तरुणाईमध्ये डिप्रेशन, एकटेपणा आणि त्यातून आत्महत्या यांचं प्रमाण वाढत आहे. सध्याच्या तरुणांची लाइफस्टाइल हीदेखील या मानसिक अस्वास्थ्याला कारण आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. आजच्या (१० ऑक्टोबर) जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर तरुणाईला सतावणाऱ्या या समस्येचा घेतलेला वेध.
‘मुंबईत एका दिवसात पाच आत्महत्या’ ही बातमी दोन आठवडय़ांपूर्वीच वाचल्याचे आपल्याला आठवत असेल. ऑफिसमधल्या कामाच्या ताणानं एका प्रोफेशनलने आत्महत्या केल्याची बातमीही त्याचदरम्यान आली. ‘वैफल्यामुळे तरुणाची आत्महत्या’ अशा बातम्या हल्ली वृत्तपत्रांतून आलेल्या आपण नेहमीच वाचत असतो. आत्महत्या हा शब्द नेहमीच आपले लक्ष वेधून घेतो आणि आत्महत्या म्हणजे न मिळालेले लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला प्रयत्न तर नाही ना अशी शंका येते. तरुणांच्या आत्महत्या हा तसे पाहता सध्याच्या घडीचा विषय. ऐन तारुण्यात स्वत:चे आयुष्य संपवावं असं का बरं वाटतं? तरुण मुलंमुली कोणत्या न कोणत्या ताणतणावातून जात असतात असं आढळतं आणि त्यावर उपाय शोधण्याऐवजी आत्महत्येचा मार्ग ते अवलंबतात. ‘आय क्विट’ म्हणणं हे सोपं नाही हे खरं, मग तोच अवलंबण्याची एवढी कोणती कारणं असतात?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले की, ‘तरुणाईला नैराश्य येण्याच्या आणि आत्महत्येपर्यंत घेऊन जाणाऱ्या कारणांमध्ये परीक्षेची अवास्तव भीती, अपयशाची भीती, रिलेशनशिप्स प्रॉब्लेम्स ही प्रमुख कारणं आहेत.’ शैक्षणिक अपयश हे आत्महत्यांमागचं कारण प्रामुख्याने दिसून येतं. शैक्षणिक यशाबद्दल असणाऱ्या पालकांच्या अपेक्षांचं अनेकांना ओझं वाटतं आणि त्यात परीक्षेत मिळालेलं अपयश पचवू न शकल्याने अनेक जण आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. गेल्या काही वर्षांत आणखी एक कारण तरुणांच्या आत्महत्यांमागे असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. ते कारण म्हणजे एकटेपणा. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलामुलींमध्ये बऱ्याचदा एकटेपणाची भावना येते. त्यातूनही आत्महत्येचा विचार त्यांना येऊ शकतो, अशा वेळी मित्रमत्रिणींशी गप्पा मारून मन मोकळे करून, छंद जोपासून आपला वेळ घालवता येऊ शकतो. घरातील वातावरण, पालक मुलांच्या आयुष्यात नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आई-वडिलांचा घटस्फोट, एकाचे निधन, घरातील इतर अडचणी यांचा मुलांवर कळत नकळत परिणाम होत असतो, असंही तज्ज्ञ सांगतात.
रिलेशनशिप प्रॉब्लेम्सने तर अनेक जण ग्रासलेले असतात. रिलेशनशिपमध्ये सतत होणारी भांडणं, गरसमज, फसवणूक, नकार पचवणं थोडं अवघड जातं. एखादं नातं आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं, पण सामंजस्याने बोलून, चुका समजून ते टिकवायला हवं. सोशल नेटवìकग साइटचा वापरही काही जणांना टेन्शन देऊन जातो. फोटोवरच्या कमेंट, फोटोंना मित्रमत्रिणींइतके न मिळणारे लाइक्स हा मुद्दासुद्धा काहींना हर्ट करतो. आपण कुणाला आवडत नाही, याचा न्यूनगंड वाढत जातो. अशा वेळी व्हच्र्युअल फ्रेंड्सपेक्षा खऱ्या मित्र-मैत्रिणींची आवश्यकता असते. व्यसनाधीनतासुद्धा ही गोष्ट काहींना अस्वस्थ करून सोडते की, त्यांना व्यसन सोडण्यापेक्षा जीव सोडणं सोपं वाटतं.
ही सर्व कारणं मान्य, पण त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. ही पळवाट आहे. अडचणी सर्वाना असतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. मानसोपचार तज्ज्ञांनाच या डिप्रेशनसदृश अवस्थेवरचा इलाज विचारला. डॉ. वैशाली देशमुख म्हणाल्या, ‘सध्या प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन वाढली आहे. त्यामुळे मुलं आणि पालक सतत एका तणावाखाली असतात. पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद होणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन लेवल कमी झाली तर निश्चितच फरक पडेल. तसंच लाइफस्टाइलमध्ये होणाऱ्या बदलांना सामोरं जाणं अवघड होऊन जातेय. त्यामुळे औदासीन्य, नराश्य, चिंता ही कारणं प्रामुख्याने समोर येतात. मदानी खेळ, व्यायाम, छंद, वेळेचं नियोजन अशा गोष्टींमुळे ताणतणाव कमी होऊ शकतो.’
आत्महत्येची रिस्क बहुतेकदा शॉर्ट टर्म आणि एखाद्या ठरावीक परिस्थितीत घेण्यात आलेली असते, त्यामुळे काही कालावधीने या परिस्थितीवर मात करता येऊ शकते. दरवेळी नाही, पण बऱ्याचदा आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून धोक्याची सूचना मिळत असते, त्याकडे लक्ष दिल्यास आपण नक्कीच समोरच्याला मदत करू शकतो. आत्महत्येसारख्या विचारांवर सहसा बोललं जात नाही किंवा बोलणं टाळलं जातं. मात्र बऱ्याचदा विचारांना वाट मोकळी करून देता येत नाही. त्यामुळे अशा विषयांवरील चर्चा आत्महत्येचा विचार करणाऱ्यास परावृत्त करू शकतात.
(१० ऑक्टोबरला जागतिक मानसिक स्वास्थ दिवस आहे. ‘लिव्हिंग विथ स्किझोफ्रेनिया’ ही यंदाची थीम असून स्किझोफ्रेनियाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे.)