शहरात अनधिकृतपणे वृक्षतोडीचे सत्र अव्याहतपणे सुरू असतानाच सातपूरच्या बजरंगनगर भागात एकाचवेळी ११२ झाडांची कत्तल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने परवानगी न घेता तोडलेल्या झाडांप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून एकाविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अनधिकृतपणे झाडे तोडण्यांचे प्रकार वारंवार घडत असतात. महापालिका ठोस कारवाई करत नसल्याने या प्रकारांना बळ मिळाल्याची पर्यावरणप्रेमींची भावना आहे. दुसरीकडे झाडे तोडण्यास परवानगी देताना केवळ कागदोपत्री नियमांचा सोपस्कार पार पाडला जातो. ज्याला झाडे तोडण्याची परवानगी मिळाली, त्याने पुढे त्या अनुषंगाने कार्यवाही केली याची तपासणी केली जात नाही. या एकूणच परिस्थितीत सातपूर भागातील बंजरंगनगर येथे एकाचवेळी ११२ झाडांची तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बजरंगनगर येथे चंद्रकांत लक्ष्मीकांत सोनी हे वास्तव्यास आहेत. येथील सव्‍‌र्हे क्रमांक ४३२ या मोकळ्या जागेत पालिकेने मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. मागील आठवडय़ात सोनी यांनी पालिकेची कुठलीही परवानगी न घेता बजरंगनगर मधील सिल्व्हर ओकची सुमारे ११२ झाडे तोडली. हा प्रकार सोमवारी उद्यान विभागाच्या निदर्शनास आला. एकाचवेळी इतकी झाडे तोडण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. या घटनेची गंभीर दखल घेत उद्यान निरीक्षक वसंत मोगल यांनी सातपूर ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून सोनी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत संशयिताला अटक झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सातपूर-गंगापूर जोड रस्त्यावर काही वर्षांपूर्वी अशा पध्दतीने पालिकेच्या जागेवरील झाडांना पेटवून देण्याचा प्रयत्न झाला होता. मोतीवाला महाविद्यालयासमोर घरकूल योजना करण्याचे नियोजन होते. स्थानिकांनी त्यास तीव्र विरोध केला. या ठिकाणी पालिकेची मोठी जागा आहे. त्यावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ही झाडे पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची बाब पर्यावरण प्रेमींनी उघडकीस आणली होती. त्यानंतर परिसरात एकाचवेळी वृक्ष तोडण्याचा हा पहिलाच प्रकार घडला. अनधिकृतपणे शहरात या पध्दतीने अनेक झाडे सर्रासपणे तोडली जातात. त्याकडे पालिका यंत्रणा कानाडोळा करते.
पालिकेने कठोर भूमिका स्विकारल्यास या पध्दतीने झाडे तोडण्यास कोणी धजावणार नाही, अशी पर्यावरणप्रेमींची अपेक्षा आहे. पालिकेच्या उद्यान विभागाचा कारभार वेगळ्याच धाटणीने चालतो, अशी टीका संबंधितांनी केली.