बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक तपासूच शकत नाहीत. कारण पेपर झाल्यानंतर त्या विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक पुणे बोर्डात होऊन पेपरमधील चुका व त्रुटींवर या बैठकीत चर्चा होते. त्यांना कशा प्रकारे गुणदान केले पाहिजे, त्याचे पत्र काढले जाते. हे पत्र सर्व नियामकांना दिले जाते. त्या सूचनांनुसारच उत्तरपत्रिका तपासून गुणदान होत असते. नियामकाचेच गुण ग्राह्य़ धरले जातात. ही प्रक्रिया या वर्षी मुख्य नियामक व सर्व नियामकांनी केली नाही. कारण त्या बैठकीलाच ते उपस्थित नव्हते, असे जुक्टाचे प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे व जिल्हा सरचिटणीस प्रा. संभाजी कमानदार यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सर्व मुख्य नियामक व नियामक हे अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक असतात. त्यामुळे विनाअनुदानितचे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना तशा सूचना मिळाल्या नसल्यामुळे ते उत्तरपत्रिका तपासूच शकत नाहीत. तसेच विनाअनुदानित प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्याचा अनुभव नसल्यामुळे ते योग्य मूल्यमापन करू शकणार नाहीत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणार असल्याचे वृत्त चुकीचे व दिशाभूल करणारे असल्याचे जुक्टाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.