काम केलेलं आहे. जोपर्यंत सिनेमा कसा बनतो हे पाहात नाही तोपर्यंत तुमची नेमकी आवड काय आहे हे कळणार नाही. मी पटकथा बाय चॉइस लिहिलेलं आहे.. हे क्षेत्र शिकून येण्यासारखं नाही. आज अनेक मीडिया इन्स्टिटय़ूट आहे. तिथून तुम्हाला जॉब मिळतो. तुम्ही मला विचाराल कसं येऊ या क्षेत्रात, तर याचं उत्तर नाही. ज्याला या क्षेत्रात काम करायचं असतं तो त्यातल्याच कामाचा एक भाग असतो. तो कुणाला तरी असिस्ट करत असतो. तो काहीतरी करतच असतो. पैसा नाव हे प्रत्येकाला मिळेलच असं नाही.
आमचं घर टिपीकल नव्हतं...
मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणझे आमचं घर टिपीकल मराठी नव्हतं. माझी आई मला ड्रिल मशीन म्हणायची. मला एखादी गोष्ट पटली नाही की मी खूप त्यामागे भुंगा लावत बसायचे. मागे मागे लागायची. माझ्या लग्नाच्या बाबतीतही मी निर्णय घेतला तेव्हा तो घरच्यांना मी स्वत:हून पटवून दिला. तुम्ही तुमचा निर्णय घेत आहात तो कशासाठी घेताय, वाचन या अशा गोष्टींना आमच्या घरात खूप महत्त्व होतं. तुम्ही एक व्यक्ती आहात. तुमच्या वागणुकीसाठी तुम्ही स्वत: जबाबदार आहात. या गोष्टी लहानपणापासून आमच्या मनात रुजल्या होत्या.
सिनेमा भाषेच्या माध्यमातून जास्त पोहोचतो, याबाबत काय म्हणाल...
आपली प्रवृत्ती वेगळी आहे तसाच आपला सिनेमा आहे. आपण जे पाहतो बोलतो ऐकतो तसाच आपला सिनेमा आहे. युरोपात गेला तर फ्युनरलला सर्व लोक शांतपणे उभे राहतात. पण आपल्याकडे मात्र यातलं काही होत नाही. आपण रडतो.. आपण तसे आहोत तर मग आपण सिनेमा कसा वेगळा करणार. तो वेगळ्या धाटणीचा सिनेमा आपल्याला आवडतो. पण आपल्याला तो रुचतोच असं नाही.
पटकथा हे भाषेचं तर सिनेमा दृश्यमाध्यम आहे.
सिनेमा हे दृश्यमाध्यम आहे. मग पटकथा भाषेमध्ये कशी बदली होते हे अधिक महत्त्वाचं आहे. पटकथेचा भाषेमध्ये होणारा बदल असतो तो कसा होतो ही समज असावी लागते. काळ सिनेमामध्ये दाखवूच शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वत: सिनेमाच्या वेगवेगळ्या विभागात काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी छोटय़ा आहेत त्या कळणार नाहीत. हे एक सांघिक काम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषयाचा आवाका काय आहे हे समजायला हवं. एखादी गोष्ट मस्त दिसते, पण ती आपल्या विषयात बसेलच असं नाही.
तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट तोंडी सांगता तेव्हा डोक्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं चित्र उमटतं. सिनेमात चित्र दिसतं तिथे विचार करायची गरज राहात नाही. एखादी गोष्ट प्रभावी आहे म्हणून ती सर्वेसर्वा आहे असं नाही. माध्यम हे व्हच्र्युअल रिअॅलिटीचं होणार आहे हे लक्षात घ्या. प्रभावी आहे हे आज आहे. म्हणून शब्द, आवाज, पुस्तकं तसाच सिनेमा प्रभावी आहे. पण नक्कीच त्यालाही मर्यादा आहेत.
अशी कुठली जागा आहे जिथे तुम्ही रायटर म्हणून हॅंगआऊट करू शकता.
माझ्या अनुभवामध्ये असं आहे डिरेक्टर्स राइटर्सना शोधत असतात. ब्लॉग सुरू करा, पेपरमध्ये लिहा.. सतत लिहिणं सुरू ठेवा. तुमचे स्वत:चे ब्लॉग हे एक प्रभावी माध्यम आहे.
चार घटना कुठल्या पद्धतीने मांडायच्या आणि का मांडायच्या हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे त्याचा सतत विचार करा. पटकथा लिखाण ही एक प्रोसेस आहे.
बिग स्टार्स बिग बजेट...
आपलं वेगळेपण हे लिखाणातून येतं. तुम्ही धंद्याच्या दृष्टिकोनातून सिनेमा बनवत असाल तेव्हा कुठेतरी त्यात तोचपणा नक्कीच येतो. बिझनेसनसच्या दृष्टिकोनातूनही तुम्हाला त्याप्रमाणे सिनेमा लिहावा लागतो. मोठे बजेट हे अनेक मोठे स्टार्स देऊ शकतात. त्यामुळे परतीची हमी असते. त्यामुळे अनेकदा बिग स्टार्सना डोळ्यासमोर ठेवूनच बिग बजेट सिनेमा तयार केले जातात.
आपल्याला पांढरं किंवा काळं हवं असतं...
सर्व चांगलं होतं, पण स्क्रिप्ट बंडल होतं असं हे वाक्य खूपदा ऐकायला मिळतं. आपण सर्व गोष्टींकडे काळं किंवा गोरं असं बघतो. आपण चटचट बोलून मोकळं होतो.
शांघाय सिनेमा काहींना खूप आवडला, काहींना अजिबात नाही आवडला. तो सिनेमा बनवताना असं लक्षात आलं, एकतर दुखद एण्ड करा किंवा सुखद एण्ड करा. तुम्ही आयुष्यात खूप लढे लढता आणि काहीच होत नाही. हे आम्ही म्हटलेलं आहे. शांघायचा एण्ड बऱ्याच लोकांना आवडला नाही. शांघायमध्ये काही आयुष्य फुकट जातात हे माझं म्हणणं लोकांना पटलं नाही. लोकांना एका टाइपची गोष्ट हवी असते. पांढरं किंवा काळं असं हवं असतं. तुम्ही वेगळं दाखवा लोक पाहतात. लोकांनाही तो आवडतो. कित्येक सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. माझा 'आयाम' सिनेमा खूप लोकांनी घरी पाहिला पण थिएटरमध्ये जाऊन पाहिलाय का?
लिखाणाचं टेक्निक...
आपलं असं अनेकदा होतं की, एखादी गोष्ट आपल्याला पूर्णपणे माहीत झाली की ती आपल्याला लिहायला कंटाळा येतो. माझंही काहीसं असंच आहे. मला एखादी गोष्ट माहीत पडली की मग लिहिण्याचा कंटाळा येतो. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असेल तर त्याबद्दल जास्त बोलू नका. नाहीतर तुम्हाला लिहिण्याचा कंटाळा येईल. पुढे काय होईल ही उत्कंठा राहाणार नाही. त्यामुळे लिखाण करणाऱ्यांनी हे टेक्निक म्हणून लक्षात ठेवावं.
स्क्रिप्ट कॉपी होतात त्यावर मग काय करावं लागतं त्यावरून वाद होतात. मग प्रोटेक्शन काय?
मी तीन केसेस लढवल्यात, त्यातल्या दोन जिंकले. आपल्याकडे इंटिलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट नाही. तो कायदा जरा वीक आहे. पण आता मात्र त्याबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झालेली आहे. पण आता मात्र तुम्ही
भांडू शकता. चार सिन इकडचे तिकडे गेले हे तुम्ही सिद्ध कसे कराल?
सिनेमा इज टिमवर्क...
दिबांकर बॅनर्जी बरोबर मी दोन सिनेमा केले. एकदा तुमचं टय़ुनिंग जुळलं की अनेक गोष्टी सोप्या होतात. आपल्याला काम करताना टय़ुनिंग जुळणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याने काम अधिक सोप्पं होतं. माझी पटकथा लिहून झाल्यानंतर कास्टिंग लोकेशनचे फोटो मी नक्की बघते. नंतर एडिटिंगला असते. चांगल्या ग्रुपमध्ये हे तुझं काम नाही असं होत नाही. चांगल्या ग्रुपमध्ये स्क्रिप्टचं वाचन होतं त्यावर काम होतं, त्यात ते अधिक चांगलं होतं. कुठलाही एक विषय सुरू केला तर त्याचा एण्ड काय होईल या अशा अनेक विषयांवर चर्चा होते. म्हणूनच सिनेमा हा केवळ एका व्यक्तीवर नसतो तर त्याच्यामागे एक टीम रात्रंदिवस काम करत असते.
वनलाइन स्टोरी किंवा वन मिनीट स्क्रिप्ट म्हणजे काय?
एका ओळीत कथा सांगा. सिनेमा खूप फोक्स्ड आहे. त्यामुळे ती गोष्ट सांगणं खूप महत्त्वाचं असतं. ती गोष्ट नीट सांगणं हे टेक्निक आहे. खूप जड बोलणं महत्त्वाचं नाही तर नेमकं बोलणं महत्त्वाचं आहे.
कुठलीही कथा पटकथा होऊ शकते का?
नक्कीच नाही. पटकथेला स्वत:चे काही नियम असतात. कथा लिहीतांना आपण रिव्हील न करता लिहू शकतो. पण सिनेमा रिव्हील न करता बनवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कथा पटकथा होऊ शकत नाही. कथा सुचायला खूप काळ जातो. एखाद्या ठराविक कलाकाराला नजरेसमोर ठेवून पटकथा लिहिली जाते म्हणजे तुम्ही जुन्या मापाचा वापर करता. तुमची गोष्ट क्लिअर असते. हा कलाकार हवाय त्याला हेच सूट होईल. पण
अनेक लोक हिरोंना फॉलो करतात. त्याला अनेक कारणं आहेत. त्याही जगाचे काही नियम आहेत. त्यालाही काही ठोकताळे आहेत. शाहरूखला गरीब दाखवलंत तर प्रॉब्लेम येईल की नाही.. स्टार्सबरोबर काम करण्याचे ठोकताळे असतात. ते समोर ठेवून तुम्हाला पटकथा लिहावी लागते.
तुम्ही स्वतला घडवा...
कुणी तुमच्या डोक्यावर बसत नाही. तुम्ही तुमच्या टर्मस्वर काम करायला सुरुवात करा. त्यालाही एक काळ जातो. माझ्या स्क्रिप्टला पैसे मिळत नाहीत, मी ती द्यायची का नाही हे मी ठरवायचं. सिनेमा बघायला लोक वेगवेगळ्या कारणानी येतात त्याचे पैसे मला मिळतात. त्याला वेगवेगळे पैलू आहेत. या सर्व बिझनेसच्या गोष्टी असतात. त्यामुळे इथे आपल्याकडे काय आहे हे महत्त्वाचं आहे. घरी आणून तुम्हाला कुणी काही देऊ शकत नाही. त्यामुळे आधी स्वतला घडवण्याचा प्रयत्न करा. आधी स्वतला घडवा आणि मग तुमच्या टर्मस्वर काम करा.
प्रेक्षक काळाप्रमाणे बदलला आहे का?
हो शंभर टक्के.. माझ्या मते कथेमध्ये होत असणारे बदल हे प्रेक्षकांच्या साक्षरतेमुळे आहे. प्रेक्षक काळाप्रमाणे बदलत गेलेला आहे. मुख्य म्हणजे सिनेमामध्ये पैसा कुठून येतोय यावरही सिनेमा बदलत गेलेला आहे. आता नक्कीच वैविध्य आलेलं आहे यात मान्य आहे. पैसा कोण घालतं यावर ते बदलेलं आहे. काळाप्रमाणे बदलत गेलेला आहे सिनेमा.
ऊर्मी जुवेकर यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या www.youtube.com/LoksattaLive
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















