विभिन्न विषयांवरचे चित्रपट, भक्कम कथानक, आशयाचा उंचावणारा स्तर, तांत्रिक गोष्टींतली सुधारणा, राष्ट्रीय पुरस्कारांवरची मोहर, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत घेतली गेलेली दखल, प्रसिद्धीतंत्राचा वापर यामुळे केवळ मराठीच नव्हे, तर अमराठी प्रेक्षकही मराठी चित्रपटांकडं वळत आहेत. त्यात तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. एके काळी मराठी चित्रपटांना नाक मुरडून इंग्रजी-हिंदी चित्रपटांना आपलंसं म्हणणारी तरुणाई आता आवर्जून मराठी चित्रपट पाहातेय. त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींवर तावातावानं चर्चा करतेय. मात्र हिंदीच्या बरोबरीनं प्रदर्शित होऊन ‘कांटे की टक्कर’ देतानाच, मराठी चित्रपटानं कोटीच्या कोटी उड्डाणं करतानाच आपले गुणविशेष नि प्रादेशिकपणाही तितक्याच निगुतीनं जपायला हवा, हे मानणारा एक मतप्रवाह दिसतोय. मराठी चित्रपटच ‘लय भारी’ असं चित्र सध्या दिसतंय. आपण पाहिलेला मराठी चित्रपट नि हिंदी-मराठी चित्रपटांविषयी आपली मतं काही जणांनी ‘व्हिवा’शी शेअर केली.

अथर्व चव्हाण
मी अलीकडे ‘लय भारी’, ‘रमा माधव’ नि ‘पोश्टर बॉईज’ हे चित्रपट पाहिले. तीनही वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट होते. त्यांच्या विषय मांडण्याच्या पद्धतीत बरंच नावीन्य होतं. ‘रमा माधव’मधली भाषाशैली आणि त्यातले कॅमेरा अँगल, छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडंही दिलेलं लक्ष मनाला भावलं. खूप दिवसांनी काही तरी भव्यदिव्य बघितल्याचा अनुभव आला. ‘पोश्टर बॉईज’चा विषय आणि सगळ्याच कलाकारांचा अभिनय तोडीस तोड होता. ‘लय भारी’नं तर मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवलंय. हिंदी चित्रपटांबरोबरच आता मराठी चित्रपटसुद्धा व्यावसायिक होत चालला आहे. ‘टपाल’, ‘बायोस्कोप’ अशा आगामी चित्रपटांबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता वाटतेय. आता मराठी चित्रपटांना गरज आहे, ती आपण सगळ्या प्रेक्षकांनी बाहेर पडून चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट बघून त्याला दाद देण्याची.

सायली राऊत
मी ‘लय भारी’ हा चित्रपट पाहिला. तो मला आवडला. सध्या हिंदीतले स्टार्स मराठी चित्रपट करण्यावर भर देताहेत. हिंदीच्या तुलनेनं आपल्या मराठीत आशय, विषय जास्त चांगले असतात. हिंदीमधल्या मसाला चित्रपटांपेक्षा आपले मराठी चित्रपट ही एक चांगली कलाकृती असते. अभिनयाच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे. आता मराठीतही बिग बजेट चित्रपट यायला लागलेत. म्हणजे आशय विषय हा आपला प्लस पॉइंट होता नि आता टेक्निकल बाजूही स्ट्राँग व्हायला लागलेय. मराठी चित्रपट आता व्यावसायिक व्हायला लागलेत. जाहिरातबाजीसुद्धा उत्तम होतेय. म्हणून मराठी चित्रपट पाहायला मी नेहमीच प्राधान्य देते.

ओमकार केसरकर
मी ‘रेगे’ हा चित्रपट नुकताच पाहिला. रेगेची स्टोरी उत्तम होती. त्यातून मिळणारी प्रेरणा नि शिकवण पालकांना आणि युवा पिढीला लाभदायक आहे. आगामी चित्रपटांपकी मला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट पाहायची उत्सुकता अधिक आहे. बाबा आमटे यांचा मुलगा प्रकाश आमटे यांच्या जीवनावर चित्रित झालेल्या या चित्रपटात त्यांची जीवनकहाणी रेखाटण्यात येणार आहे. हिंदी नि मराठी चित्रपटांची तुलना केल्यास मराठी चित्रपटच उत्तम असतात, कारण त्याची कथा नि संगीत. हिंदी चित्रपट मराठीच्या तुलनेनं फारसे उत्तम नसतात. कथा फारशी रुचणारी नसते. हिंदीत दाखवले जाणारे स्टंट्स हे एका लिमिटपर्यंत ठीक वाटतात; पण काही वेळा त्यांचा अतिरेकच होतो.

अक्षया गुरव
मला ‘लय भारी’ हा चित्रपट खूप आवडला. रितेश देशमुखनं खूप छान अ‍ॅक्टिंग केलीय. कधी कल्पनाच केली नव्हती, की रितेश मराठी चित्रपटात काम करेल; पण अपेक्षेपेक्षा खूपच छान काम केलंय त्यानं. चित्रपटाचं दिग्दर्शनही छान आहे. रितेशच्या डबल रोलचा गूढ सस्पेन्स मला खूप आवडला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विठ्ठलाप्रति असणारी लोकांची श्रद्धा अचूक टिपलेय. पंढरपूरचं दर्शन आणि घोडे, मेळाव्याचं चित्रीकरण खूप चांगल्या प्रकारे कॅमेऱ्यात टिपलंय. चित्रपटाचा शेवटही अगदी छान केलाय. सध्याच्या हिंदी नि मराठी चित्रपटांत फारसा फरक राहिलेला नाही. बहुतेक चित्रपटांतल्या कल्पना सारख्याच असतात. फक्त अभिव्यक्तीच्या पद्धती वेगळ्या आहेत. मातृभाषा मराठी नि मराठमोळ्या संस्कृतीमुळं अनेक कुटुंबांचा कल मराठी चित्रपट बघण्याकडं जास्त आहे. मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांच्या तुलनेनं संख्येनं कमी प्रदíशत होत असले तरी ते हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतात.

किमया मयेकर
मी ‘रेगे’ हा चित्रपट पाहिला. तो प्रदíशत होण्यापूर्वी खूप हवा झाली होती नि खूप एक्साइटमेंट होती तो बघण्याची. तो बघितल्यावर थोडी निराशा झाली. खरं तर सस्पेन्स खूप छान होता; पण चित्रपट बघितल्यावर वाटलं की, अशी मुलं असतात किंवा अशा प्रकारे अडकली जातात, हे सगळं तर आपल्याला माहितेय. मुलं कशा प्रकारे वागू शकतात, याबद्दल नवीन कोणतीही गोष्ट कळली नाही. माझ्या वयोगटातल्या सगळ्यांना चित्रपट बघताना वाटलं की, हे तर आम्हाला माहितेय. वेगळं काही तरी सांगा की, जे बऱ्याच अंशी पालकांना माहिती नसतं. मराठी नि िहदी चित्रपटांची तुलना करायची झाल्यास मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांचं प्रमोशन जास्त होतं. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल एक्साइटमेंट वाटते. मराठी चित्रपटांपकी झी टॉकीजच्या चित्रपटांचीच जास्त जाहिरातबाजी होते. इतर चित्रपटांची तेवढी प्रसिद्धी होत नसल्यानं ते चित्रपट कधी प्रदíशत होतात, ते कळतच नाही.

समिधा कुलकर्णी
मी ‘लय भारी’, ‘पोश्टर बॉईज’, ‘रमा-माधव’ हे चित्रपट पाहिले. त्यापकी ‘पोश्टर बॉईज’ हा चित्रपट म्हणजे धम्माल मनोरंजन होतं. नसबंदीसारखा नवा विषय, नवा दिग्दर्शक आणि एकदम टॉपचे हिरो नाहीत, द्वर्थी संवाद नाहीत (विषय असा असूनसुद्धा). असं असूनही संवादाच्या परफेक्ट टायिमगवर हा सिनेमा सुपरहिट झाला आहे. अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर आणि हृषीकेश जोशी केवळ अफलातून.. हल्ली मराठी सिनेमाचे विषय हिंदी चित्रपटांपेक्षा खूप वेगळे असतात. लहान बजेट असलं तरी ते पाहावेसे वाटतात. मात्र प्रसिद्धीच्या बाबतीत मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांपेक्षा कमी पडतो, असं वाटतं.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com  सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा)