vn14एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

एखादा शब्द आपल्या कानावर नव्याने पडला की त्याबद्दलचं कुतूहल चाळवलं जातं. पण काही शब्द आपल्या इतक्या सरावाचे झालेले असतात, की त्यांच्या उच्चाराचा खरेखोटेपणा किंवा अर्थ जाणून घ्यायची आपल्याला गरजच वाटत नाही. आपण ते रट्टावून बिनधास्त वापरत असतो. असाच शब्द म्हणजे प्रेमिसेस. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्या इमारतीचं, कंपनीचं संस्थेचं आवार.
हा शब्द कानावर सर्वात प्रथम कधी पडला आठवत नाही. पण साधारणपणे कॉलेजच्या आयुष्यात कधी तरी हा शब्द हळूच आत डोकावला असणार. कारण मराठी शिक्षकांच्या कॉलनीत राहात असल्याने प्रेमिसेस वगरे प्रश्नच नव्हता. इमारतीच्या आवारातच खेळा इत्यादी सल्ले घरातल्या मंडळींकडून दिले जायचे. कॉलेजमध्ये गेल्यावर आपण अशा शब्दांना सरावत जातो. तेव्हाच प्रेमिसेस परिचित झाला. आज जरी इतक्या विश्वासाने ‘प्रेमिसेस’ हा शब्द लिहीत असले तरी तुमच्याप्रमाणेच ‘प्रिमायसेस’ का ‘प्रेमिसेस’ का ‘प्रिमिसेस’ या चक्रव्यूहाचा सामना मीदेखील केला आहे.
ब्रिटिश आणि अमेरिकन दोन्ही मंडळींनी मात्र अगदी ठामपणे एकच उच्चार निश्चित केला आहे. प्रेमिस किंवा प्रेमिसेस. स्पेिलग आणि उच्चार यांचा जेव्हा असा शब्दश अर्थ जुळतो तेव्हा खूपच रिलॅक्स वाटतं. ढ१ी्रे२ी२ या स्पेिलगचा तस्साच उच्चार केला, तर चुकायचं म्हटलं तरी चुकणं शक्य नाही. याच अर्थाने पाहायला गेलं तर प्रिमायसेस हा उच्चारही चुकीचा ठरू नये, पण इंग्रजी भाषाकर्त्यांनी प्रेमिसेसवर शिक्कामोर्तब केल्याने आपणही तीच वाट धरलेली बरी.
आपल्या देशी इंग्रजीत प्रिमायसेस हाच उच्चार रूढ दिसतो. तो का? याचा शोध घेऊ म्हणता हाती काही लागण्याची शक्यता नाही. शब्दांच्या बाबतीत गतानुगतिकता अधिकतर दिसते. म्हणजे मित्रमत्रिणी वा अन्य कुणी तसा उच्चार करतात म्हणून मी, या पलीकडे अधिक कारणमीमांसा संभवत नाही. काही वेळा शब्दाच्या अर्थाचाही विस्तार होतो. विशिष्ट संदर्भात तो वापरला जाणं अपेक्षित असताना सर्वच बाबतीत लागू होतो. आपल्या मराठीतील ‘प्रवीण’ सारखा. वीणावादनात ज्याची प्रगती उत्तम तो प्रवीण. पण आज आपण हा शब्द कोणत्याही क्षेत्रातील कौशल्यासाठी वापरतो. प्रेमिसेसच्या बाबतीतही काहीसं तसंच झालं असावं. खरं तर विशिष्ट जमीन किंवा कारखाना वा संस्था यांचे आवार इतक्यापुरता या प्रेमिसेसचा आवाका आपण आज कोणत्याही ठिकाणाचे आवार इतका विस्तारला आहे. बिल्डिंग प्रेमिसेस, कॉलेज प्रेमिसेस, स्टुडिओ प्रेमिसेस असे शब्दप्रयोग सहज कानी पडतात. त्यामुळे फक्त कंपनी वा संस्था अशा मर्यादित जागेतून या शब्दाची आपण सुटकाच केलेली दिसते.
या सर्वच शब्दांच्या उच्चाराकडे जाताना अनेक जण एक शंका वारंवार बोलून दाखवतात की इतकी वष्रे आमच्या तोंडी रुळलेला उच्चार बदलल्याने काय साध्य होणार? आपण इंग्रजी भाषिक आहोत, नाही आहोत हा भाग नंतर पण व्यावसायिक कारणाने, सादरीकरणासाठी जी मंडळी इंग्रजी भाषा माध्यम वापरतात त्यांच्यासाठी उच्चार हा इम्प्रेशनचा भाग असतो. अचूक उच्चार एक चांगला प्रभाव निर्माण करतात. आपल्या मातृभाषेतील काही शब्दांचे उच्चारदेखील आपल्यासाठी गोंधळाचे असतात. पण त्यांचा अचूक उच्चार कळला की समाधान मिळतं का नाही? तेच अन्य कोणत्याही भाषेला लागू पडावे. त्यासाठीच प्रिमायसेस, प्रिमिसेसच्या उच्चारांचे खडे बाजूला करून प्रेमिसेस सारखे शब्द वेचण्याचा हा अट्टहास!
रश्मी वारंग – viva.loksatta@gmail.com