आज टीव्ही वाहिन्या, एफएम यांना जे ग्लॅमर आहे, ते एकेकाळी आकाशवाणीला होतं. माध्यमांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आजही आकाशवाणी हा उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे तिथे जो आत्मविश्वास मिळतो, तो आयुष्यभर पुरतो.

नुकतीच शाळा, कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं पुढे काय करावं या विचारात असतात. अशावेळी त्यांना भुरळ घालतात ती माध्यम क्षेत्रं. माध्यमांची बरीच क्षेत्रं आज उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्र तरुणांना खुणावतं. मग तरुण मंडळी बुचकळ्यात पडतात की नक्की कुठे जावं? काय करावं? एखाद्या विषयाची आवड असते पण त्या विषयाची फारशी माहिती नसते. नक्की कुठलं माध्यम क्षेत्र निवडावं? या विचारात असलेल्या तरुण मुलांना आकाशवाणी हा एक उत्तम पर्याय आहे. एकतर हे अनेक वर्षांपूर्वीपासूनचे रेडिओ स्टेशन आहे, त्यामुळे विश्वासाचे आहे. दुसरं म्हणजे कसं लिहावं, कसं बोलावं याची पायभरणी इथे केली जाते. या क्षेत्रात वावरताना काय करावं, काय करू नये याची माहिती आपल्याला मिळते. इथे आपण तयार होतो आणि मग पुढे कुठल्याही माध्यम क्षेत्रात आपण विश्वासाने वावरू शकतो.

आकाशवाणीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलांना कुठल्या गोष्टी येणं आवश्यक आहेत याच्या बद्दल सांगताना निवृत्त वरिष्ठ श्रेणी उद्घोषक किशोर सोमण असं म्हणाले की, अस्मिता वाहिनी ही मराठी वाहिनी आहे. त्यामुळे मराठी भाषा चांगली असणं आवश्यक आहे. तसंच उत्तम लिहिता आणि बोलता यायला हवं. साहित्य, नाटक, नाटकाचा इतिहास, कविता, प्रवासवर्णनं याबद्दलची प्राथमिक माहिती हवी. संगीत परंपरा, त्यांची घराणी याचीही माहिती असावी. तसंच चित्रपट, चित्रपट संगीत, संगीतकार, गीतकार या सगळ्यांची बेसिक माहिती असावी. या सर्व विषयांची जाण असायला हवी पण याही पलीकडे काही गुण आपल्यात हवेत ते म्हणजे आपले उच्चार – डिक्शन चांगलं हवं, भाषा शास्त्राची जाण असावी म्हणजे आवाजाचे चढ-उतार, कुठल्या शब्दावर किती जोर द्यायचा, कुठे थांबायचं, कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त आशय द्यायचा. आपल्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करता यायल्या हव्यात. या सगळ्या गोष्टी आपल्याला येणं देखील महत्त्वाचं आहे.

आकाशवाणीच्या निवड चाचणीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की १०० किंवा ५० मार्काची (जी. के.)  जनरल नॉलेजवर आधारित लेखीपरीक्षा असते, त्यात उत्तीर्ण झालात की स्वर चाचणी होते. या चाचणीत तुमच्या आवाजाची चाचणी घेतली जाते. तुमचा आवाज माइकवरून कसा वाटतोय, कसा येतोय हे बघितलं जातं. स्वर परीक्षेनंतर त्यांची मुलाखत घेतली जाते, ते काय करू शकतात, त्यांची मेहनतीची कितपत तयारी आहे याचा अंदाज बांधता येतो.

ही झाली (अनाऊंसर) उद्घोषकांकरिता असलेली परीक्षा. नवोदित गायकांकरतादेखील इथे चाचणी घेतली जाते. या चाचणीमध्ये तुम्हाला माहीत असलेली साधारण २५ गाण्यांची लिस्ट अ‍ॅप्लिकेशनबरोबर त्यांना द्यायची असते. या लिस्टमधली वेगवेगळ्या प्रकारची ३ ते ४ गाणी तानपुरा आणि तबल्याच्या साहाय्याने सादर करायची असतात. म्हणजे सुराला किती पक्के आहात ते समजतं.

एकदा ही निवड प्रक्रिया पार पडली की मग वाणी कोर्स सुरू होतो. या कोर्समध्ये वेगवेगळ्या विषयावर लेक्चर्स घेतली जातात. तज्ज्ञ मंडळी त्यांच्या विषयाची माहिती देतात. मुलांकडून काही गोष्टी करून घेतल्या जातात. कविता, नाटकाचे उतारे, एखादे प्रवासवर्णन कसं वाचावं याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. नियमांची माहिती दिली जाते.

आधीच्या आणि आत्ताच्या कार्यक्रम सादरीकरणात पण खूप फरक पडला आहे. सोमण सर म्हणाले की आधीचे सादरीकरण म्हणजे जसं तयार जेवण होतं, ते फक्त वाढण्याचं काम असायचं पण आत्ताचं सादरीकरण म्हणजे जेवण बनवायचं आणि मग ते वाढायचं अशी दोन्ही कामं असतात. आता स्क्रिप्ट लिहावं लागतं आणि सादरीकरण चांगलं होणं पण महत्त्वाचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर असं वाक्य घेतलं की सूर्याची किरणे दिसती गवाक्षामधून तर सर्वसाधारण लोकांना सहज समजू शकेल असं हे वाक्य होणार नाही. त्यापेक्षा जर असं म्हटलं की सूर्याची किरणं खिडकीतून दिसतात, तर हे साधं सरळ सोप वाक्य होईल जे लोकांना सहज कळू शकेल आणि श्रोत्यांना ते आपलंसं वाटेल. या सगळ्या गोष्टींप्रमाणे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवाज. चांगला आवाज ही नैसर्गिक देणगी आहे. त्यावर मेहनत करण्याची तयारी असायला हवी.

आकाशवाणीच्या तांत्रिक बाबींबद्दल बोलताना आकाशवाणीच्या सहाय्यक निर्देशक                 (कार्यक्रम प्रमुख) सुजाता परांजपे असं म्हणाल्या की पूर्वी टेप डेस्क होते त्याच्या सहाय्याने गाणी लावली जायची. रेकॉर्ड केलेले कार्यक्रम या टेपवर  एडिट करणं फारसं सोपं नव्हतं. उदाहरण सांगायचं झालं तर नाटकाचा एखादा उतारा एडिट करायचा असेल, त्यात साऊंड इफेक्टस् द्यायचे असतील तर तो विशिष्ट आवाज एका टेपमधून घ्यायचा, मधल्या मास्टर टेपमध्ये तो रेकॉर्ड करायचा, पण हे करत असताना वेळेचं भान असायला हवं कारण जरा पुढे मागे झालं तर हवा तो आवाज हवा त्या ठिकाणी मिळत नाही. काळानुरूप तांत्रिक गोष्टी बदलल्यात. टेपची जागा आता कॉम्प्युटरने घेतली आहे. गाणी शोधणं आणि क्यू करणं आता सोपं झालं आहे. ऑनलाइन लाइव्ह कार्यक्रम ऐकण्याची सोय आहे. ऑल इंडिया रेडिओ लाइव्हअ‍ॅपने ते शक्य केलं आहे.

अगदी सुरुवातीला रेडिओ स्टेशन म्हटलं की फक्त आकाशवाणीच होत, त्यानंतर बरेच एफ.एम स्टेशनस् आले. यामुळे असं झालं की स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेचा फायदा आम्हाला असा झाला की आमच्या कार्यक्रमात चांगला बदल करता आला. आधी आम्ही ज्या मुलाखती घ्यायचो किंवा रेकॉर्ड केलेली भाषणं असायची ते १५ मिनिटांचे  टॉकस् असायचे. एफ.एम च्या आगमनामुळे आणि त्यांची सादरीकरणाची पद्धत बघून आम्ही आमच्या सादरीकरणात काही बदल केले. १५ मिनिटांचे कार्यक्रम (टॉक) कमी करून त्याचे टॉकलेट केले. कार्यक्रमाची वेळ कमी करून हवे ते मुद्देच त्या कार्यक्रमात सामावण्याचा प्रयत्न केला. काळानुरूप भाषेत फरक पडला आहे. वनिता मंडळसारखे महिलांकरता प्रसारित होणारे कार्यक्रम, ज्यामध्ये महिला वर्गाला भगिनी म्हणून संबोधलं जायचं, पण आता मैत्रिणींनो असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी आकाशवाणीची लोकल रेडिओ स्टेशनस् आहेत, त्या त्या भागातल्या राहाणाऱ्या तरुण कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळते. या कलाकारांना सादरीकरण करण्यात मोकळीकही मिळते.

माध्यम क्षेत्रात प्रवेश कसा मिळवावा? त्यासाठी काय गुण आपल्यात हवेत, कुठल्या गोष्टींची माहिती हवी हे आणि असे बरेच प्रश्न ज्यांना पडतात ती सर्व तरुण मंडळी जेव्हा आकाशवाणीची पायरी चढतात, तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना अपोआपच सापडतात.
ग्रीष्मा जोग बेहेरे –