कासवांची तस्करी करणाऱ्या मोठय़ा आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय टोळीचा उलगडा होण्याचे संकेत वनखात्याने दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच १०० कासवांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वनखात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आलेली कासव तस्करी देशांतर्गत नसून त्याचे थेट आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे त्याच वेळी स्पष्ट झाले होते. काही महिन्यांपूर्वी मुंबईतही मोठय़ा संख्येने कासवांची तस्करी उघडकीस आली होती. नागपूर प्रकरणातील आरोपींना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे या कालावधीतच त्यांच्याकडून कासव तस्करीचे धागेदोरे उलगडण्याचे मोठे आव्हान वनखात्यासमोर होते. त्यात वनखाते बरेच यशस्वी ठरले असून या प्रकरणातीलच नव्हे, तर एकूणच कासव तस्करीशी संबंधित अनेक माहिती वनखात्याच्या हाती आली आहे. आज या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या दोन्ही आरोपींकडून इतर आरोपींची माहिती हाती आली असून, लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यजीव तस्करीच्या तपासात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेसारख्या केंद्र सरकारच्याच काम करणाऱ्या काही संस्था आहेत. स्थानिक पातळीवरून या प्रकरणाचा उलगडा होणे शक्य नसल्याने अशा काही संस्थांची मदत घेतली जात आहे.

कासवे लखनऊला

कासव तस्करीचा उलगडा झाला तेव्हाच काही कासवांचा गुदमरल्याने मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर या १५ दिवसात केवळ एकच कासव मृत्युमुखी पडले. या सर्व कासवांना सेमिनरी हिल्सवरील रोपवाटिकेत एका मोठय़ा टाक्यात ठेवण्यात आले आहे. पुनर्वसन केंद्रात घेतली जाणारी सर्व काळजी येथेही घेतली जात आहे. नियमित त्यांची तपासणी आणि उपचार सुरू आहेत. जिवंत छोटय़ा मासोळ्या आणि शेवाळ यासारखे त्यांचे खाद्यही त्यांना पुरवले जात आहे. नागपूर वनखात्याने या सर्व कासवांना लखनऊ येथे नेण्यासंदर्भात सर्व कारवाई पूर्ण केली असून, उत्तरप्रदेश सरकारच्या परवानगीच्या प्रतिक्षेत ते आहेत. लखनऊ येथे नेल्यानंतरसुद्धा त्यांना आधी पुनर्वसन केंद्रात आणि नंतर त्यांच्या मुळ अधिवासात सोडण्यात येणार आहे.