हॉटेलात गेल्यावर मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या हॉटेलचं मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.

लो कॅलरी रेड ग्रेव्ही
लो कॅलरी रेड ग्रेव्ही करताना यात आपण काजू मगजचा वापर केलेला नाही. पण लोणी आणि तेल वापरलेले आहे. तेसुद्धा तुम्ही वगळू शकता किंवा त्याचे प्रमाण कमी करू शकता, पण एवढे मात्र खरे की काजू व मगज न वापरल्याने यात २०० ते २२५ कॅलरीचा फरक पडू शकतो.
साहित्य : आलं-लसूण पेस्ट अर्धी वाटी, लो कॅलरी बेसिक व्हाइट अर्धी वाटी (एक किलो ग्रेव्हीकरिता चार चमचे गव्हाची कणीक भाजून ती लो फॅट मिल्क किंवा पाण्यात मिसळून पेस्ट करा), धने-जिरे पावडर एक चमचा, टोमॅटो प्युरी अर्धा किलोची, कसुरी मेथी अर्धा चमचा, खडा मसाला पावडर अर्धा चमचा (घरी जेवढे खडे मसाले उपलब्ध असतील त्याला बारीक करून पावडर करावी), हळद- छोटा पाव चमचा, मीठ, साखर व तिखट  चवीप्रमाणे, व्हिनेगर एक चमचा, तेल दोन चमचे, तेजपान १-२, खाण्याचा रंग आवश्यकतेनुसार.
कृती : पातेल्यात तेल घालून त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी. ते शिजल्यानंतर टोमॅटो प्युरी, खडा मसाला, तमालपत्र, व्हिनेगर घालून तेल सुटेस्तोवर परतावे. यानंतर लो कॅलरी बेसिक व्हाइट घालून चवीनुसार मीठ, साखर, हळद, तिखट, कसुरी मेथी, थोडेसे पाणी घालून गरम करावे. मिश्रणाला थोडे तेल सुटल्यावर तुमच्या आवडीप्रमाणे टोफू किंवा पनीर फ्रेश क्रीम व कोिथबीर घालून बटर नानबरोबर सव्‍‌र्ह करावे.
टीप : १) रंगाचा वापर करणे जरुरी नाही, पण रंग टाकल्यास तो आकर्षक वाटत असल्यामुळे पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.

फलधारी कोफ्ता
साहित्य : कच्ची केळी चार ते पाच नग, रेड ग्रेव्ही एक वाटी, गरम मसाला एक चमचा, आलं-लसूण पेस्ट- दोन चमचे, तिखट- एक चमचा, हळद- छोटा अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, धने-जिरे पावडर १-१ चमचा, भाजलेली कणीक २-३ चमचे, तळायला तेल.
कृती : एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद व मीठ घालावे व या पाण्यात केळ्याचे तुकडे करून शिजवून घ्यावेत. साल काढून हे केळे कुस्करून घ्यावे. यात आले-लसूण पेस्ट, धने-जिरे पावडर, तिखट, हळद मीठ चवीनुसार घालून एकजीव करून घ्यावे. भाजलेल्या कणकेच्या साहाय्याने गोळे करून मंद आचेवर तळून घ्यावे. फ्राय पॅनवर ग्रेव्ही घेऊन पाणी घालून गरम करून त्यात कोिथबीर व तळलेले कोफ्ते घालून पोळीबरोबर सव्‍‌र्ह करावे.
टीप : १) कोफ्ते चिकट होऊ नयेत म्हणून आपण भाजलेल्या कणकेचा वापर करणार आहोत. कणकेऐवजी तुम्ही कॉर्नस्टार्चचाही वापर करू शकता. तसे केल्यासही ग्रेव्ही स्वादिष्ट होते.

बेसिक रेड (टोमॅटो) ग्रेव्ही
ही ग्रेव्ही तशी उत्तर भारतीय. यात व्हिनेगरचा वापर करतात. या ग्रेव्हीत मी कांद्याचा वापर केलेला नाही. पण यामुळे चवीला कुठेही धक्का बसलेला नाही. कुणाला कांदा हवा असल्यास टाकू शकता.
मुख्य भारतीय ग्रेव्हींमधील ब्राऊन ग्रेव्हीनंतर सर्वाना आवडणारी अशी ही बेसिक रेड म्हणजे टोमॅटोची ग्रेव्ही. यात टोमॅटोचा वापर मुख्यत्वे केला जातो. काही ठिकाणी ताज्या टोमॅटोऐवजी बाजारात मिळणारी टोमॅटो प्युरी वापरतात. पण प्युरीमुळे तुमची ग्रेव्ही काळपट होते. या ग्रेव्हीत लहान मुलांना आवडणाऱ्या पनीर बटर मसाल्याबरोबर फलधारी कोफ्ता किंवा सगळ्यांना प्रिय असे बटर चिकन बनवतात.
साहित्य : एक किलो टोमॅटोच्या प्युरीकरिता टोमॅटो बारीक चिरून उकळून घ्यावा किंवा वाफवावा. यात वरून पाणी घालू नये. अंगच्याच पाण्याने शिजवावे. त्यामुळे प्युरी घट्ट होईल. मिक्सर-ग्राइंडरमध्ये बारीक करून चाळणीतून गाळून घ्यावी. काजू, मगज पेस्ट २ वाटय़ा (काजू, मगज १-१ वाटी घेऊन उकळून घ्यावे व त्याची पेस्ट बनवावी). आलं, लसूण पेस्ट एक वाटी, धणे पावडर एक चमचा, जिरे पावडर एक चमचा, कसुरी मेथी एक चमचा, खडा मसाला पावडर एक चमचा, (घरी जेवढे खडे मसाले उपलब्ध असतील ते  बारीक करून पावडर करावी), हळद पाव चमचा, मीठ, साखर व तिखट चवीप्रमाणे, रेड ऑरेंज रंग छोटा १/२ चमचा (नसíगक रंगाकरिता एक वाटी बीटाचा रस, पाव चमचा हळद एकत्र उकळून आटवावे व तो रंग वापरावा), व्हिनेगर २ चमचे, तेल अर्धी वाटी, तमालपत्र ३-४.
कृती : पातेल्यात तेल घेऊन त्यात आलं-लसूण पेस्ट टाकावी. थोडे पाणी घालून मिश्रण उकळल्यावर, पारदर्शक झाल्यावर टोमॅटो प्युरी, काजू, मगज पेस्ट घालून थोडेसे पाणी व तमालपत्र घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर सर्व मसाले, मीठ घालून पुन्हा उकळी येईस्तोवर किंवा तेल सुटेस्तोवर परतावे. थंड केल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.
टीप :  १) आलं-लसणाच्या पेस्टऐवजी पाणी वापरल्याने ग्रेव्हीला एक प्रकारचा मऊ व चकचकीत पोत येतो.
२) व्हिनेगरचा वापर टोमॅटो किती गोड वा आंबट आहेत हे पाहून करावा. ग्रेव्ही करताना शक्यतोवर गावरानी टमाटर वापरू नये.
३) रेड ऑरेंज रंग वापरण्याऐवजी हा प्रयोग करून पाहा – एक वाटी बीटाच्या रश्श्यात छोटा अर्धा चमचा हळद घालून त्याला उकळणे व हे मिश्रण रंगाऐवजी वापरणे.

बटर चिकन
साहित्य : बेसिक रेड ग्रेव्ही दोन वाटय़ा, बटर दोन चमचे, फ्रेश क्रीम- दोन चमचे, चिकन, आंबट चक्का किंवा घट्ट दही- एक वाटी, हळद- छोटा अर्धा चमचा, धने-जिरे पावडर दोन चमचे, कस्तुरी मेथी- दोन चमचे, आलं-लसूण पेस्ट चार चमचे, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, मदा भाजलेला- छोटा एक ते दीड चमचा, रेड ऑरेंज रंग. छोटा पाव चमचा.
कृती : दह्यामध्ये धने-जिरे पावडर, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, रेड ऑरेंज रंग, एक चमचा व्हिनेगर, भाजलेला मदा इ. घालून हे मिश्रण चिकनला आतून-बाहेरून चांगले चोळून दीड ते दोन तास झाकून ठेवावे. यानंतर चिकनला जर तंदूरमध्ये भाजायचे असेल तर एका सळईला ते लावून मंद आचेवर भाजून घ्यावे, मध्ये मध्ये तेल लावावे. असे भाजलेले चिकन बाहेर काढून त्याचे मनाप्रमाणे तुकडे करून घ्यावेत.
एका पातेल्यात दोन वाटय़ा ग्रेव्ही घालून त्यात बटर घालावे. थोडे पाणी घालून उकळावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून मंद आचेवर चार ते पाच मिनिटे शिजवावे. असे तयार झालेले चिकन सव्‍‌र्ह करताना यावर फ्रेश क्रीम घालून बटर नानबरोबर सव्‍‌र्ह करावे.