‘घडय़ाळ म्हणजे वेळ सांगणारे यंत्र,’ असा समज असलेली पिढी केव्हाच मागे पडली आहे. मोबाइल आल्यानंतर आता घडय़ाळाचं तसं प्रयोजन उरलेलं नाही. पण म्हणून घडय़ाळाबद्दलचं कुतूहल संपलं, असं अजिबात नाही. घडय़ाळ केवळ गरज राहिली नसून एक ‘फॅशन अॅक्सेसरी’ म्हणून त्याकडे पाहिलं जातंय. त्यामुळे घडय़ाळ्याच्या डिझाइनमध्येही तसे बदल दिसायला लागले आहेत. या नव्या ट्रेण्डविषयी..     
मोबाइलच्या वापरामुळे काही गोष्टींची गरज संपली आहे, त्यातील एक म्हणजे मनगटी घडय़ाळ. हातातल्या मोबाइलमध्ये सहज वेळ पाहता येणे शक्य असल्यामुळे घडय़ाळाची गरज वाटेनाशी झाली आहे, तरीही घडय़ाळाची क्रेझ कमी झालेली नाही. एक आवश्यक फॅशन अॅक्सेसरी म्हणून मनगटी घडय़ाळाची पत वाढलीय. घडय़ाळावरून ‘स्टेटस’चा अंदाज बांधला जातो. म्हणूनच घडय़ाळ हे लक्झरी गुड्सच्या विभागातही दिसतंय. घडय़ाळ वापरणारी व्यक्ती महत्त्वाकांक्षी, आपल्या मतांवर ठाम असणारी आणि स्वावलंबी असल्याचे समजले जाते. घडय़ाळ्याच्या डिझाइनवरून त्याच्या पारखी नजरेचा अंदाज केला जातो. त्यामुळे औपचारिक कार्यक्रम आणि ऑफिसेसमध्ये लोकांवर छाप पाडण्यासाठी घडय़ाळे वापरली जातात. कॉलेजमध्येसुद्धा फंकी, स्पोर्टी घडय़ाळ्यांचे निस्सीम चाहते दिसतातच. अर्थात सध्या गरजेपेक्षा एक फॅशन अॅक्सेसरी म्हणून घडय़ाळाकडे पाहण्याकडे तरुणाई पसंती देते. आता नवीन येणाऱ्या घडय़ाळ्यांच्या कलेक्शनमध्ये याच दृष्टिकोनातून नावीन्यपूर्ण डिझाइन्स दिसायला लागली आहेत.
vv19काही दिवसांपूर्वी ‘टायटन’ने ‘नेबुला’ कलेक्शन सादर केले. त्यांच्या प्रीमियम रेंजमधील या कलेक्शनमधील घडाळ्याच्या डायलमध्ये वेळेसोबत दररोज चंद्राच्या बदलणाऱ्या कलाही दिसतात. रोझ गोल्ड प्लेटिंग आणि ‘गॅलेक्सी ब्ल्यू’ या निळ्या रंगाच्या विशिष्ट छटेचा वापर केला आहे. ‘सोनाटा’च्या नव्या वेडिंग कलेक्शनमधील घडय़ाळे हातफुलाप्रमाणे डिझाइन केली आहेत. त्यामुळे घडय़ाळाला दागिन्याचे स्वरूप मिळाले आहे. ‘घडय़ाळ्यातील यंत्रणा नक्की कशी काम करते?’ याचं कुतूहल कित्येकांना असते. मध्यंतरी कित्येक ब्रॅण्ड्सनी त्यांच्या घडय़ाळ्यातील यंत्रणा स्पष्ट दिसणारी डायल्स बाजारात आणली होती. घडय़ाळ्यांमध्ये उच्चप्रतीच्या खडय़ांचा वापर केला जातो.
‘पूर्वी घरात एक घडय़ाळ आजोबांकडून वडील आणि मग नातवाकडे परंपरागत यायचे. पण आता तरुणांना कॉलेजसाठी, पार्टीसाठी, समारंभाला जाताना एक अशी किमान चार घडय़ाळे गाठीशी असावी लागतात,’ असे टायटनच्या घडय़ाळ विभागाचे कार्यकारी अध्यक्ष एच. सी. रघुनाथन सांगतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाण्यासाठी चार वेगवेगळे शूजचे पेअर बाळगणाऱ्या तरुणांना एकच घडय़ाळ आयुष्यभर वापरायला आवडत नाही. हातातील विविध ब्रेसलेट्स, कडे, बांगडय़ा यांच्यासोबत घडय़ाळंही मॅच करतात.
सध्या घडय़ाळे निवडताना ग्राहकांचा चोखंदळपणा वाढल्याने ते घडय़ाळाकडे ‘आर्टपीस’ म्हणून पाहत असल्याचे सांगतात. त्यामुळे बॅ्रण्ड्ससुद्धा घडय़ाळे तयार करताना त्यांच्यामध्ये नावीन्य आणण्याचे प्रयत्न करतात. अर्थात अॅक्सेसरीचा दर्जा मिळाल्यामुळे आपले घडय़ाळ चारचौघांत मिरवून कौतुक मिळविणे हेही त्यामागचे उद्दिष्ट असतेच. त्यामुळे घडय़ाळ निवडताना त्याच्या लुकला सर्वाधिक महत्त्व दिले जाते, हेही ते नमूद करतात.
vv10सध्या मार्केटमध्ये मुलींसाठी विविध प्रकारची घडय़ाळं आली आहेत. त्यात खास करून ब्रेसलेट वॉच किंवा कडं याचं कॉम्बिनेशन असलेली वॉच चलतीत आहे. स्पोर्टी लुक असलेली घडय़ाळं आहेतच. आपण जो पोशाख परिधान करू त्या पोशाखाला साजेसं घडय़ाळ हवं. म्हणजे शॉर्ट्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज असा एकदम स्पोर्टी लुक आणि सोनेरी डायलचं घडय़ाळ.. म्हणजे फॅशनच्या बाबतीत झीरो मार्क्स. म्हणूनच तरुणाईला आपल्या कलेक्शनमध्ये सध्या एकापेक्षा जास्त घडय़ाळं ठेवण्यात इंटरेस्ट असतो. एकच पेंडेंट आणि विविध रंगांचे सॅटिन किंवा लेदर बेल्ट असलेली वॉच मॅचिंग प्रेमींसाठी सहज उपलब्ध आहेत. सध्या नवीन ट्रेण्ड आहे तो ब्रायडल वॉचचा. ब्रायडल वेअर किंवा ट्रॅडिशनल वेअरवर इतके दिवस घडय़ाळ घातलं जायचं नाही. कारण ते बांगडय़ा आणि इतर ज्वेलरीला मॅच होत नाही. पण आता ब्राइडच्या लुकला साजेसं गोल्ड वॉच, स्टोन वॉच किंवा पर्ल वॉच एका हातात आणि दुसऱ्या हातात चुडा किंवा बांगडय़ांसोबतच मर्ज झालेलं वॉच अशी फॅशन आहे. हिरव्या चुडय़ाला आणि मंगळसूत्राला मॅच होणारं घडय़ाळही आली आहेत. त्यामुळे डिसेंट वॉच आणि बांगडय़ा हे कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर दिसतं.
कॉपरेरेट लुकसाठी घडय़ाळ ही एकच अॅक्सेसरी पुरेशी असते. ड्रेसकोडला मॅच होईल असं फॅशनेबल वॉच आणि मॅचिंग ईअर टॉप्स घातले की लुक कम्प्लिट. कॅज्युअल ड्रेसिंगसाठी ब्रेसलेट वॉचमध्येदेखील खूप व्हरायटी पाहायला मिळतात. दोन-तीन लेयर्स असलेले ब्रेसलेट आणि त्याला अटॅच वॉच हे सध्या तरुण मुलींमध्ये लोकप्रिय आहे. शिवाय घडय़ाळाच्या बाजूला नक्षीकाम, स्टोन वर्क अशी विविध कलाकुसरीची कामे दिसतात. पार्टीवेअरसाठी आपल्या गेटअपला सूट होईल अशी डिझायनर घडय़ाळं आणि त्या वॉचला सूट होणारा नेकपीस हे असं कॉम्बिनेशन क्लासी आणि तितकाच फॅशनेबल लुक देऊ शकतो. कॅज्युअल वेअरवर प्रिंटेड बेल्ट असलेले वॉच ट्राय करू शकता किंवा एकाच हातात दोन छोटय़ा आकाराच१ घालून आपल्या लुकमध्ये एक फंकिनेस आणू शकता आणि तेसुद्धा तरुणाईत सध्या प्रचलित आहेत. वॉचच्या पेंडंटमध्येदेखील विविध प्रकार निघाले आहेत. डिसेंट डबल कलर जॉमेट्रिकल शेप्स, पानं-फुलं, ओल्ड राजेशाही घडय़ाळ तसंच बेल्टमध्येदेखील साखळी, लोकरीचा कलर बेल्ट, मोत्यांचे बेल्ट असे विविध प्रकार तुम्ही ट्राय करू शकता.
मृणाल भगत, अमृता अरुण – viva.loksatta@gmail.com