मध्यंतरी व्हच्र्युअल आयडेंटिटी सुसाइडची कन्सेप्ट चर्चेचा विषय होती. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरची अकाउंट धडाधड डिलीट केली होती तेव्हा. पण आता त्यातले अनेक जण नव्याने अवतीर्ण होत आहेत. व्हच्र्युअल आयडेंटिटी ऑन-ऑफ होणं कॉमन झालंय. काय आहेत त्यामागची कारणं?

आज बऱ्याच दिवसांनी जवळजवळ महिन्या-दीड महिन्यानंतर सगळी गँग भेटणार होती. अगदी नैसर्गिक आपत्ती आली तरी भेटायचंच असं ठरलं होतं व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर. सगळे जण जमले पण अजून सुजयचा पत्ता नव्हता. फोन लावायला घेतला, तेवढय़ात सुजय आलाच. त्याचं पडलेलं तोंड पाहूनही सगळ्यांनी त्याला धारेवर धरलंच, पण काही केल्या हा पठ्ठय़ा मात्र बोलायला तयार नव्हता. शेवटी ग्रुपमधल्या त्यातल्या त्यात चाणाक्ष आणि बाकीच्यांपेक्षा जरा जास्त ‘अनुभवी’ अंकितानं ओळखलं आणि त्याला डायरेक्ट गुगली टाकला, ‘सुज्या, चील! ब्रेकअप झालंय ना तुझं आणि सोनालीचं? बऱ्याच दिवसात व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा सेल्फी दिसला नाही आणि फेसबुकवरून तर तू गायबच आहेस.’ असा अनपेक्षित अ‍ॅटॅक झाल्यावर सुजयनं सांगायला सुरुवात केली.. अगदी ‘देवदास’च्या सुरात. ‘झालं ब्रेकअप.. महिन्याभरापूर्वीच झालंय. ती असते सारखी ‘एफबी’वर ऑनलाइन असते आणि तिच्या त्या मैत्रिणीपण. मग उगाच मेसेज करत बसतात, मग मला त्याचा ‘त्रास’ होतो. म्हणून म्हणलं नकोच ते. अकाउंटच डिलीट केलं.’ सुजयचं हे वाक्य पूर्ण होतंय न होतंय तोच सगळे जण सॉलिड हसले. ओघानेच तो त्या दिवशीचा बकरा ठरला, जाम खेचली सगळ्यांनी आपल्या ‘देवदास’ अवस्थेतल्या मित्राची!

आपल्याही आजूबाजूला व्हच्र्युअल वर्ल्डमध्ये असे बरेच लोक आजूबाजूला दिसतील जे काही वेळ अज्ञातवासात जातात. व्हच्र्युअल वर्ल्डमधली आयडेंटिटी ‘ऑफ’ ठेवतात आणि अचानक एक दिवस पुन्हा प्रकट होतात, एकदम फुल ‘ऑन’! फेसबुकवर पूर्वीपासून असणाऱ्या अनेक जुन्या मित्र-मैत्रिणींची फ्रेंड रिक्वेस्ट नव्याने येत असल्याचा अनुभव अनेकांना येतच असेल. ट्विटरवरही नव्या नावाने टिवटिव करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढतेय. व्हच्र्युअल आयडेंटिटी ऑन-ऑफ करण्यामागे नेमकी काय मानसिकता आहे? जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

हल्ली सुजयसारखंच ‘ब्रेकअप’ हे कारण व्हच्र्युअल आयडेंटिटी ‘ऑफ’ करण्यासाठीचं पहिल्या नंबरचं कारण आहे. म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ सारखी ऑनलाइन असते मग बोलण्याचा मोह होतो. बोलणं सुरू केलं की, कधी त्याचं परत भांडणात रूपांतर होतं कळतच नाही. ‘तिचे’ किंवा ‘त्याचे’ बेस्ट फ्रेंड ऑनलाइन असले की, उगाचच नको ते अपडेट्स देत बसतात एकमेकांबद्दल. पुन्हा फेसबुकवरच्या फोटोंमुळे उगाच जुन्या आठवणींना उजाळा देत बसावं लागतं. अगदी आपण डिलीट केलेले असले तरी दुसऱ्या कुणी टॅग केलेले फोटो वारंवार न्यूजफीडमध्ये डोकावत राहतात. ‘चुकून’ पूर्वीची चॅट्स, कॉनव्हरसेशन्स वाचली जातात, ‘वॉल’वर ‘सेंटिमेंटल’ गोष्टी शेअर केल्या जातात आणि आपल्या या ‘अज्ञातवासाचं’ सो कॉल्ड ‘सिक्रेट’ यार दोस्तांमध्ये उघडं पडतं. मग एकतर ग्रुपमधलं वातावरण एकदम सांत्वनपर होतं नाही तर जाम टर उडवली जाते. त्यापेक्षा अनेक जण सरळ अकाउंट डिलीट करून मोकळे होतात.

या व्हच्र्युअल आयडेंटिटी ‘ऑन-ऑफ’ बद्दल जरा गप्पा मारल्या आणि दुसरं कारण जे समोर आलं ते फारच धक्कादायक होतं.. ‘अभ्यास’! कॅन यू बिलीव्ह धिस? सबमिशन्स, मिडसेम, फायनल वगैरे जवळ आली की तो संपूर्ण महिनाभर तरी कटाक्षानं सोशल नेटवर्किंगपासून दूर राहायचं. ‘नेट पॅक’च टाकायचा नाही, हा एक ऑप्शन.

अशा अज्ञातवासात असणाऱ्या अभ्यासू मित्र-मैत्रिणींची संख्या सध्या वाढतेय. याबाबत पुण्यात उच्चशिक्षण घेणाऱ्या प्राची घुटेचं म्हणणं आहे, ‘परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी म्हणून जरी नेट रिचार्ज केलं तर जरा बोअर झालं की सोशल नेटवर्किंग साइट्सवर लॉगइन केलं जातं आणि मग ती मारुतीची शेपटी काही केल्या संपत नाही, वायफळ गोष्टींवर विचार करण्यात वेळ जातो मग या सगळ्यात अभ्यास पार बाजूला राहतो. त्यापेक्षा अशा ‘युद्ध काळा’त मी शक्यतो ‘नेट पॅक’ टाकत नाही.’

कॉलेज शिक्षण नुकतंच संपवून आता नोकरीला लागलेली पीयूषा धोत्रे म्हणते, ‘कॉलेजमध्ये होते तेव्हा मी बऱ्याचदा सोशल नेटवर्किंग साइट्सवर ऑनलाइन असायचे. पण आता जॉब आणि एकूणच बिझी शेडय़ुलमुळे सारखे अपडेट्स चेक करणं शक्य होत नाही. पहिल्या काही वेळा अपडेट्स बघण्याच्या नादात बऱ्याचदा ऑफिसमध्ये ओरडा खावा लागला. शेवटी मी अकाउंट डिलीट केलं आणि काही दिवसांपूर्वीच नवीन अकाउंट ओपन केलंय आता स्वत:ला काही लिमिट्स घालूनच सोशल नेटवर्किंगवर टाइमपास करणार.’ पूर्वी कधीतर काही कारणानं संपर्कात आणि फ्रेंड म्हणून अ‍ॅड झालेले असे अनेक अनोळखी चेहरे कधी तरी वात आणतात. सतत काही ना काही अपडेट्स करत राहतात, टॅग करत बसतात. ते सगळं चेक करण्यात वेळ जातो आणि त्यांना अचानक अनफ्रेंड करणंही बरं दिसत नाही. म्हणून मग फ्रेंड्सची संख्या लिमिटेड ठेवण्यासाठी अकाउंट डिलीट करणारेही आहेत. नव्याने अकाउंट उघडताना असं ऊठसूठ नको त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करायची नाही, असं ठरवून ते सोशल नेटवर्किंगवर ऑन होतात.

तर मंडळी या अशा नेटवर्किंगच्या जाळ्यात आपण अनंत वेळा आतून बाहेर आणि बाहेरून आत करत असतो, मग ते ‘देवदास’ म्हणून असो किंवा ‘अभ्यासू’ म्हणून किंवा निव्वळ कंटाळा आला म्हणून.. असा हा अज्ञातवास ते प्रकट दिन प्रवास आजकाल बराच कॉमन झाला आहे, हे खरं!

राजश्री जाखलेकर