गेल्या महिन्यात ‘गुगल’च्या ‘सीएफओ’ने नोकरीचा राजीनामा देत कुटुंबाला, स्वत:ला वेळ देणार असल्याचं सोशल नेटवर्कवरून जाहीर केलं.  वर्क-लाइफ बॅलन्सची चर्चा तेव्हापासून नव्याने सुरू झाली आहे. नव्याने यासाठी की, वर्क-लाइफ बॅलन्स या संकल्पनेलाच नवी पिढी आता बाद करू इच्छिते. वर्क-लाइफ इंटिग्रेशन झालंय आणि त्याचंही प्रेशर येतंय, असं त्यांचं म्हणणं आहे.

वाढलेल्या ‘वर्किंग अवर्स’मधून घरच्यांसाठी, पार्टनरसाठी वेळ देणं जमतंय का? फ्लेक्सी अवर्ससारख्या सोयी-सुविधा  कंपनीने दि ल्या की हा वर्क-लाइफ बॅलन्स साधतो का? की कधीही काम करून देण्याचं प्रेशर असतंच? वर्क लाइफ बॅलन्स की वर्क-लाइफ इंटिग्रेशन नेमकं काय हवंय? तुम्हाला काय वाटतं?
साधारण तीन दशकांपूर्वी वर्क-लाइफ बॅलन्स ही संकल्पना आणि त्याची गरज यावर जोरदार चर्चा सुरू झाली. वर्क-लाइफ बॅलन्स साधता येणं म्हणजे आयडियल सिच्युएशन. घराला, कुटुंबाला पुरेसा वेळ देत करिअरचा सोपान चढता आला पाहिजे, हे बॅलन्सिंग अ‍ॅक्ट कौशल्याचं खरं! पण आतापर्यंत या वर्क-लाइफ बॅलन्सची गरज प्रामुख्याने स्त्रियांना असल्याचीच चर्चा होत राहिली. गेल्या काही काळात मात्र या चर्चेचे थोडे वेगळे पैलू पुढे येताहेत. आता वर्क-लाइफ बॅलन्स साधण्याची कसरत केवळ स्त्रियांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही हा एक पैलू त्यातून पुढे आला आणि काम – घर या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी राहिलेल्या नाहीत, हा दुसरा पैलू लक्षात आला.
गेल्या महिन्यात या गुगल कंपनीच्या चीफ फायनान्स ऑफिसरने (सीएफओ) पॅट्रिक पशेट यांनी राजीनामा दिला आणि वर्क-लाइफ बॅलन्सची संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली. सोशल नेटवर्किंगवर त्याची बरीच चर्चा झाली. कारण पॅट्रिक पशेटनी राजीनामा देण्याआधी एक ओपन लेटरच लिहिलं. घराला, कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं ते म्हणतात. गलेलठ्ठ पगार कमावणाऱ्या जगातल्या उच्चपदस्थांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर पॅट्रिक महाशयांची वर्णी लागायची. पण वर्क-लाइफ बॅलन्स साधण्याचा किंवा सतत एक पर्याय निवडण्याचा कंटाळा आल्यामुळे एवढय़ा पगारावर पाणी सोडून लवकर रिटायर व्हावंसं वाटलं, असं पॅट्रिक म्हणतात. गंमत म्हणजे असा लाइफसाठी वर्क सोडणाऱ्यांच्या यादीत यापूर्वी अ‍ॅमेझॉन, युबर या मोठय़ा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही नंबर येऊन गेलाय. त्यामुळे पाश्चिमात्य माध्यमांमध्ये  सध्या या वर्क-लाइफ बॅलन्ससाठी नोकरी सोडण्याची मोठी चर्चा आहे. ‘गुगल’च्या सीएफओचा हा नोकरी सोडतानाचा मेसेज सोशल नेटवर्किंगवर खूपच व्हायरल झाला.
एका बाजूला कॉर्पोरेट क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांनी मन लावून काम करावं म्हणून आणि त्यासाठी त्यांचं नोकरीव्यतिरिक्त आयुष्य चांगलं राहावं म्हणून अनेक सुविधा देत आहेत. फॅमिलीसह आउटिंगला जा, मनोरंजनाची सोय,   करा, ऑफिस कॅम्पसमध्येच योगा क्लास, जीम, स्विमिंग इतर खेळांच्या सुविधा द्या, पाळणाघराची सोय पुरवा या सोयी-सुविधा कॉर्पोरेट कंपन्या द्यायला लागल्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे वेळ-काळाची बंधनंसुद्धा आता उरली नाहीत आणि कामात ‘फ्लेक्झी अवर्स’चं स्वातंत्र्य मिळालंय. पण हेच फ्लेक्झी अवर्स कुठल्याही वेळी काम ही जबाबदारीदेखील आणतात. ऑफिस आणि घर या गोष्टी त्यामुळे एकमेकांपासून वेगळ्या करताच येत नाहीत. त्यामुळेच वर्क-लाइफ बॅलन्सची संकल्पना कालबाह्य़ करायला हवी, असं मत व्यक्त होतंय. कारण बॅलन्स करायला या दोन गोष्टी मुळात वेगवेगळ्या पारडय़ात टाकायला हव्यात ना! त्याऐवजी वर्क-लाइफ ब्लेंड किंवा वर्क-लाइफ इंटिग्रेशन अशा संकल्पना यायला लागल्यात. आजच्या पिढीच्या तरुण कर्मचाऱ्यांना ही नवी संकल्पनाच अधिक कालसुसंगत वाटतेय.
त्यातून ‘हॅव इट ऑल’चं प्रेशर स्त्रियांवर जास्त. मागे ‘पेप्सिको’च्या प्रमुख इंद्रा नूयी यांच्या मुलाखतीनंतर यावरही चर्चा झाली होती. म्हणजे या वर्क-लाइफ इंटिग्रेशनपायी जास्त प्रेशर येतंय की काय? नव्या पिढीच्या नोकरदारांनो, तुमचं याविषयी काय म्हणणं आहे? वर्क-लाइफ इंटिग्रेशन खरंच होतंय का? तुमचा अनुभव काय? या इंटिग्रेशनमुळे तारेवरची कसरत खरोखर थांबली आहे की, की ही तार आणखी तकलादू झालीय? तुमची मतं खाली दिलेल्या मेलवर रविवारच्या आत पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये वर्क-लाइफ बॅलन्स असा उल्लेख करा.