नवीन रिलीज झालेले चित्रपट, येऊ घातलेल्या चित्रपटांची टीझर, अजिंक्य रहाणेचं कॅप्टन होणं या तशा नेहमीच्या चर्चासोबतच गेल्या आठवडय़ात सोशल मीडियावर एक वेगळा विषय चर्चेत होता. इंद्रधनुष्याचं चित्र असलेल्या प्रतिमा, लोगो, डिझाइन्स अनेकांनी शेअर केली होती. सप्तरंगात न्हालेल्या व्हाइट हाऊसचा फोटो या चर्चेच्या केंद्रस्थानी होता. अर्थात विषय होता.. अमेरिकेत एलजीबीटी मॅरेजला मिळालेली मान्यता. एलजीबीटी म्हणजेच समलिंगी व्यक्तींच्या विवाहाला अमेरिकन कोर्टाने मान्यता दिली आणि अशा लग्नांची वाट अधिकृत झाली. समलिंगी व्यक्तींच्या हक्कांविषयी लढणाऱ्या अनेक मानवाधिकार चळवळींचा हा विजय मानला जातोय. अमेरिकेत ही मान्यता मिळाल्यानंतर अनेक सेलेब्रिटींनी एलजीबीटी राइट्सना (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) पाठिंबा दर्शवला आणि हा निर्णय सेलिब्रेट केला गेला. अगदी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसह सगळे यात सामील होते. या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करण्यासाठीच व्हाइट हाऊस सप्तरंगात सजले. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत: सर्व फेसबुक करांसाठी या संदर्भात एक नोट लिहिली आणि एलजीबीटीचा लोगो असणाऱ्या इंद्रधनुष्याला आपलं प्रोफाइल पिक्चर बनवलं.
या सगळ्यावर आपल्याकडच्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली. ते अमेरिकेत झालं, इथे सेलिब्रेशन कशाला? ही विकृती आहे, थेरं आहेत इथपासून ते हे नैसर्गिक आहे, वास्तव आहे यापर्यंत अनेक मतं हिरिरीनं मांडली गेली. सगळ्यात महत्त्वाचं.. या निमित्ताने या अस्पर्शित विषयावर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर समाज बोलता झाला.  म्हणूनच योग्य-अयोग्य किंवा नीती-अनीतीच्या पलीकडे जाऊन यावर मोकळेपणानं चर्चा व्हायला हवी किंबहुना ती सुरू झालेली आहे.
अगदी काही आठवडय़ांपूर्वी सोशल मीडियावर एक  जाहिरात व्हायरल झाली होती. मिन्त्रा.कॉम या ई-कॉमर्स वेबसाइटने एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी ही छोटी अ‍ॅडफिल्म बनवली होती. त्यात दोन लेस्बियन मुली दिसल्या. भारतीय ब्रॅण्ड, भारतीय मुली आणि अस्सल भारतीय सिच्युएशनची ती जाहिरात. तिला हजारांनी व्ह्य़ूज मिळाले, ती शेअर झाली. याचा अर्थ काय? समलिंगी संबंध, त्यातलं वास्तव, फोलपणा, त्या व्यक्तींचे हक्क, त्यामागची मानसिकता याबाबतीत पुढच्या आठवडय़ात अधिक बोलू या. पण दरम्यान, आजच्या तरुणाईला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं, हे जाणून घ्यायला आवडेल. याबाबतचे तुमचे मत viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर पाठव. सब्जेक्टलाइनमध्ये LGBT असं लिहा. राहण्याचं ठिकाण, कॉलेजचं नावंही लिहा.