नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेंतर्गत आतापर्यंत ११ मुलांचा शोध लागला आहे. यातील चार मुलांची रवानगी बालसुधारगृहात केली असून इतरांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
नवी मुंबईत हरविलेल्या आणि अपहरण केलेल्या मुलांना शेाधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत शोध मोहीम पोलिसांनी राबवण्यास घेतली आहे. त्याअंतर्गत तळोजा पोलीस ठाणे हद्दीत अपहरण झालेल्या अंकुश सिंग या आठ वर्षीय मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पनवेल तालुक्यातील पडगा गावात राहणारा अंकुश सिंग याचे अपहरण त्याच्या घरासमोरून झाले होते. या प्रकरणाचा गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून वर्षभर तपास सुरू होता. दरम्यान कर्नाटक राज्यात एक मुलगा बेवारसपणे फिरत असताना मिळून आल्याने त्यास तेथील पोलिसांनी भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अंकुशला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे. अशाच प्रकारे इतर मुलांचाही शोध लागला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.