माध्यमं हा समाजमनाचा आरसा आहे असं म्हणतात. पण नवीन पिढीतली आपल्या आसपास वावरणारी स्त्री बदलली तरी टीव्हीच्या पडद्यावरची स्त्री बदलायला काही तयार नव्हती. गेल्या काही काळात मात्र जाहिरातीमधली स्त्रीप्रतिमा बदलताना दिसतेय. मालिकांमधली ‘ती’ मात्र अजूनही कुठल्या जमान्यात आहे माहीत नाही. टीव्ही माध्यमांमधल्या या स्त्रीप्रतिमा तरुणाईला किती आपल्याशा वाटतात, त्यातले बदल भावताहेत का आणि त्याविषयी तरुणाईला काय वाटतं?
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल, एका मोबाइलच्या जाहिरातीने सोशल मीडियावर चर्चेचं मोहोळ उठलं होतं. त्यामुळे संबंधित कंपनीलाही याची दखल घेत आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पडलं होतं. त्या जाहिरातीमध्ये ऑफिसमध्ये बडय़ा पदावर काम करणारी स्त्री आपल्या हाताखाली काम करणाऱ्या नवऱ्याला उशिरापर्यंत थांबून काम पूर्ण करायला सांगते आणि स्वत: घरी जाऊन सुंदर जेवण बनवून त्याची वाट बघते. ‘कितीही उच्चपदावर असली तरी स्त्रीनं घरची कामं केलीच पाहिजेत का?’‘बॉस असूनही घरात तिला कमी महत्त्व असल्याचं दाखवलं नाहीय का?’ ही जाहिरात लोकप्रिय झाली, पण अशा कित्येक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या होत्या. अल्पावधीत ही जाहिरात बंद झाली. पण त्यामुळे जाहिरातींमधील स्त्रीची प्रतिमा यावर सकारात्मक विचार आणि चर्चा मात्र झाली.
    जाहिरातीने कितीही वाद निर्माण झाले असले, तरी ऑफिसमध्ये बायको नवऱ्यापेक्षा उच्च पदावर असणं, तिचा केसांचा बॉब कट, जेवण बनविण्यात न दाखवलेला कमीपणा आणि नवऱ्याच्या वागणुकीतही न दिसणारा आडमुठेपणा या त्या जाहिरातीतील दखल घेण्यासारख्या गोष्टी नक्कीच होत्या. भारतामध्ये १९७८मध्ये टीव्हीवर जाहिराती दाखविण्यास सुरुवात झाली, तेव्हापासूनच जाहिरातीत स्त्रीपात्रे  होतीच. पण त्यांच्या प्रतिमा आजपेक्षा नक्कीच वेगळ्या होत्या तेव्हा. भारतात कलर टेलिव्हिजनचं आगमन झाल्यानंतर १९८२ मध्ये पहिल्यांदा जाहिरातीही रंगीत झाल्या. या काळामध्ये पुरुषांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जाहिरातीत आकर्षक स्त्री असे किंवा ती आई, मुलगी, सासू या नात्यांमध्ये गुरफटलेली दाखवलेली असे. नव्वदीच्या दशकात हे चित्र पालटलं. जाहिरातींमधील स्त्रियाही घराबाहेर पडताना दिसू लागल्या, पण तरीही सुंदर, सुडौल आणि आकर्षक हीच जाहिरातीतील स्त्रीची मुख्य वैशिष्टय़े राहिली. तिची इमेज याखेरीज वेगळी नव्हतीच.
कुटुंबाबरोबर स्वत:चाही विचार
या काळात ऐश्वर्या रायने जाहिरातींच्या दुनियेत धुमाकूळ घातला होता. आखीव चेहऱ्याची, गोरी, उंच, सडपातळ नायिका लोकांना पडद्यावर आवडू लागली. त्यामुळे कित्येक बडय़ा शीतपेय, साबण कंपन्यांनी तिला आपल्या जाहिरातींमध्ये घेण्यास सुरवात केली. या काळातल्या जाहिरातींचे स्वरूप पूर्वीप्रमाणे प्रबोधन करणारे, सल्ले देणारे नव्हते, तर त्यात एक ताजेपणा, खेळकरपणा होता. २०००पासून हे जाहिरातींमधलं चित्र बदलण्यास सुरुवात झाली. कामावर जाणाऱ्या स्त्रीचं चित्रण आधीही जाहिरातीमध्ये होते. पण या काळात तिच्या कामाचं स्वरूपही बदललं होतं. पूर्वी शिक्षिक, स्टेनो, सेक्रेटरी ऐवजी आता पायलट, पोलीस, डॉक्टरच्या वेषातील स्त्री दिसू लागली. तरीही संसार आणि बालसंगोपनासाठी वाहून घेतलेली घरेलू स्त्रीच मोठय़ा प्रमाणावर दाखवली गेली. गेल्या पाच वर्षांमध्ये मात्र जाहिरातीतली आईदेखील बदलली आहे. मुलाला स्पर्धेसाठी तयार करताना त्याच्यासोबत धावणारी आई, बसस्टॉपवर छेडछाड करणाऱ्या तरुणाविरुद्ध ओरडण्यासही न घाबरणारी तरुणी असो, पुनर्विवाह करणारी ज्वेलरी ब्रॅण्डमधली स्त्री असो, आईवडिलांसाठी ट्रिपचा खर्च करणारी मुलगी असो किंवा घर घेताना नवऱ्यासोबत जाणारी बायको अशी स्त्रीची विविध रूपं, भूमिका, जबाबदाऱ्या जाहिरातीतून दिसू लागल्या आहेत. पूर्वी कोणत्याही प्रॉडक्टची जाहिरात करणारी स्त्री कुटुंबाचा विचार करताना दाखवली जायची, पण आता ती स्वत:चा विचार करतानाही दाखवली जातेय. बिस्किटं निवडताना स्वत:च्या हृदयाचा विचार करणारी हुमा कुरेशीची जाहिरात या संदर्भात बोलकी होती.
स्वतंत्र, विचारी आणि कर्तबगार
‘टायटन’चे महाव्यवस्थापक राजन अंबा सांगतात, ‘गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रीची विचारसरणी बदलत गेली आहे. ती आज स्वतंत्र, मुक्त विचार करणारी आहे आणि त्याचे चित्रण जाहिरातींमध्ये नक्कीच दिसते.’ जाहिरातींच्या बाबतीत उत्पादनाचा विचारही स्त्री पात्र निवडताना होत गेला. आपल्याकडे टीव्हीचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग घरातील स्त्रिया आहेत; तसेच घरातील सामानापासून गाडी विकत घेण्यापर्यंत त्यांच्या मताचा विचार प्रामुख्याने केला जातोय, त्यामुळे स्त्री प्रेक्षकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न जाहिरातकार करतात. नव्याने येणाऱ्या ऑनलाइन साइट्सनेही आपल्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी स्त्रियांचा विचार प्रामुख्याने केला आहे. एकीकडे स्कूटीच्या जाहिरातीमध्ये प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, आलिया भटसारख्या अभिनेत्री ‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल फन?’ हा थेट प्रश्न विचारताना दिसतात; तर बाइक ऑइलच्या जाहिरातीमध्ये मुलांच्या गँगमध्ये लकीचार्म असलेली बाइकर मुलगीही आपलं लक्ष सहज वेधून घेते.
एअरपोर्टवर विमान येण्याची वाट पाहणाऱ्या तिला जेव्हा जुना प्रियकर ‘तू तेव्हा नोकरी सोडली असतीस तर आपण आज एकत्र असतो’ असे सांगतो, तेव्हा ‘तू का नाही नोकरी सोडलीस?’ हा त्याला उलटा प्रश्न विचारण्याची धमक आजच्या तरुणीमध्ये आहे. ‘एक काळ होता, जेव्हा जाहिरातींमध्येही स्त्री-पुरुष भेदभाव होत असे, पण आता चित्र पालटले आहे. आजची तरुणी स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेते आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारायलाही तयार असते,’ असे ‘टायटन रागा’ जाहिरातीचे आर्ट डिरेक्टर जोनो सिमॉन सांगतात.
साबण आणि ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जाहिराती पूर्वीपासून स्त्रियांचं मक्तेदारीचं क्षेत्र मानलं जात होतं. आता ‘ती’ गाडय़ा, विमा कंपनी, बँक अशा पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या जाहिरातींमध्ये दिसू लागली आहे. शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीत स्त्रीदेहाचं अस्तित्व असायचं, केवळ पुरुषांना आकर्षित करण्यासाठी. अमुक एक डिओ मारला की मुली मागे येतील, असा दावा करणाऱ्या एका जाहिरातीमधल्या फ्लर्टिग करणाऱ्या पुरुषाऐवजी आता संयमी, स्टायलिस्ट पण वेल मॅनर्ड पुरुष दिसतोय आणि डिओच्या वासामुळे मागे लागणाऱ्या मुलीदेखील दिसत नाहीयेत. हा एक चांगला बदल आहे.
साबणाच्या जाहिरातीतील गोऱ्यापान मॉडेल्सना वगळून त्या जागी सावळ्या मुलींचाही (डव्ह सोप) समावेश होऊ लागला आहे. लांब केसांची शाश्वती देणाऱ्या हेअर ऑइलच्या जाहिरातीमध्ये कॅन्सरमुळे आपले सर्व केस गमावून बसलेल्या महिलेच्या आत्मविश्वासाची हेअरऑइलची जाहिरातही बोलकी होती.
अर्थात ही स्त्री आजही नातेसंबंध जोडून ठेवणारी आहे, कुटुंबवत्सल आहे आणि तिची ती ओळख पुसलेली नाहीच. पण घरातील नात्यांमध्ये आलेले बदलही नक्की उल्लेखनीय आहेत.

आता स्त्रीच सूत्रधार
: सोहा अली खान, अभिनेत्री
vn02गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरातींमधील स्त्रीच्या प्रतिमेत खूप बदल झाले आहेत. जुनी पारंपरिक विचारसरणी बदलून त्या जागी आता नव्या विचारसरणीच्या स्त्रिया दिसू लागल्या आहेत. अर्थात ही बदलत्या काळाची गरज आहे. नुकत्याच आलेल्या ‘एरिअल’च्या जाहिरातीमध्ये बायकोला मदत म्हणून पुरुषांनीही कपडे धुण्याची जबाबदारी घेण्याचा पुरस्कार करण्याचे सांगितले होते. हे त्यातीलच एक पाऊल आहे.

सकारात्मकता महत्त्वाची -:
रवी जाधव, दिग्दर्शक
vn03जाहिरातींमध्ये आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्रण केलेले असते. सध्या घरातली स्त्री महत्त्वाचे निर्णय घेताना दिसते. त्याचे प्रतिबिंब नक्कीच जाहिरातीमध्ये दिसते. जाहिराती नेहमीच सकारात्मक आणि पुरोगामी असतात. त्या मालिकांप्रमाणे तुम्हाला मागे घेऊन जात नाहीत. पूर्वी घरात काम करून डोकं दुखणारी बामच्या जाहिरातीतली स्त्री आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन करून डोकं दुखल्यावर बाम लावताना दिसते. पूर्वी ज्या साबणाच्या जाहिरातीमध्ये महिला घरात कपडे धुताना दाखवली जायची, त्याच साबणाच्या जाहिरातीमध्ये आज चिखलात बंद पडलेली रुग्णवाहिनी ढकलताना चार बायका दिसतात. त्या वेळी त्यांच्या कपडय़ांवर डाग लागण्याची फिकीर त्यांच्या डोळ्यात दिसत नाही.