vv18भारतात सर्वात लोकप्रिय असणारा ब्लॉगिंगचा प्रकार आहे फूड ब्लॉगिंग. देशा-परदेशात गाजणाऱ्या फूड ब्लॉग्जवर ख्रिसमसनिमित्त चॉकलेटच्या नावीन्यपूर्ण रेसिपीज दिसू लागल्या आहेत. चॉकलेटबद्दल जगभरातले ब्लॉगर्स काय लिहीत आहेत हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न.

मुळात आपण सर्व भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. त्यात ख्रिसमससारख्या vv17जगभर साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला आपण कसं सोडणार? हा सण आपण कधीच आपलासा केलाय. ख्रिसमसचं नाव घेताच डोळ्यापुढे येतो आधी ख्रिसमस ट्री आणि मग त्याला लगडलेली चॉकलेट्स, टॉफीज.. सांता क्लॉज आणि अर्थातच ख्रिसमस केक आणि पुडिंग्ज. पुरातन काळी अस्तित्वात असलेल्या माया संस्कृतीने चॉकलेटला अत्युच्च स्थान प्राप्त करून दिलं होतं आणि फक्त उच्चभ्रू वर्गालाच चॉकलेटचं सेवन करण्याची परवानगी होती. आता मात्र भाषा, संस्कृती, धर्म यांच्या सीमा ओलांडून चॉकलेट अगदी सगळीकडे पोहोचलंय. त्याविषयीचं साहित्यही लोकप्रिय होतंय. चॉकलेट आणि केकविषयीचे ब्लॉग जगात सगळ्यात जास्त पाहिले, वाचले जातात. अशाच काही या विषयांना वाहिलेल्या ब्लॉग्जची सफर.. चॉकलेटबद्दल जगभरातले ब्लॉगर्स काय लिहीत आहेत हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.
vv19फूड ब्लॉगर्स चॉकलेटच्या प्रेमात असतातच. त्यातही काही ब्लॉग्ज केवळ चॉकलेटला वाहिलेले आहेत. काही जण त्यावर होममेड चॉकलेट रेसिपीज देतात, तर काही जण मार्केटमध्ये नवीन आलेल्या चॉकलेट्सची चव चाखून त्याविषयी लिहितात. या चॉकलेट क्रिटिक्सचे ब्लॉगही लोकप्रिय आहेत.
‘लव्ह फ्रॉम द ओव्हन’ हा ब्लॉग चॉकलेट्स, कुकीज आणि केक-पेस्ट्रीज यासाठी जगभरातल्या खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. हा ब्लॉग लिहिणारी क्रिस्टी अगदी सहज करता येण्याजोग्या चॉकलेट्स आणि केक्सच्या रेसिपीज इथे पोस्ट करते. त्यामुळेच या ब्लॉगची लोकप्रियता टिकून आहे. यंदादेखील ती तिच्या आई आणि आजीकडून शिकलेल्या अमेरिकन चॉकलेट्सच्या रेसिपीस ख्रिसमसच्या निमित्ताने घेऊन आली आहे.
‘मोस्टली अबाऊट चॉकलेट’ हा ब्लॉग चॉकलेट, वाइन आणि पास्ताच्या विविध रेसिपीजसाठी नावाजला जातो. हा ब्लॉग ज्युडिथ ल्यूइस लिहिते आणि ती नित्यनेमाने नवीन नवीन चॉकलेटच्या रेसिपीज उपलब्ध करून देत असते. ब्लॉगवर भरपूर साऱ्या चॉकलेट रेसिपीज आणि अनेक पर्याय आहेत. हा ब्लॉग लिहिणाऱ्या ज्युडिथला तिच्या ब्लॉगवरील लेखनासाठी विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.
vv20डॉम रॅम्से याने २००६ साली चॉकलेटवर लिहायला सुरुवात केली आणि आज हा ब्लॉग ३०,००० पेक्षा जास्त लोक नित्यनेमाने वाचतात. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध असलेल्या रेसिपीज आणि जगभरातल्या विविध चॉकलेट्सबद्दल लेखकाने मांडलेले विचार हे या ब्लॉगचं खास वैशिष्टय़ आहे. सॅलीज बेकिंग अ‍ॅडिक्शन हा अजून एक नवीन ब्लॉग सध्या बराच प्रसिद्धीला आलाय. हा ब्लॉग अमेरिकेमध्ये राहणारी सॅली लिहिते. ख्रिसमससाठी खूप नावीन्यपूर्ण रेसिपीज तिच्या ब्लॉगवर दिल्या आहेत. ‘मिंट चॉकलेट ब्राऊनी’ ही एक अशीच पाककृती आहे. भारतीय ब्लॉगर्सदेखील चॉकलेटवर भरपूर लिहिताना दिसतात. ‘व्हॅनिला चॉकलेट’ हा ब्लॉगदेखील चॉकलेट विषयाला वाहिलेला आहे. ‘सलूज किचन’ हा ब्लॉग लिहिणारी शैलजा गुदीवादा ही विशाखापट्टणमधली एक गृहिणी आहे आणि तीदेखील चॉकलेटसोबतच इतर रेसिपीज सातत्याने तिच्या ब्लॉगवर उपलब्ध करून देत असते.
इंडियन सिमर हा एक ख्यातनाम भारतीय फूड ब्लॉग आहे आणि त्यावरदेखील ख्रिसमसच्या निमित्ताने चॉकलेट ब्राऊनीसारख्या सर्वाना आवडणाऱ्या रेसिपीज दिल्या आहेत. हा ब्लॉग लिहिणारी प्रेरणा अधूनमधून तिच्या ब्लॉगवर सोप्या भाषेत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून बनवता येणाऱ्या चॉकलेटच्या विविध पाककृती उपलब्ध करून देते. सध्या सगळीकडे गाजत असलेला इंडियन मास्टर शेफ विकास खन्ना याने बनवलेल्या खास भारतीय रंग दिलेल्या चॉकलेटच्या पाककृती ‘फॉक्स लाइफ चॅनेल’च्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.