एखादं कार्टुन बोलताना बघून आपल्याला रेकॉर्डिग- डबिंगबद्दल खूप कुतूहल वाटायला लागतं. या क्षेत्राचं ग्लॅमर आपल्याला खुणावायला लागतं. काय आहे हे क्षेत्र? नेमकं कसं काम करतं ते?
‘अगं माझा आवाज आज बसला आहे, त्यामुळे मीटिंगला नाही येत.’
‘मला खोकला झाला आहे, बोलायला मला त्रास होतो आहे.’
‘बोलायला त्रास होतोय, आवाज बसला आहे.’
यांसारखी कारणं आपण प्रसार माध्यमांमध्ये काम करत असू तर देऊ शकत नाही. प्रसार माध्यमांच्या बऱ्याच क्षेत्रांत आवाज हा खूप महत्त्वाचा आहे. नाटक असो, चित्रपट असो, मालिका किंवा रेडिओ. आवाज हे आपल्या भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. त्यातून चित्रपट, मालिका, नाटक यामध्ये कलाकार प्रेक्षकांना दिसत असतात त्यामुळे आवाजाबरोबर कलाकारांचा वावर, हालचाली, देहबोली याकडेदेखील आपलं लक्ष जातं. पण रेडिओ आणि डबिंग किंवा रेकॉर्डिग यामध्ये फक्त आवाजच लोकांपर्यंत पोहोचत असतो. डबिंगमध्ये दुसऱ्या व्यक्तीला, पात्राला आपण आवाज देत असतो.
आपला आवाज कसा वापरावा, त्याची काळजी कशी घ्यावी, या क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्यांनी काय करावं आणि काय करू नये या संदर्भात बोलताना नाटकाचे दिग्दशर्क , अभिनेते आणि डबिंगच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षेकाम करणारे अजित भुरे सांगतात की या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांनी सर्वात आधी हा गैरसमज दूर करायला हवा की आवाज चांगला असेल तरच या क्षेत्रात येऊ शकतो. आवाज हा कधी वाईट नसतो. प्रत्येकाच्या आवाजाला काहीतरी व्यक्तिमत्त्व म्हणजे कॅरेक्टर असतं. ते व्यक्तिमत्त्व कसं वापरायचं हे प्रत्येक दिग्दर्शकावर अवलंबून असतं. काहींचा आवाज बारीक असतो तर काही जणांचा घोगरा, बसका. अशा प्रकारचे आवाज बऱ्याचदा नकारात्मक भूमिकांसाठी वापरतात. आपला आवाज शेवटपर्यंत चांगला ठेवायचा, टिकवायचा असेल तर आवाजाचे व्यायाम असतात ते करायला हवेत. या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारी ज्येष्ठ मंडळी आवाज चांगला राहावा म्हणून हार्मोनियमवर रियाज करतात. या क्षेत्रात जर तग धरून राहायचं असेल तर आवाजाची काळजी घेणं, आवाजाचे व्यायाम करणं आवाज कसा वापरायचा याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आवाजाचा पिच, व्हॉल्युम, उच्चारशास्त्राचा अभ्यास असणंपण महत्त्वाचं आहे. सध्या या क्षेत्रात खूप वाव असला तरी प्रशिक्षित कलाकारांची कमी जाणवते. प्रशिक्षण हे फक्त आवाजाचंच नाही तर अभिनयाची जाण किंवा प्रशिक्षणपण आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तिरेखेला आवाज देताना तिला तो आवाज योग्य वाटतोय का हे तर बघायला हवंच. त्याबरोबर आपण व्यक्त होताना योग्य तो मूड पकडतोय का हे बघणंपण तितकंचं जरुरीचं आहे. नुसता या क्षेत्रात रस असून उपयोगाचं नाही तर त्याबरोबरीने त्याचं प्रशिक्षणपण घेतलेलं असायला हवं. बदलत्या तांत्रिक गोष्टींबरोबर आपणसुद्धा बदलायला हवं. आवाजाबरोबर तांत्रिक गोष्टींचंपण तितकंच महत्त्व आहे.
तांत्रिक गोष्टी तेव्हा आणि आता कशा बदलल्यात आणि या क्षेत्रात याचा वापर कसा करता असं विचारलं असता अजित भुरे म्हणाले की आता खूप गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी चार वाक्यांतलं एखादा शब्द चुकला तर परत सगळी वाक्यं रेकॉर्ड करावी लागायची. आता तसं नाही होत. जे वाक्य किंवा शब्द चुकला असेल तेवढंच रेकॉर्ड केलं तरी चालतं. ही सोय झाली आहे खरी, पण त्यामुळे दर्जावर घाला आल्यासारखं वाटतं.

डबिंग आणि रेकॉर्डिग यात फरक आहे, पण बऱ्याचदा या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच आहे अशा प्रकारे आपण शब्द वापरतो. अजित भुरे सांगतात की रेकॉर्डिग म्हणजे ध्वनिमुद्रण करणे. डबिंग म्हणजे दोन गोष्टींचा मेळ साधणे. तो मेळ गाणं आणि संगीताचा असेल किंवा कुठल्याही दोन गोष्टींचा. हाच फरक आहे डबिंग आणि रेकॉर्डिगमधला.
या क्षेत्रात पदार्पण कसं झालं यावर ते म्हणाले की माझी सुरुवात एकांकिकांपासून झाली. नंतर आकाशवाणीच्या चाचणी परीक्षेत बी प्लस या श्रेणीने उत्तीर्ण झालो. ही गोष्ट आहे १९८० मधली. नंतर दूरदर्शन, मग रेडिओ कमर्शियल्स आणि नंतर डबिंग असा सगळा प्रवास झाला. डबिंगची सुरुवात करताना फार जड गेलं नाही, कारण आधी नाटकात काम करत होतो त्यामुळे आभिनय नव्याने शिकायचा नव्हता. त्या वेळी हे क्षेत्र नवीन होतं म्हणून या क्षेत्रात काम करणारे लोकपण कमी होते आणि आत्ताच्या मानाने कामपण अर्थातच कमी होतं. त्या वेळेला दोन ते तीन दिवस आधी हातात स्क्रिप्ट मिळायचं. मग त्याची तालीम करायची आणि नंतर रेकॉर्डिग किंवा डबिंगसाठी माइकसमोर उभं राहायचं. आता मात्र चित्र बदललेलं दिसतं. तालमीला हल्ली कोणाकडे वेळच नसतो. आता असं होतं की स्क्रिप्ट दिली की लगेच रेकॉर्डिग करावं लागतं, त्यामुळे त्या स्क्रिप्टवर जितका वेळ व्यतीत करायला हवा तितका केला जात नाही.
गेली २५ – ३० वर्षे बंगाली भाषेत डबिंगच्या क्षेत्रात काम करणारे देबाशीष बॅनर्जी जाहिरातींच्या डबिंगबद्दल सांगतात की जाहिरातीत आवाज देण्याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. यात दोन प्रकार असतात, जाहिरातीत दोन व्यक्ती बोलताना दाखवतात तेव्हा त्यांच्या आवाजाला कॅरेक्टर व्हॉइस म्हणतात. जाहिरातीची शेवटची ओळ असते ज्यात त्या वस्तूबद्दल सांगतात त्या आवाजाला व्हॉइस ओव्हर म्हणतात. बहुतेकदा जाहिराती हिंदी भाषेत डब केल्या जातात, त्याला मास्टर म्हणतात. मास्टर मान्य झालं तर मग ती जाहिरात इतर भाषांमध्ये डब होते. बजेट कमी असेल तर एकदाच शूट करतात आणि वेगवेगळ्या भाषेत डब करतात. अशा वेळी जाहिरातीतल्या मॉडेलच्या ओठांची हालचाल हिंदी शब्दाप्रमाणे असते आणि जर मल्याळम भाषेत करायचं झालं तर ते मोठं आव्हान असतं ते स्क्रिप्ट लिहिणाऱ्याला. हिंदीचे शब्द छोटे असतात आणि मल्याळमचे मोठे. जोपर्यंत ओठाची हालचाल सुरू आहे तेवढय़ा वेळेत ते संपवायचं असतं. बहुतेक सर्व भाषांचं डबिंग मुंबईतच होतं. काही वेळेला त्या त्या राज्यातपण होतं. काही वेळेला त्या कंपनीचं मुख्य कार्यालय महाराष्ट्राबाहेर असतं आणि मग तिथल्या स्थानिक एजन्सींना ते काम देणं सोयीच होतं.
डबिंग आणि रेकॉर्डिग हे क्षेत्र ग्लॅमरस वाटलं तरी त्यामागची मेहनत बघणं तितकंच आवश्यक आहे. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढीच यशाची संधी मिळेल. आवाज कसा वापरायचा, त्याची काळजी कशी घ्यायची, आवाज शेवटपर्यंत टिकवण्यासाठी काय करायला हवं या सगळ्या गोष्टी कळल्या आणि चांगल्या तयारीने तुम्ही उतरलात तर हे क्षेत्र नक्कीच तुमची वाट पाहताना दिसेल.
response.lokprabha@expressindia.com