पिक्चरमधल्या गोष्टी प्रत्यक्षात घडत नाहीत आणि प्रत्यक्षातल्या गोष्टी पिक्चरमध्ये दिसत नाही हा जनरल ट्रेंड. पण कधीकधी चक्र उलटं फिरतं. समज, गैरसमजांची परीक्षा होते. आपल्याही आयुष्यात अकल्पित असं घडू शकतं. अशीच एक व्हायरल झालेली फिल्मी कहाणी पण खरीखुरी.

अम्बोरिश रॉय चौधरींनी अंधेरीहून सीएसटीकरता लोकल पकडली. प्रवासादरम्यान त्यांनी पाठीवरली जड सॅक वरच्या रॅकवर ठेवली. वडाळा स्टेशनला ते उतरले. वेळ रात्री अकराची. उतरून डोक्यातल्या विचारांच्या नादात चालू लागले. प्लॅटफॉर्म तुडवून बाहेर पडतानाच त्यांना एकदम सॅक आठवली. जड ओझं मांडीवर नको म्हणून सॅक वर ठेवली पण ट्रेनमधून उतरताना सॅक घेतलीच नाही हे त्यांना जाणवतानाच आपल्या हातून भयंकर चूक झालेय हे त्यांच्या लक्षात आलं. ते उलटे फिरले आणि ट्रेनच्या दिशेने धावत सुटले. पण उपयोग नव्हता. ट्रेन कधीच निघून गेली होती.
त्या राहिलेल्या सॅकमध्ये होता लॅपटॉप- साधासुधा नाही.. अ‍ॅपल कंपनीचा मॅकबुक एअर. लोक स्वत:चा एखादा अवयव ट्रेनमध्ये गर्दीत राहिला तर फार दु:ख करणार नाहीत, पण मांडीसंगणक आणि तोही सफरचंदी निर्मात्यांचा. संपलंच सगळं! ईबुक रीडर, पुस्तकं आणि नेहमीच्या वस्तूही होत्याच. पण त्यांचं दु:ख कमी होतं. मुख्य ऐवज असलेल्या मांडीसंगणकाची किंमत ७४ हजार ५०० रुपये. अम्बोरिशजींनी वडाळ्याच्या स्टेशनमास्तरकडे धाव घेतली. एवढय़ा रात्रीच्या पाहुण्याने त्यांना कामाला लावलं. रेल्वे हेल्पलाइन नंबर दिला. फोनाफोनी सुरू झाली. पोलिसांनी ट्रेन कुठली, डबा कितवा वगैरे विचारलं. स्पेसिफिक डबा कोणता त्यांना सांगता आलं नाही. प्रश्नोत्तरं सुरूच राहिली. अम्बोरिशजींनी छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठलं. तिकडेही बरी माणसं भेटली. पोलिसांनी ट्रेन्स शोधल्या होत्या जमेल तेवढय़ा. पण अम्बोरिशजींची सॅक काही सापडली नाही. त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. सॅक गेली बहुतेक कायमचीच या विचारात त्यांनी पोलीस स्टेशन सोडलं. निघताना नाव, नंबर, पत्ता दिला. ट्रेनमधून वस्तू चोरीला गेली की सहसा मिळत नाही. अम्बोरिशजींची सॅक चोरीला गेली नव्हती. पण मिळालीही नव्हतीच. सॅक गेली, तक्रार नोंदवायला हवी या विचारातून त्यांनी पुन्हा वडाळा गाठलं. वडाळा-सीएसटी-वडाळा या धावपळीत त्यांनी सोशल मीडियाला साद घातली. ‘माझ्या चुकीमुळे सॅक राहिली आहे. त्यामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कृपया कोणाला मिळाल्यास या फोननंबर किंवा पत्त्यावर संपर्क करावा’. फेसबुकवर पोस्ट टाकली, ट्विटही केलं. मध्य रेल्वेने प्रतिसाद देत तपशील जाणून घेतले. कळलं काही तर सांगू असा रिप्लायही आला.
इकडे अम्बोरिशजी वडाळ्याला आले पण तक्रार नोंदवून घ्यायला पोलीस तयार नव्हते. पण त्यांची जिद्द पाहून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. सगळं होऊन घरी निघायला २ वाजले रात्रीचे. घडलेला प्रकार घरच्यांना ऐकवला आणि ते झोपले. अम्बोरिश राहतात त्या कोपरखैरणेतल्या कॉम्प्लेक्सच्या गेटवर सकाळी एक माणूस हजर झाला. पॉश वस्तीतल्या कॉम्प्लेक्समध्ये आत जाण्यासाठी जसे हवे होते तसे कपडे आणि अपिअरन्स नव्हता त्या माणसाचा. त्याला प्रवेश मिळेना. बरीच जद्दोजहद केल्यानंतर त्या माणसाला आत सोडण्यात आलं. उशिरा झोपल्यानं अम्बोरिशजी नुकतेच उठलेले. बेल वाजली, दार उघडलं. समोर पाहिलं तर मळकटलेला टीशर्ट आणि पँटवर एक माणूस उभा होता. त्याच्या पेहरावाला न साजेशी सॅक होती बरोबर त्याच्या. अम्बोरिशजींचे डोळे विस्फारले. त्या माणसानेही हातातल्या कागदावरून नावाची खात्री करून घेतली. अम्बोरिशजींनी त्याला आत बोलावलं. मॅकबुक, ईबुक रिडर, पुस्तकं असलेली सॅक त्या माणसाने अम्बोरिशजींच्या हाती सोपवली. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्यांनी अनेकदा त्याचे आभार मानले. ही वस्तू किती महत्त्वाचं आहे सांगितलं. तुम्ही किती मोठं काम केलंय हेही सांगितलं. सॅक आणि आतल्या वस्तू जशाच्या तशा परत मिळाल्याच्या सुखद धक्क्यातून सावरल्यानंतर चहा, खाणंपिणं झालं. अम्बोरिशजींना हे कसं घडलं जाणून घ्यायचं होतं. तो माणूस म्हणाला- ‘मी विरेश केळे. भायखळ्याला केटरिंगमध्ये काम करतो. काही वेळा काही स्पेशल ट्रेन्सला फूड सप्लाय करतो. त्या रात्री सीएसटीहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये मी असणं अपेक्षित होतं. पण मला उशीर झाला. साहेबांनी हीच ट्रेन पनवेलहून पकडू शकतोस सांगितलं. मग मी हार्बर लोकल पकडली. पनवेल ट्रेनमध्ये बसलो. झोप कधी लागली कळलंच नाही. जेव्हा उठलो तेव्हा ट्रेन रिकामी होती. जी ट्रेन पकडायची होती ती केव्हाच गेली होती. अशा अवेळी काय करणार असा विचार करत असतानाच सॅक दिसली. बेवारस वस्तूला हात लावताना भीती असते. पण सॅक चांगली वाटली. उघडून पाहिलं तर वस्तू होत्या. आता ही सॅक द्यायची कशी विचार करतो, तेवढय़ात एका जीर्ण पाकिटावर नाव आणि पत्ता दिसला. वस्तू कामाच्या दिसत होत्या, म्हणून तुमचं घर गाठलं’.
अम्बोरिशजी भारावून गेले. पैशांनी तुमच्या माणुसकीची परतफेड होणार नाही, पण माझ्या समाधानासाठी स्वीकार करा असं अम्बोरिशजी म्हणाले. पण विरेशने पैसे किंवा वस्तू घ्यायला नकार दिला. मी माझं कर्तव्य केलं म्हणाला. अम्बोरिशजी चित्रपट संदर्भात लेखन करतात. त्यांनी कृतज्ञ मनाने वीरेशची कहाणी शेअर केली सोशल मीडियावर. आजकाल माणुसकी राहिली नाही म्हणणाऱ्या सगळ्यांसाठी धडा.
(लेखक, कवी अशी क्रिएटीव्ह मंडळी आपल्याच विश्वात असतात, त्यांना जगाचं भान नसतं. हा समज की गैरसमज ?.. तुम्हीच ठरवा.)