vv25तरुण मुलं कट्टय़ावर एकत्र जमतात ते टाइमपास म्हणून, फेसबुकवर चालतात त्या टवाळक्या आणि डोंगरदऱ्यात ट्रेकच्या नावाखाली भटकतात ते धमाल करायला असा सर्वसाधारण समज. पण सगळी तरुणाई तशी नाही. कट्टय़ावरच्या गप्पांमधून, जंगलातल्या भटकंतीतून आणि फेसबुकवरच्या चॅटवरूनही काही चांगल्या गोष्टी घडताहेत.

जंगलभ्रमंती, पक्षीनिरीक्षण, फोटोग्राफी या वेडापायी एकत्र आलेल्या चौघा मित्रांना आपल्या घराजवळचं सिटी फॉरेस्ट धोक्यात असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी एकत्र येऊन तिथली इको सिस्टीम वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ठाण्याच्या स्वच्छ येऊर मोहिमेची गोष्ट..

या चौघांची भेट कोणा एका ठिकाणी झाली नाही. तरी त्यातल्या त्यात फेसबुक महत्त्वाचं. कोणी शाळेत तर कोणी जंगलात भेटला आणि वनसंवर्धनाची चळवळ त्यांच्याकडून उभी राहिली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळी जंगलं पालथी घालणं त्यांचं चालूच असतं. तरी आपलं वास्तव्य असलेल्या शहराशी वेगळं नातं असतं. या ‘सिटी फोरेस्ट’ला जिवंत ठेवण्याच्या उद्देशानंच या चार मित्रांनी शक्कल लढवली. ठाणे शहराला लागून असलेला येऊरचा डोंगर म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मागचा भाग. खरे तर घनदाट जंगलाचा भाग आहे हा. पण बोरिवलीतून राष्ट्रीय उद्यानात येताना कसून तपासणी होते, तशी येऊरच्या भागात अभावानेच होत होती. मग काय.. मान्सून पिकनिकचा हा आवडता स्पॉट बनला. पिकनिकची मज्जा राडय़ात करणाऱ्यांची संख्या वाढली. येऊरच्या डोंगरावरचा काही भाग दारू पार्टीसाठी आयडियल स्पॉट ठरू लागला. हे चौघे मित्र-आदित्य सालेकर, प्रतीक कुलकर्णी, सार्थक आव्हाड आणि मयूरेश हेंद्रे नेहमी इथे दिसणाऱ्या दारूच्या बाटल्यांनी व्यथित व्हायचे. सार्थक आव्हाड सांगतो, ‘जंगलातून फिरताना एकदा ओढय़ातले मासे आणि बेडूक वर तरंगताना दिसली. त्याचं कारणही तिथेच सापडलं. देशी दारूच्या बॅरलमधून वाहणारा ओघळ ओढय़ात मिसळत होता. आजूबाजूला बाटल्या आणि काचेचा खच पडलेला होता, तो वेगळाच!’ मग हा कचरा आपणच गोळा करावा आणि स्वच्छ येऊर नावानं मोहीम उघडावी, असं ठरलं. ‘पावसाळ्यात वरवरचा कचरा वाहून जातो आणि ओल्या-सुक्या पाटर्य़ाच्या निशाण्या तिथेच राहतात. इतर चार जंगलांप्रमाणे आपल्याही सिटी फोरेस्टची ही दयनीय अवस्था पाहून आम्ही वेगवेगळ्या पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने जंगलाच्या आतील भागातील हा पसारा स्वच्छ करायचा निर्णय घेतला. त्याविषयी माध्यमांना माहिती दिली. या सगळ्याची दखल मग वनविभागानेही घेतली आणि त्यांनी येऊरचा प्रवेश प्रतिबंधित केला. सर्व दारुडय़ांवर आलेली बंदी हे आम्ही आमच्या स्वच्छता मोहिमेचे तात्पुरतं का होईना पण यश मानतो,’ आदित्य सांगतो.
vv24आपण चांगलं काम करत असलो की आपोआप माणसं जोडली जातात, यावर त्यांचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे कन्झव्र्हेशन फोटोग्राफी आणि फिल्ममेकिंगद्वारे आम्ही प्रत्येक नागरिकाला संवर्धनाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत, असं मयूरेश हेंद्रे म्हणाला.
शहरी टाळकी रानावनांत भटकताना थोडी हुरळून जातात, हे खरं आहे. पण स्थानिक वस्तीतून, गावापाडय़ांतून येणाऱ्यांचं विश्वच वेगळं असतं. याविषयी प्रतीक कुलकर्णीने आपला अनुभव मांडला. ‘पूर्वी जंगलात बेचक्या घेऊन जाताना मुलं दिसायची. त्यातली काही अगदी सराईतपणे पक्ष्यांना मारून खाली पाडायची. त्या मुलांशी यावर बोलायला गेलो तर भारद्वाजाचं मटण खूप चविष्ट लागतं अशी त्यांनीच माझ्या ज्ञानात भर पाडली. मग मी त्यांना कॅमेऱ्यामधले फोटो दाखवून समजावलं की, हे पक्षी असेच मारत राहिलात तर दिसेनासे होतील. नेमकं झालंही तसंच. भारद्वाज एकादाही स्थिरावलेले दिसत नाहीत हल्ली.’
हळूहळू या बेचकीवाल्या मुलांची संख्या कमी झाली. खरं तर स्थानिक रहिवाशांची ताकद प्रचंड असते. त्यांनी ठरवलं तर उभं रानही जाळतील आणि ठरवलं तर रानाचा स्वर्ग करतील. त्यामुळे वनविभागाच्या साहाय्याने आजवर केलेल्या फोटोग्राफी, बर्ड कॉल रेकॉर्डिग आणि शूटिंग यांच्याद्वारे स्थानिकांसाठी वेगवेगळी चर्चासत्रं सुरू करून संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचं काम ही मित्रमंडळी हाती घेणार आहेत. कॅमेरा घेऊन रानावनांतून प्रवास अनेक करतात. आपल्याला अचंबित करणाऱ्या विश्वाची छायाचित्रं काढून वनसौंदर्य ब्लॉग आणि आर्ट गॅलरीमधल्या प्रदर्शनांमधून जगापुढे आणणारे अनेक आहेत. अर्थात, त्यांचं महत्त्व कोणी नाकारत नाहीये. पण प्राण्याच्या बचावासाठी माणसं जोडून संवर्धनाची चळवळ उभी करून प्रत्येक पातळीवर लढा देणारे असे निसर्गमित्र आणखी लागणार.
गार्गी गीध – viva.loksatta@gmail.com