मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गेले काही दिवस मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्यांनी आपल्याला वेढलेलं आहे. हा अत्याचार केवळ घराबाहेरच नाही तर घराबाहेरही होताना सर्रास दिसत आहे. केवळ मुलगी आहे म्हणून हे अत्याचार होताहेत की, समाजाची मुलींकडे पाहण्याची नजर बदलली आहे हे असे अनेक प्रश्न सध्या पडत आहेत. यावरच आपल्या सेलिब्रिटी वर्तुळामधून विविध प्रक्रिया उमटल्या. या प्रत्येकीच्या मनात आज केवळ एकच प्रश्न आहे की मी सुरक्षित आहे का? या संदर्भात सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया..
अतुला दुगल
शेअर रिक्षातही एखादा पुरुष सहप्रवासी लोचटपणा करण्याची शक्यता असते. यावरून परिस्थिती किती ढासळली आहे याची कल्पना येते. आमच्या क्षेत्रात रात्रौ उशिरापर्यंत काम झाल्यावर प्रॉडक्शनच्या वतीने गाडीची व्यवस्था झाली तर अडचण नसते, अन्यथा खूप अवघड होते. इतकेच नव्हे तर येथे करिअरची आखणी करतानाही खूप अवघड जाते. दहा चांगली माणसे भेटली, तरी शंभर वाईट माणसे येथे आहेत. कसेही करून मला नाव मिळवायचे आहे, असे माझे झपाटलेपण नाही. तशा क्रेझी मुली रस्ता चुकण्याची शक्यता असते, पण त्या गप्प राहतात. दिल्ली प्रकरणानंतर बऱ्याच ठिकाणी बलात्कार झाल्याची वृत्ते येऊ लागली. याचा अर्थ आता अन्यायाबद्दल चीड व्यक्त होत आहे. अगदी दुर्दैवी पालकही न्याय मागू लागलेत. पण नराधमांना सार्वजनिक स्थळी कठोर शिक्षा द्यायला हवी तरच जरब वाढेल. आयटेम डान्सर, इंटरनेट, पोर्नो यामुळे 'पुरुष' चेकळला असे म्हणावे तर त्यांच्यावरचे संस्कार गेले कुठे असा प्रश्न पडतो. ही एक 'सायको' क्रिया आहे व खूप भयंकरही आहे. सावध राहायचे, दुसरे काय?
अनुष्का शर्मा
अत्यंत व्यथित करणाऱ्या अशा या दुर्दैवी घटना आहेत. 'मटरू की बिजली का मंडोला' या माझ्या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी दौरे सुरू असतानादेखील दिल्लीपासून इकडेतिकडे घडणाऱ्या अशा गोष्टींवर माझे लक्ष होते. माणूस इतका व असा राक्षसी का वागतो नि त्याला जबाबदार कोण याला नेमके असे उत्तर नाही. एकीकडे आपण, आपला समाज, आम्ही स्त्रिया प्रगत झाल्याच्या गोष्टी करतो, ते अनेक बाबतीत खरेदेखील आहे. पण त्याच वेळी त्याच आपल्या समाजात स्त्रियांवर अन्याय व्हावा हे खूप मन:स्ताप देणारे आहे. या बिघडत्या स्थितीला सिनेमा, त्यातले आयटेम डान्स जबाबदार नाहीत. कोणत्याही गोष्टीचे खापर चित्रपटावर फोडण्याची जणू फॅशनच आहे. शिक्षण व प्रबोधन याचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे, हे या साऱ्यावरून जाणवते.
मिता सावरकर
हे लैंगिक अत्याचार आताच होऊ लागले आहेत व फक्त आपल्याच देशात होतात असे नाही. वर्षांनुवर्षे जगात हे सुरू आहे, आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पण अत्याचार कोणत्याही प्रकारचा असू शकतो, एखाद्या व्यक्तीला नाहक त्रास देणेही गुन्हा आहे. गुन्हेगार हा प्रथम मनात तयार होतो आणि नंतर तो राक्षसी रूप धारण करतो. अशा या मनाच्या स्वच्छतेचे काय? ते बी कोण जाळणार? हे सगळे घडण्यातील मूळ शोधायला हवे. पण ते करणार कोण? वातावरणात एक प्रकारची हतबलता दिसते हे वाईट आहे. काल जे दिल्लीत झाले ते उद्या मुंबईत, परवा आणखी कुठे होईल, पण ज्यांच्या मुलीवर हे संकट ओढवते, त्यांच्या आई-बाबांचे काय बरे होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. समाजात प्रेमभावना, सहृदयता संपत चालली आहे का? कोवळ्या मुलींवरही हात टाकला जाऊ लागला आहे ही तर विकृती आहे.
वृन्दा गजेन्द्र
समाजातील सर्व घटकांत उत्तम शिक्षण व चांगले संस्कार झाले तर अशा प्रकारच्या घटना कमी होतील असा मला विश्वास वाटतो. असे प्रकार नेमक्या कोणत्या वर्गात होतात याचा काही सामाजिक संस्थांनी शोध घेतला तरी बरेच प्रबोधन होऊ शकेल. पूर्वी अमेरिकेत अशा प्रकारच्या घटना खूप होत, पण त्यांनी त्यावर नियंत्रण आणले. आपण मात्र त्या मार्गाने जाऊ नये असे वाटत असेल तर आपल्या घरातूनच त्याची सुरुवात करायला हवी. मी माझ्या अकरावीत असणाऱ्या मुलाला लैंगिक विषयावरील 'बालक पालक' चित्रपट दाखवला व 'मुलगा-मुलगी वयात येताना' नेमके काय होते- काय असते यावर त्याच्याशी चर्चादेखील केली. विविध प्रकारे अशी जागरूकता आणता येईल. पण डान्सबार बंद होणे, अन्यही काही सामाजिक बंधने येणे यातून काही 'पुरुषां'च्या वासना इतरत्र 'नजर' टाकत असाव्यात असे वाटते. काही युवतींना रात्रौ एक-दीड वाजेपर्यंत 'घराबाहेर' वावरण्याचे दिलेले स्वातंत्र्य खूप 'घातक' आहे. काही युवती तर अशी काही वस्त्रे घालतात की, एक स्त्री म्हणून मला त्याची 'लाज' वाटते. म्हणजेच वाढत्या अत्याचाराला काही प्रमाणात स्त्रियादेखील जबाबदार आहेत असे म्हणावे लागते. इंटरनेटमुळे काही वाह्य़ात-अश्लील गोष्टींचा प्रसार वाढलाय. त्यावर कसे नियंत्रण आणणार याचा विचार करायला हवा.
तृप्ती भोईर
इंटरनेट म्हणजे सेक्सचा अल्बम अथवा आगार झाल्याने सगळेच सामाजिक-सांस्कृतिक-लैंगिक वातावरण बिघडत चालले आहे व त्यातूनच स्त्रियांवरच्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. माझ्या 'टूरिंग टॉकीज' चित्रपटातील 'रांडा' शब्दाला सेन्सॉर आक्षेप घेऊ शकले, पण इंटरनेटवर र्निबध कसा आणणार? हे अमेरिकन कल्चर आहे असे आपण म्हणतो, पण तिकडे युवतीने बिकिनीत वावरणे कॉमन गोष्ट आहे, आपली संस्कृती तशी आहे का? तर नाही. तात्पर्य, या दोन्हीचा संबंध लावणे चुकीचे आहे. आधुनिक पाऊल म्हणून इंटरनेटचा प्रसार वाढताना त्यात 'प्रौढांसाठी'च्या साईट्स शालेय विद्यार्थी सहज पाहू लागलेत. ते धोकादायक आहे. त्याचा मेंदूवर थोडा थोडा परिणाम वाढतो व तीन-चार वर्षांनी तोच मेंदू भलते-सलते साहस करायला धजावतो. त्यामुळे मुलगी बारावी उत्तीर्ण झाल्याशिवाय पालकांनी घरात इंटरनेट आणू नये, एकूण बिघडती स्थिती पाहता पालकांनी गीता-श्लोक शिकवणाऱ्या सामाजिक संस्थेत मुलांना पाठवावे. हीच तर बदलत्या काळाची गरज आहे. मी माझ्या अकरा वर्षांच्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून इंटरनेट काढले आहे. ते घरी नकोच.
निशा परुळेकर
या एकूणच वाढत्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहायलाच हवे. पूर्वी स्त्रिया 'चूल आणि मूल' यामध्ये अडकून होत्या, पण खंबीर होत्या. पुरुषसंस्कृतीपासून दूर होत्या. त्यामुळे असे काही घडण्याचे प्रकारच नगण्य होते. आता एकूणच समाज बदलत चालला आहे, सामाजिक मोकळेपण आले आहे हे कितीही खरे असले तरी मुंबईसारख्या पंचतारांकित शहरातील पाश्चात्त्य वस्त्रांची स्टाइल, क्लब-पबमध्ये रात्रौ उशिरापर्यंत नाचणे, काही युवतींचे चक्क सिगारेट व दारू पिणे असा वाढता चंगळवाद व स्वैरपणा घातक आहे. तो पुरुषांना उद्दीपित करू शकतो. ती अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. अर्थात, अशा सगळ्याच मुली वाईट नसतात की सगळेच पुरुष विचित्र नजरेने पाहतात असेही नाही. पण ढासळती सामाजिक स्थिती पाहता आपण कलियुगात तर चाललो नाहीत ना असा प्रश्न पडतो. पोलीस बंदोबस्त वाढवून काही समस्या रोखता येतील असे म्हटले जाते. पण राजकारण्यांसाठीच बराचसा फौजफाटा वापरला जात असेल तर समाजाचे रक्षण ते कधी करणार?
मृण्मयी कोलवालकर
कॉलेज परिसर, कॉलेजचे कॅन्टीन, बस स्टॉप, नाका, रिक्षा स्टँड अशा कुठेही वात्रट वा वाह्य़ात मुलांनी शेरेबाजी केली रे केली अथवा काही अश्लील कॉमेंट्स केल्या रे केल्या की तेथल्या तेथे जाब विचारायची हिंमत मुलींनी दाखवावी. म्हणजे पहिल्याच पायरीवर अशा वृत्तीला रोखले, जरब बसवली की त्यांच्यात पुढे मोठा गुन्हा करण्याच हिंमत होत नाही. पण बऱ्याचदा मुली म्हणतात, कशाला या फालतू मुलांना भाव द्यायचा? त्या गप्प राहिल्यानेच परिस्थिती बिघडते. खरं तर विविध प्रकारच्या नोकऱ्या व सोशल लाइफ यामुळे युवतींना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहावे लागत आहे, पण नेमका त्याचा उलटा अर्थ काढला जातो व त्या चुकतात असे म्हटले जाते. तसेच बऱ्याचशा अन्यायग्रस्त मुली उगाच आपले नाव खराब होईल, सगळीकडे बोंबाबोंब होईल या भीतीने गप्पदेखील बसतात व एखादेच प्रकरण बाहेर येते. यापेक्षा अशा प्रत्येक दुर्दैवी मुलीने आवाज उठवावा व त्या मुलीला इतरांनी भावनिक-मानसिक आधार द्यावा. बदलत्या वा बिघडत्या सामाजिक स्थितीबद्दल आजच्या पिढीला अगदी लहानपणापासूनच जाणीव करून देणे खूप गरजेचे झाले आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण निश्चिंत असू असा मुलींना विश्वास वाटेल असे वातावरणदेखील निर्माण व्हायला हवे. अशा प्रकारातील गुन्हेगारांना लगेचच शिक्षा हा त्यातला एक मार्ग आहे.
प्राजक्ता दिघे
राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'दामिनी'मध्ये मी अशाच अत्याचारग्रस्त 'ऊर्मी' या युवतीची भूमिका साकारली, तो माझा अभिनयाचा भाग होता, तरी अशा 'नराधम पुरुषा'च्या कैचीत सापडलेल्या युवतीची काय भीषण अवस्था होते, ते केवळ तिचे तिलाच ठाऊक, त्यामुळे अशा प्रसंगी मुलीने ब्लेडने प्रतिकार करावा, अथवा तिने कराटे शिकलेले असेल तर खूपच चांगले वगैरे वगैरे बोलणे सोपे आहे हो, पण तत्क्षणी तिची हतबलता काय असते हे तीच बिचारी जाणते. १९९३ सालचा हा चित्रपट असून वीस वर्षांत परिस्थिती फारच बिघडली असे दिसते. कायदा कडक करून यावर जालीम उपाय काढता येईल. पोलिसांनी अशा गुन्हेगारांना पकडले तरी त्यापुढची कारवाई खूप उशिरा होते व शिक्षादेखील कडक नसते. कायद्याची दहशत ही परिस्थिती नियंत्रणात आणू शकेल.
मिताली वराडकर
पंधरा वर्षांपूर्वी औरंगाबादवरून मुंबईत आले तेव्हा येथे मला खूप सुरक्षित वाटत होते, पण आज माझी मुलगी, सहा वर्षांची असताना तिला ही मुंबई खरंच सुरक्षित आहे का असा मला प्रश्न पडतोय, इतकी स्थिती का बिघडावी? खरं तर स्त्री अनेक बाबतीत सामथ्र्यशील आहे. नाते, जबाबादारी, अपेक्षा यात ती कधीच हार जात नाही. पण अत्याचारप्रसंगी ती असहाय, एकाकी असते. पुरुषातले 'जनावर' ती थोपवू शकत नाही. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. पण उपग्रह वाहिन्यांवरील काही जाहिराती, विनोदी कार्यक्रम पाहताना स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे असे दाखवतात हे केवढे वाईट आहे. त्यामुळे कधी कधी प्रश्न पडतो, अशा दुर्दैवी घटना घडतात तेव्हा कोंबडे आधी की अंडे? पालक आपल्या मुलीवर चांगले संस्कार करतातच, पण बाहेरच्या जगाशी तिला सतत लढावे लागण्याचा दुर्दैवी काळ आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















