वजन कमी करण्यासाठी, स्पेशालिटी डाएट मस्ट असंच सांगितलं जातं. खाण्यापिण्यावरील असंख्य र्निबध आणि त्याबाबत अनेक समज, गरसमज ऐकून संभ्रम निर्माण होतो. वजन कमी करायचं म्हणजे कठोर डाएट पाळावंच लागणार असं सांगितलं जातं. पण वेट मॅनेजमेंट एक्सपर्ट डॉ. आम्रपाली पाटील यांनी आहारावर कोणतेही र्निबध न घालता वजन आटोक्यात ठेवण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

‘डाएट’ हा शब्द वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रत्येकाकडून हल्ली सर्रास वापरला जातो. उदाहरणच द्यायचे झाले तर फ्रूट डाएट, सूप डाएट, व्हेजी डाएट, नॉन-व्हेजी डाएट, ज्युसी डाएट वगरे, वगरे. पण असे कोणतेही खास  डाएट न पाळताही वजन आटोक्यात ठेवता येते. अर्थात याकरिता दिवसभरात आपण काय आणि किती खातो यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे ठरते. दिवसभराचा आहार विभागून घेणे, खाण्याच्या भावनिक इच्छेला बळी न पडता खाण्यातील पोषण घटकांकडे लक्ष ठेवणे, या उपायांचा दीर्घकाळ अवलंब केला तर आपले वजन निश्चित आणि कायमस्वरूपी नियंत्रणात ठेवणे बहुतेकदा शक्य होते. ‘लूज वेट विदाउट डाएट’ हे शक्य करून दाखवण्यासाठी काही साधे उपाय देत आहे.

ब्रेकफास्ट मस्ट  
सकाळचा नाश्ता न घेतल्याने, शरीरातील अतिरिक्त चरबीचा साठा वापरला जाऊन कमी होतो हा समज पूर्ण चुकीचा आहे. या उलट सकाळी उठल्यानंतर आरोग्यपूर्ण, पुरेसा ब्रेकफास्ट घेतल्याने भूक शमविण्यासाठी चिप्स, पिझ्झा, बर्गर असे फाजील वजन वाढवणारे खाद्यपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा टाळता येते. कायम लक्षात असू द्या ‘हेल्दी ब्रेकफास्ट हेल्प्स टू रिडय़ूस वेट.’ ठिकठिकाणी झालेल्या संशोधनांतून असे दिसून आले आहे की नियमित ब्रेकफास्ट करणाऱ्या व्यक्तींचा बी.एम.आय.(बॉडी मास इंडेक्स) समाधानकारक असतो. हेल्दी ब्रेकफास्टसाठीचे साधे सोपे पदार्थ म्हणजे पोहे (ओटमील  किंवा दलिया उत्तम), व्होल ग्रेन सीरिअल्स आणि साय काढलेले दूध आणि फळे.   

जिभेवर ताबा   
वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर विनाकारण किंवा वेळ जात नाही म्हणून काहीतरी सतत खात राहण्याची सवय सोडायला हवी. आपल्याला लागलेली भूक ही मानसिक(आभासी-फॉल्स हंगर) आहे की शारीरिक (खरीखुरी) हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. अगदी खावेसे वाटलेच तर ग्रीन टी / योगर्ट / फ्रूट्स/ लो फॅट आइस्क्रीम असे पदार्थ निवडावेत.

भाज्या आणि फळांवर ताव मारा.
भाज्या आणि फळांचा आहारात मोठय़ा प्रमाणावर समावेश करा. कारण यांमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या तंतुमय पदार्थामुळे पोट साफ होण्यास व परिणामी पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते, तसेच यांतील पोषण द्रव्ये शरीराला उपकारक ठरतात. तेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या आणि फळांवर खुशाल ताव मारा.

तहानेसाठी पाणी आणि फक्त पाणीच

खूप वेळा तहानलेले असताना आपण भरपूर साखर घातलेले फ्रूट ज्यूस किंवा कोल्डिड्रक (शीतपेय) यांचे सेवन करतो आणि शरीरात आणखी उष्मांकांची भर घालतो. या द्रव पदार्थामुळे आपल्याला तात्पुरते ताजेतवाने वाटले तरी त्यांतून पुरेशी पोषणमूल्ये शरीराला मिळत नाहीत. तेव्हा तहान भागविण्यासाठी पाणी किंवा थंड पाणी, फार फार तर थोडासा फळांचा रस पिणे सर्वात उत्तम.

कीप मूव्हिंग
आतापर्यंतच्या सर्वेक्षणांतून असा निष्कर्ष निघाला आहे की, सतत मेहनतीचे किंवा िहडण्या-फिरण्याची कामे करणाऱ्या व्यक्तीचे वजन, दिवसभर एकाजागी बसून काम करणाऱ्या व्यक्तीच्या वजनाशी तुलनाकरता कमी किंवा नियंत्रणात असते. घरात किंवा घराबाहेर, दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा चालण्याचा, जलद चालण्याचा प्रयत्न करा.

अवेळी, अवांतर खाण्याचा मोह टाळा.
आहारावर कोणतेही र्निबध न आणता वजन कमी करायचे असेल तर वजन वाढवणाऱ्या खाद्यपदार्थापासून दूर राहा किंवा असे पदार्थ न खाण्याचा मनोमन निर्धार करा. कोणतीही खाद्यवस्तू खाण्यापूर्वी ती खाण्याची आवश्यकता आणि तिचा शरीराला होणारा उपयोग मनाशी तपासून पाहा. मनोवृतीतील हा बदल, अनावश्यक खाणे व वजनवाढ रोखण्यास नक्की मदत करतो.

गो फॉर लो कॅलरी फूड
खाद्यपदार्थाची निवड करताना लो कॅलरी पण हेल्दी फूड आयटम्सना प्राधान्य द्या. उदाहरणार्थ- चिझी डीपच्या ऐवजी साल्सा किंवा हमस निवडा. नेहमीच्या मेयोनीजला पर्याय म्हणून मस्टर्डस्प्रेडचा वापर करा. कोल्डिड्रकपेक्षा पाणी किंवा नेहमीच्या बटाटय़ाऐवजी रताळ्याचा खाण्यासाठी वापर करा.
ही एवढी खबरदारी घेतलीत तर खाण्यापिण्यावर फारसे र्निबध न घालता, सर्व काही खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्याची किमया तुम्ही सहज साध्य कराल.