यंदाच्या १६व्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी सज्ज असलेले सगळेच पक्ष तरुण मतदारांच्या जवळ जायचा प्रयत्न करताहेत. तरुणाईही उत्साही दिसतेय. पण हा नवमतदार किती सजग आहे, कितपत सज्ज आहे, कसा विचार करतोय आणि काय अपेक्षा ठेवून आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘व्हिवा’नं एक छोटासा सव्‍‌र्हे घेतला. या सव्‍‌र्हेच्या निरीक्षणांवर आधारित हा लेख.
हल्ली रोज सकाळी पेपर उघडावा तसे ४-५ नेते पायाशी लोळण घेतात.. म्हणजे त्यांचा प्रचार करणारी पॅम्पलेट्स, जाहीरनामे यांचा स्पर्श पायाला झाल्याने आपण मतदार‘राजा’ आहोत हे पटायला लागतं. रोज नवे नेते आणि रोज नव्या घोषणा. येऊ घातलेल्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात तरुण नवमतदार असल्याने निरनिराळ्या मार्गानी पक्ष तरुणांना आपलसं करण्याच्या प्रयत्नात आहेत. या सगळ्याला तरुणाईही तितकाच उदंड प्रतिसाद देतीये. फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप वर सतत केले जाणारे पोस्ट/स्टेटस अपडेटस् पाहून आमची पिढीही इतका विचार करतेय हे जाणवून बरं वाटतंय. याच तरुणाईला बोलतं करण्यासाठी ‘व्हिवा’नं एक छोटासा सव्‍‌र्हे केला. आम्ही पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यातील काही प्रमुख शहरांतील १८ ते २५ वयोगटातल्या तरुणाईशी बोललो, ऑनलाइन चर्चा केली. यातला प्रत्येक जण पहिल्यांदाच मतदान करणारा होता. या चर्चेवर आधारित हा लेख..
सोशल नेटवर्किंगचा प्रभाव
यंदाच्या १६व्या लोकसभेच्या निवडणुकांचं वैशिष्टय़ म्हणजे मोठय़ा प्रमाणात असलेला नवमतदार आणि सोशल साइट्सचा प्रभावी वापर.!! फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवर सतत कॅम्पेिनग पोस्ट, न्यूज अपडेट्स, नमो व्हर्सेस रागाचे फोटोज, एके-४९चे मेसेज शेअर होत असतात आणि निरनिराळ्या राजकीय मुद्दय़ांवर तावातावाने भांडत चर्चाही रंगतात.. अण्णांचं आंदोलन ते यंदाचं इलेक्शन यादरम्यान फेसबुक हे ‘प्रतिक्रियावादी माध्यम’ आता ‘व्यक्त होण्याचं माध्यम’ बनलंय. ‘मतदान करण्यासाठी उत्सुक’ असे टाकलेले स्टेटस, आपल्या आवडत्या पार्टी लीडरचे फोटो डीपी म्हणून ठेवणं या सगळ्यातून परीक्षांचा हंगाम असूनही तरुणाईमध्ये निवडणुकीचा उत्साह जाणवतोय. हल्ली प्रत्येक गोष्टीत ना आपण सोशिअली ‘अवेअर’ असतो आणि ‘रिअ‍ॅक्ट’ होतो. तरी ४५ टक्के तरुणांच्या मते ते अजूनही वर्तमानपत्र आणि न्यूजचॅनल्स ही माध्यमं मतपरिवर्तनासाठी किंवा मत ठरवण्यासाठी प्रभावी आहेत. राजकीय विचारांवर प्रभाव टाकणारी आहेत. राजकीय विचारांवर प्रभाव टाकणारं माध्यम म्हणून सोशल नेटवर्किंग साईट्स हे केवळ ९ टक्के तरुणांनी टिक केलंय. इंटरनेट सर्फिग १२ टक्के तरुणांना प्रभावी माध्यम वाटतं. म्हणजेच सोशल साइटस् आपल्यात ‘अवेअरनेस’ आणतात ‘कॉन्शिअसनेस’ नाही.!! 

आय हेट पॉलिटिक्स.. नही चलेगा!
‘वन व्होट कॅन िब्रग चेन्ज’, ‘नहीं चाहिये भ्रष्ट सरकार’, ‘वी वॉन्ट चेन्ज’ हे असे सगळे मोटोज निवडणुकीच्या दरम्यान जरा जास्तच ठळकपणे जाणवू लागतात. आपल्या सगळ्यांनाच बदल हवा आहे.. पण कसा?? याचा मात्र विचार होताना दिसत नाही. ‘आय हेट पॉलिटिक्स’ असं अनेक तरुणांचं विशेषत: मुलींचं म्हणणं पडलं. अनेकींनी या सव्‍‌र्हेची उत्तरं देणं याच कारणासाठी टाळलं. पण यावर.. नो यू कान्ट!! असंच म्हणावं लागेल. राजकारणाचा तिरस्कार करणं परवडणारं नाहीये. कारण आपण या सिस्टीमचा एक भाग आहोत.
लोकशाही म्हणजे काय रे भाऊ?
‘इथे काहीही खपवून घेतलं जाणार नाही, ही लोकशाही आहे’, असं आपण मोठय़ा तोऱ्यात म्हणतो, पण खरंच लोकशाही म्हणजे काय हे किती जणांना माहितीये? सव्‍‌र्हेच्या निरीक्षणांनुसार ३० टक्के तरुणांना आमदार-खासदारांमधला फरक माहीत नाहीये तर ४५ टक्के तरुणांना आपापल्या प्रभागाचे आमदार-खासदार माहीत नाहीयेत. सगळ्या राज्यांमध्ये विधान परिषदा असतात का या प्रश्नावर ५५ टक्के तरुणांनी ‘हो’ असं उत्तर दिलंय. मित्रहो, सगळ्याच राज्यांत विधान परिषदा नसतात बरं का!
पॉलिटिक्स आणि पॉलिटिकल सायन्स हा फक्त आर्ट्स स्टुडन्ट आणि यूपीएससी अ‍ॅस्पायरंट्सने सीरियसली घ्यायचा विषय ठरवूनच टाकलंय आपण? बहुतेकांच्या मते, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला वेळ नाहीये.. वेळ नाहीये कारण आपल्याला समजावून घ्यायची गरजच वाटत नाही. सगळ्याच गोष्टी गृहीत धरल्यात आपण! पॉलिटिशिअन्स म्हटलं की पसे खाणारच.. उमेदवार आहेत तर ‘पूर्ण न करण्यासाठी’ आश्वासन देणारच..!!
मत देताना कशाचा विचार?
मत देताना कशाचा विचार कराल, असं विचारल्यावर कॅम्पेिनग आणि मीडिया इमेजपेक्षाही, उमेदवार, त्याचा पक्ष आणि आयडीऑलॉजीला ६० टक्के तरुणांनी महत्त्व दिलं. घराणेशाही-भ्रष्टाचार-गुन्हेगारी या मुद्दय़ांची स्वाभाविक चीड सगळ्याच नवमतदारांमध्ये दिसली. उमेदवाराचं शिक्षण, चारित्र्य, समाजकार्य या गोष्टी मत ठरवताना महत्त्वाच्या मानतो, असंही त्यांनी नोंदवलंय.
तरुण मतदारांमध्ये निवडणुकांबाबत उत्साह चांगला दिसतोय. मतदानाचं महत्त्व आणि नागरिक म्हणून जबाबदारी याचं भानही आहे हे यातून दिसतं. पण आणखी थोडा सिस्टीमबाबत, पॉलिसींबाबत विचार करून आणि समजावून घेऊन आपली मतं ठरवणं गरजेचं आहे. नुसता मोबाइल घ्यायचा असला तरी १० वेळा आपण फीचर्स कम्पेअर करतो. हाच विचार उमेदवार निवडताना गरजेचा असतो हे विसरता कामा नये. व्होटिंग करणं ही खरं तर दोन-पाच मिनिटांची प्रोसेस असते. पण त्या आधीची विचारांची एक मोठी प्रोसेस गरजेची असते.. सो नाऊ लेट्स िथक रॅशनली अँड कॉन्शियसली..!!