सोशल साइट्सवर तुफान लोकप्रिय ठरलेल्या आइस बकेट चॅलेंजनंतर त्याच धर्तीवर आणलेले राइस बकेट चॅलेंज आणि १० लोकांची नावं जाहीर करून आवडीच्या पुस्तकांची लिस्ट पोस्ट करायला लावणारं ‘बुक बकेट चॅलेंज’ सुरू झालं आणि त्यालाही प्रतिसाद मिळाला. आता विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी या सोशल मीडियावरच्या चॅलेंज मॅनियाचा मोठय़ा कुशलतेने वापर केला गेलाय. इग्नायटेड विंग्ज या स्वयंसेवी संस्थेने जास्तीत जास्त मतदान व्हावे, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम सुरू केलाय. यामध्ये एक व्यक्ती ‘आय विल व्होट’ अशी ग्वाही देत आपल्या फ्रेंड लिस्टमधल्या १० विश्वासू लोकांना टॅग करते आणि त्यांना ‘आम्ही मतदान करू’, असे शपथवजा आव्हान दिले जाते. मतदानाच्या हक्काची जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही साखळी आपल्यापर्यंत कधी येऊन पोहोचते याची वाट पाहण्यापेक्षा मतदान करण्याची आजच शपथ घ्यायला हवी!