रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची ‘स्वेच्छानिवृत्ती’ चांगलीच ‘व्हायरल’ होतेय. त्यांच्या समर्थनार्थ चळवळ उभी राहतेय. कलियुगात या आधुनिक रामाला मिळालेले ‘व्हायरलत्व’ जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

अर्थ, वित्त, फायनान्स अशा सुदृढ संकल्पनांपासून सामान्य माणसाची फारकतच असते. रोजचं जिणं महाग झालेल्यांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर गौण असतो. मात्र हा माणूस आपलं जगणं सुकर किंवा नकोसं करू शकतो याची जाणीव आता होऊ लागली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही ‘स्वेच्छानिवृत्ती’ चांगलीच व्हायरल होतेय.
‘राम’ हा शब्द एवढा संवेदनशील का होतो याविषयी आमच्या मनात अमाप कुतूहल आहे. श्रीराम सेना, गोलियो कीं रासलीला-रामलीला, रघुराम राजन! आयडियल स्टेटची संकल्पना म्हणजे रामराज्य. आदर्श प्रारूप असं आपण इंटलेक्च्युअल मराठीत त्याला म्हणूया. आदर्श म्हटल्यावर काहीही वाद, विवाद, गोंधळ, गडबड, झोल व्हायला नकोत. (‘आदर्श’ नामक सहकारी सोसायटीवरून झालेला वाद निव्वळ योगायोग समजावा.) पण नेमकं तेच होतं. कॉर्पोरेट कल्चरमध्ये ‘पेपर टाकले’ अशी एक टर्म असते. बेटर प्रॉस्पेक्ट्स सदराअंतर्गत मनुष्य राजीनामा देतो ती स्थिती. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी तेच केलंय. मन:शांती हा त्यांच्यासाठी बेटर प्रॉस्पेक्ट असावा.
आतापर्यंत स्पर्धा परीक्षा आणि प्रसारमाध्यमात इंटर्नशिप करायला येणाऱ्या मुलांना विचारला जाणारा हमखास प्रश्न एवढय़ापुरतीच रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची लोकप्रियता होती. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरची, त्यांच्या भूमिकेची, निर्णयाची एवढी चर्चा होणं हे आपली आर्थिक साक्षरता किंचित पुढे सरकल्याचं लक्षण मानायला हवं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाणावलेल्या अर्थतज्ज्ञांमध्ये रघुराम यांचा समावेश होतो. याच रघुराम यांनी अमेरिकेला जगविख्यात लेहमन ब्रदर्सच्या पाश्र्वभूमीवर आर्थिक घसरणीचा इशारा दिला होता. अमेरिकेच्या दुर्दैवाने तो खरा ठरला. रघुराम यांना ‘फिशर ब्लॅक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लहान वयात अर्थकारणात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सेंट्रल बँकेचा सवरेत्कृष्ट गव्‍‌र्हनर म्हणून असंख्य पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. जगातल्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचं नाव आहे. आयआयटी इंजिनीअर, आयआयएम गोल्ड मेडलिस्ट आणि ‘एसेज ऑन बँकिंग’ विषयात पीएचडी. शिकागो विद्यापीठात इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर. इंटरनॅशनल मॉनेटरी फंडात चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून काम. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मानद आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत. केंद्रीय अर्थखात्याचे चीफ इकॉनॉमिक अ‍ॅडव्हायझर म्हणून काम पाहिलेलं. वाचून अवाक आणि दमायला होईल असं हे प्रोफाइल. यापल्याडचे रघुराम आपल्यासाठी महत्त्वाचे. पन्नाशी पार केल्यानंतरही ते तिशीतले दिसतात. कदाचित म्हणून तरुणी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. ते आवर्जून टेनिस आणि स्क्वॉश खेळतात, मॅरेथॉनमध्येही पळतात. मात्र ते खरं आणि थेट बोलतात. आणि हो बोललेलं ‘करूनही दाखवतात’. चमकोगिरीपेक्षा वाईटपणा घेतात ते. कटू असलं तरी लोकप्रिय लाटेविरोधातले निर्णय घेतात. त्यावर ठाम राहतात. कोणाच्या तरी वेस्टेड इंटरेस्टसाठी ते बँकाँचे ‘इंटरेस्ट रेट’ खाली आणत नाहीत. बँकांच्या अबब अशा थकबाकी रकमांकडे ते लक्ष वेधतात. महागाई नियंत्रणात राहावी आणि आपला ब्राझील होऊ नये यासाठी सातत्याने उपाय योजतात. ‘क्रोनी कॅपिटलिस्ट’ अर्थात भांडवलदारांच्या मक्तेदारीला ते वेसण घालू पाहतात. अर्थविश्वाच्या पल्याडच्या विषयांवरही ते भूमिका घेतात. अर्थ, वित्त अशा जटिल विश्वात राहूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला मिश्कीलपणा जिवंत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सरकारी बाबूंना एक दिवस सामान्य माणसाचं जिणं जगून बघा. म्हणजे व्यवस्थेत किती सुधारणा हवेय त्याचा अंदाज येईल असा सल्ला दिला होता.
पैसा, रिस्पेक्ट, रेकगनिशन, डेझिगनेशन, फॅसिलिटीज आणि कामाचं समाधान हे नोकरी करण्याचे मूळ निकष. एका जॉबमध्ये हे सगळं मिळत नाही असं म्हणतात. बोगस व्यवस्थेला कंटाळून अनेकजण देश सोडतात. त्याच वेळी देशासाठी काहीतरी करूया म्हणत विदेशातून भारतात परतणारेही बरेच आहेत. त्यांच्यासाठी पैसा प्रॉयॉरिटी राहिलेली नसते. आपल्या ज्ञानाचा उपयोग व्यवस्थेला व्हावा अशी तळमळ असते. पण भारतात येऊन आपला रघुराम होण्यापेक्षा एनआरआय स्टेटसच बरी असा विचार रुजू शकतो. बाहेर राहून व्यवस्थेला शिव्या देत उंटावरून शेळ्या हाकू नका असा टोमणा लगावला जातो. मात्र व्यवस्था कोळून पिऊन ती नीट व्हावी यासाठी झगडताना व्यवस्थेतले प्रस्थापित तुमच्या विरोधात जातात हा धडा मिळालाय. रघुराम यांच्या राजीनाम्यानं सायबर टोळ्यांचा उन्माद अधोरेखित झाला आहे.
पाठीचा कणा नसलेल्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. नोकरीच्या कंत्राटावर उमेदवाराने भूमिकाहीन, सामाजिक बांधिलकीविरहित रोबोटिक ओडरलेस असावं असा कणालेस क्लॉज आल्यास आश्चर्य वाटायला नको. आरबीआय गव्हर्नर हे तसं मखरातलं पद. पण रघुराम यांनी क्लास आणि मास दोन्हीचा विचार केल्याने त्यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर त्यांना पदावर कायम ठेवण्यात यावं यासाठी ऑनलाइन पिटिशन उपक्रम सुरू झालाय. दैनंदिन जीवनात अर्थबोंब झेलणाऱ्या अनेकांनी रघुराम यांना गव्हर्नरपदी कायम ठेवा या भूमिकेतून पोस्ट्स, ब्लॉग, निवेदनं प्रसिद्ध होत आहेत. व्होटबँकेपेक्षा सर्वसमावेशक विचार केल्याने राजकीय शक्तींनी दिलेल्या त्रासापेक्षा सामान्य माणसाकडून झालेलं अप्रायझल रघुराम यांचा हुरूप वाढवणारं असेल. माझ्या निमित्ताने रिझव्‍‌र्ह बँकेचं गव्हर्नरपद पर्सनलायझ करू नका. अर्थव्यवस्थेची काळजी घेणारा सक्षम गव्हर्नर बँकेला मिळेलच असं सांगत रघुराम यांनी व्यवस्थेचं मोठेपण सांगितलं आहे. काही महिन्यांतच रघुराम शिकागोचं विमान पकडतील. तेच शिकागो जिथे स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषेदत केलेलं भाषण गाजलं होतं. आता मात्र शिकागो म्हटल्यावर ‘हे राम’ म्हणत खंत व्यक्त करणं आपल्या हाती उरेल..