चार नाटय़निर्मात्यांच्या सहकाराचा आगळा ‘प्रयोग’, सहा गाजलेल्या नाटकांतील प्रवेशांची एकत्रित गुंफलेली शृंखला तसेच नाटय़, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांतील नामांकित कलाकारांची मांदियाळी यामुळे रसिकांच्या औत्सुक्याचा विषय ठरलेल्या ‘नांदी’ या रंगाविष्काराचा शतकमहोत्सवी प्रयोग येत्या सोमवारी, ११ मे रोजी सायंकाळी ५ वा. रवींद्र नाटय़मंदिरात सादर होणार असून, त्यानंतर त्याचे प्रयोग थांबणार आहेत. या शतकमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रसिक आदींनी ‘नांदी’संदर्भात लिहिलेल्या लेखांचे पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार आहे.
 लेखक-दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अभिनव रंगप्रयोग प्रथम नाटय़संमेलनात सादर झाला होता. त्यानंतर त्याचे व्यावसायिक प्रयोग करण्याचे ठरले आणि दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंद्रकांत लोहकरे आणि संज्योत वैद्य अशा चार निर्मात्यांनी एकत्र येत ‘नांदी’ सहकारी तत्त्वावर रंगमंचावर सादर करण्याचे ठरवले. मराठी रंगभूमीच्या इतिहासात चार निर्मात्यांनी एकत्र येऊन नाटय़प्रयोग सादर करण्याची ही तशी दुर्मीळच घटना होय. एका सूत्रात गुंफलेल्या आणि पूर्वी गाजलेल्या सहा नाटकांमधील प्रवेश एकत्रितपणे पाहण्याची संधी हेही या रंगप्रयोगाचे एक आकर्षण होते. प्रयोगशील नेपथ्यकार व प्रकाशयोजनाकार प्रदीप मुळ्ये, संगीत दिग्दर्शक राहुल रानडे आणि वेशभूषाकार गीता गोडबोले यांचाही ‘नांदी’च्या यशात मोलाचा वाटा आहे. अविनाश नारकर, प्रसाद ओक, हृषिकेश जोशी, शरद पोंक्षे, अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, सीमा देशमुख, अश्विनी एकबोटे, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी अशा विविध कलामाध्यमांमध्ये व्यग्र असलेल्या नामवंत कलाकारांचा सहभाग हेही ‘नांदी’चे बलस्थान! हल्ली कुठलेच नाटक कलावंतांच्या नानाविध अडचणींपायी ‘रिप्लेसमेंट’शिवाय सादर होऊ शकत नसताना ‘नांदी’मधले मात्र सर्व कलाकार निरनिराळ्या माध्यमांमध्ये व्यग्र असूनही आजवरच्या एकाही प्रयोगात ‘रिप्लेसमेंट’ करण्याची पाळी आली नाही, हेही या प्रयोगाचे वैशिष्टय़ होय.