उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर, कृषी विभागासह महसूल यंत्रणा चांगलीच कामाला लागली असून सायंकाळी उशिरापर्यंत नुकसानीच्या प्राथमिक अंदाजाची माहिती एकत्रित करण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू होती. १३ व १४ मार्च असे सलग दोन दिवस केंद्रीय पथक नाशिक, धुळे व जळगाव या जिल्ह्यात नुकसानीचे प्रत्यक्ष अवलोकन करणार आहे. मृदू संधारण विभागाच्या नाशिक विभागाच्या पालक संचालकांनी बुधवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक विभागात एक लाख दहा हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात जवळपास ६५ ते ७० टक्के क्षेत्रात ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजावरून स्पष्ट झाले आहे.
मागील फेब्रुवारी महिन्यात उत्तर महाराष्ट्रातील काही भागास अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला होता. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना कोसळलेल्या संकटाने द्राक्षबागांसह गहू, हरभरा, कपाशी फळबागा आदी पिकांचे नुकसान केले होते. या संकटातून शेतकरी कसाबसा सावरत असताना गारपिटीने झोडपून काढले. सलग आठवडाभर कोसळणाऱ्या
नैसर्गिक आपत्तीने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार वगळता नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात गारपिटीने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले. धुळे जिल्ह्यात ४२ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावरील तर जळगाव जिल्ह्यात ३४ हजार ४७३ हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली. नाशिक जिल्ह्यात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा परिसरातील काही भागांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व तालुके गारपिटीच्या तडाख्यात सापडले. मालेगाव, बागलाण, निफाड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, देवळा, येवला आदी भागात गारांचा अक्षरश: खच पडला होता. या भागातील जवळपास २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना त्याचा फटका बसला. त्यात नऊ हजार हेक्टरवरील पिके ५० टक्क्यांहून कमी तर उर्वरित १३ हजार हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे विभागीय कृषी विभागाकडून सांगण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात हा आकडा बराच कमी आहे. या भागातील २७६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीने शेतकरी कोलमडून पडला असून शासकीय मदतीकडे त्याचे डोळे लागले आहेत. आचारसंहितेमुळे ही मदत अद्याप जाहीर झाली नसताना केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर येत आहे. या घडामोडींमुळे बुधवारी कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये एकच धावपळ सुरू होती. केंद्रीय पथकाला एका विशिष्ट प्रकारात माहिती सादर करावयाची आहे. नऊ मार्चपर्यंत गारपीट सुरू असल्याने स्थानिक कार्यालयांकडून सुधारीत आकडेवारी जमविण्याची कसरत विभागीय कृषी अधिकारी कार्यालयात सुरू होती. विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी दिवसभर बैठका घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. एकिकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग सुरू असताना दुसरीकडे याच दिवशी मृद संधारण नाशिक विभागाचे पालक संचालक एस. एन. अमुलगेकर हे नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. विभागीय कृषी अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्याचे सांगण्यात आले.
नाशिक व धुळे जिल्ह्यात केंद्रीय पथकातील आर. एल. माथूर व एस. एम. कोल्हटकर तर जळगाव जिल्ह्यात संजीव चोप्रा हे भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहे. १३ व १४ मार्च दरम्यान हा दौरा झाल्यावर सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पथकातील सदस्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बाबतची माहिती विभागीय महसूल उपायुक्त सतीश देशमुख यांनी दिली.