सध्या तरुणाईत क्रेझ दिसतेय ती फेसबुकवरच्या ‘द बुक बकेट चॅलेंज’ची. हा ‘फेसबुक’वरील नेहमीच्या त्याच त्या पोस्टपेक्षा वेगळा प्रकार आहे. त्यात एक मेंबर दुसऱ्याला पुस्तकांच्या लिस्टसाठी नॉमिनेट करतोय. आपल्या आवडीची पुस्तकं इतरांना सांगणं नि इतरांची आवड जाणून घेणं असा हा फंडा आहे. शिवाय पुस्तकं दान करायच्या कल्पनेचा समावेश यात आहे. पुस्तकांच्या जगात रमणाऱ्यांना हा उपक्रम खूपच आवडलाय. त्याविषयी चिक्कार उलटसुलट चर्चा रंगतेय. काही पुस्तकप्रेमींनी या उपक्रमाविषयीचं मतं नि आपली आवडती टॉप ५ पुस्तकांची लिस्ट ‘व्हिवा’शी शेअर केली.

रवींद्र दीक्षित
‘द बुक बकेट चॅलेंज’ उपक्रमामुळं आणखीन चांगली पुस्तकं वाचण्यासाठी मोटिव्हेशन मिळेल. लोकांची वेगवेगळ्या विषयांबद्दलची माहिती वाढेल. आपण वाचनाविषयी जास्त जागरूक होऊ. मित्रांशी पुस्तकांवर चर्चा होईल. त्यामुळं विचारांना चालना मिळेल. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण पुस्तकं लायब्ररीमध्ये डोनेट केल्यामुळं बऱ्याच लोकांना ती उपलब्ध होतील. आपल्यालासुद्धा काहीतरी डोनेट केल्यामुळं समाधान नि आनंद मिळेल तो वेगळाच.
माझी आवडती पुस्तकं :
द अल्केमिस्ट (पावलो कोएलो), विचार नियम (श्रीश्री तेज पारखीजी), मुसाफिर (अच्युत गोडबोले), हू मुव्हड माय चीझ (स्पेन्सर जॉन्सन), द ताओ ऑफ फिजिक्स (फ्रित्योव काप्रा).

उमा परांजपे
सध्या लोकप्रिय असलेल्या या नवीन ट्रेण्डकडं काही जण फॅड म्हणून दुर्लक्ष करतीलही, पण ‘सोशल नेटवर्किंग साइट्स’मुळं ‘वाचन’ ही प्रक्रिया ग्लॅमरस होणार असेल तर त्यात वाईट काय आहे? त्यामुळं वाचनसंस्कृतीला प्रोत्साहनच मिळेल. आपल्याला आवडलेली गोष्ट दुसऱ्यांनाही आवडावी असं वाटणं, ही माणसाची गरज आहे नि या कन्सेप्टमुळं ही गरज पूर्ण होतेय. आवडत्या पुस्तकाच्या मीमांसेसोबतच त्यांविषयी सखोल चर्चा होऊन आपापसातली वैचारिक देवाणघेवाण वाढेल. आवडलेली पुस्तकं फक्त सुचावण्यापुरतीच मर्यादित न ठेवता ती डोनेटदेखील करायची कल्पनादेखील फारच छान आहे. कारण ‘शेअरिंग विल एनरिच एव्हरीवन विथ मोअर नॉलेज’.
माझी आवडती पुस्तकं :
राजा शिवछत्रपती (बाबासाहेब पुरंदरे), अपूर्वाई (पु. ल. देशपांडे), ग्राफिटी वॉल (कविता महाजन), इडली, ऑíकड आणि मी (विठ्ठल कामत), आल्फ (पावलो काएलो)

निधी गडा
“Books are man’s best friend” असं म्हटलं जातं. फेसबुकवरच्या या चॅलेंजमुळं वाचन वाढायला प्रोत्साहन मिळेल. विविध विषयांवरच्या अनेकानेक पुस्तकांविषयी माहिती मिळेल. आपले फ्रेण्डस कोणती नवीन पुस्तकं वाचताहेत हे कळल्यानं ती आपल्यालाही वाचण्याची प्रेरणा मिळेल. अशा प्रकारच्या लिस्टमुळं फेसबुकयुजर्सना वाचनाचा छंद लागेल. काही जण या चॅलेंज टूलचा वापर करून अभिजात नि नामवंत पुस्तकं-लेखकांची लिस्ट पोस्ट करतील. पण प्रत्यक्षात ती पुस्तकं त्यांनी वाचलीही नसतील, अशीही एक शक्यता आहेच.
माझी आवडती पुस्तकं :  
द हॅरी पॉटर सिरीज (जे. के. रोलिंग), इनफर्नो (डॉन ब्राऊन), टेल मी युवर ड्रिम्स (सिडने शेल्डन), द सिक्रेट  (ऱ्होंडा बायर्न), द लिटिल प्रिझनर (जेन ईलियट).

प्रांजल वाघ
या अनोख्या उपक्रमात इतरांच्या आवडत्या पुस्तकांच्या लिस्टकडं नजर टाकून मनोमन आपण आपल्या पुढील वाचनाची यादी करायला लागतो. अशा उपक्रमामुळं माहितीची देवाण-घेवाण होऊन अधिकाधिक चांगल्या पुस्तकांची माहिती मिळते. काळाच्या ओघात आणि कामाच्या व्यापात एखादं पुस्तक वाचायचं राहून गेलेलं असतं, एखादं पुस्तक वाचलेलं असतं अन् ते विस्मृतीत गेलेलं असतं. पण दुसऱ्यांनी दिलेल्या पुस्तकांची यादी पाहून ते वाचल्याची आठवण होते. मग त्या पुस्तकाच्या आठवणीत आपण परत रममाण होतो.
माझी आवडती पुस्तकं – श्रीमान योगी (रणजीत देसाई), पाथस् ऑफ ग्लोरी (जेफ्री आर्चर), डोमेल ते कारगिल (मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे), दुर्गदर्शन (गो. नी. दांडेकर), आयकोक्का (ली आयकोक्का).

अंतरा मोने
बुक बकेट ही चांगली कल्पना आहे. फ्रेण्ड्सनी अपलोड केलेल्या लिस्टमधली पुस्तकं वाचून आपल्या ज्ञानात भर पडते. मात्र एखाद्याला टॅग न केलं गेल्यास ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. अर्थात हे केवळ याच कल्पनेच्याबाबतीत घडेल असं नाही. तर ती एकूणच सोशल नेटवìकगची एक नकारात्मक बाजू आहे. आपल्याला वाटलं तरी प्रत्येकाला टॅग करणं शक्य होणार नाही. ते टाळण्यासाठी प्रत्येकानं आपली लिस्ट द्यावी. सगळ्यांच्या लिस्टमुळं आपल्या आवडत्या विषयातली महत्त्वाच्या नि अद्याप माहीत नसलेल्या पुस्तकांची माहिती मिळेल. या लिस्टमुळं लेखकांना तरुणाईच्या आवडत्या वाचन विषयांची नेमकी नस सापडेल.    
माझी आवडती पुस्तकं :
नॉट विदाऊट माय डॉटर (बेट्टी मेहमुदी), समवन लाइक यू (निकिता सिंग नि दुजरेय दत्ता), २ स्टेट्स (चेतन भगत), रिव्होल्यूशन २०२० (चेतन भगत), ओह शिट! नॉट अगेन (मंदार कोकाटे).

राजेंद्र देशपांडे
हा फंडा खरोखरीच चांगला आहे. मित्रांनी पोस्ट केलेली पुस्तकं मी खूप आवडीनं वाचेन. अद्याप न वाचलेली किंवा माहिती नसलेली पुस्तकंही मी वाचणार आहे. सध्या वाचनसंस्कृती तशी लोप पावतेय, पण या टॅगिंगमुळं पोस्ट करण्यासाठी का होईना, स्टेट्स अपडेटसाठी का होईना, दहा पुस्तकं वाचून काढली जातील. त्यामुळं आपल्या ज्ञानात भरच पडेल. सकारात्मक पद्धतीनं टॅगिंगचा उपयोग करण्यात आलाय.  
माझी आवडती पुस्तकं :
राजा शिवछत्रपती (बाबासाहेब पुरंदरे), इडली, ऑíकड आणि मी (विठ्ठल कामत), आकाशाशी जडले नाते (जयंत नारळीकर), यक्षांची देणगी (जयंत नारळीकर), २६/११ ऑपरेशन मुंबई (अतुल कुलकर्णी).

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.