अल्पवयीन मुलांच्या हाती पडलेला ‘स्मार्टफोन’ तसेच इंटरनेट या माध्यमांचा कसा गैरवापर होऊ शकतो यावर येथे आढळून आलेल्या बॉम्बसदृश वस्तूच्या घटनेने प्रकाश टाकला आहे.
इंटरनेटच्या आधारे एका महाविद्यालयीन तरुणाने पेट्रोल बॉम्ब बनविण्याची माहिती धुंडाळली. मग प्रत्यक्षात असा बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करून कोणाची लुबाडणूक करता येईल, याचा विचार केला. त्यासाठी पुन्हा इंटरनेटच्या मदतीने नामांकित सुयोजित बिल्डकॉनच्या कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक मिळविला. बॉम्बद्वारे घबराट पसरवून पैसे उकळण्याचा त्याचा मानस होता. त्यासाठी हे कार्यालय ज्या ठिकाणी आहे, त्या परिसराची पाहणी केली आणि बुधवारी दुपारी कार्यालयात एका बॉक्समध्ये ही बॉम्बसदृश वस्तू ठेवून तो अंतर्धान पावला.
सुयोजित बिल्डकॉनच्या कार्यालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवण्याच्या घटनेमागील गूढ पोलीस यंत्रणेने उकलले असून बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे उकळण्यासाठी महाविद्यालयीन अल्पवयीन युवकाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या संशयितास अटक करण्यात आली असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. सधन कुटुंबातील युवकाच्या या कृत्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे. बुधवारी दुपारी सुयोजित बिल्डरच्या कार्यालयात बॉक्समध्ये बॉम्बसदृश वस्तू ठेवण्यात आली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी केली असता बॉक्समध्ये पेट्रोल भरलेली बाटली, बॅटरी, वायर व सर्किट आढळून आले होते.
पथकाने तो निकामी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस यंत्रणेने संशयिताचा शोध सुरू केला. बॉक्स कोणी उघडून पाहिला किंवा नाही याची विचारणा संशयिताने दूरध्वनीद्वारे केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयिताच्या हालचाली टिपल्या गेल्या होत्या. हे चित्रण आणि कार्यालयात आलेला दूरध्वनी यांचा आधार घेऊन तपास यंत्रणेने शोध सुरू केल्यावर त्याचे धागेदोरे या युवकापर्यंत पोहोचले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचा शोध घेण्यात आल्याचे बारगळ यांनी नमूद केले.
बॉम्बसदृश वस्तू ठेवण्यामागे संशयिताचा बिल्डरकडून पैसे मिळविण्याचा प्रयत्न होता. इंटरनेटद्वारे पेट्रोल बॉम्ब तयार करण्याची जुजबी माहिती त्याने प्राप्त केली होती. साहित्य जमवून अंबड येथील मित्राच्या घरी त्याने बॉम्बसदृश वस्तू तयार केली. उपरोक्त घरात कोणी वास्तव्यास नाही. त्या ठिकाणी रंगकाम सुरू होते. युवकाने त्या जागेचा वापर या कामासाठी केला. ही वस्तू तो स्वत:च्या गाडीवरून सुयोजित बिल्डर्सच्या कार्यालयात घेऊन गेला.
या माध्यमातून धमकाविणे आणि नंतर पैशांची मागणी करणे असा संशयिताचा प्रयत्न होता. या प्रकरणात अजून काही बाबींचा सखोल तपास केला जाणार आहे. हे साहित्य संबंधिताने कुठून खरेदी केले, या कटात त्याच्यासमवेत कोणी अन्य साथीदार होता काय याची छाननी करण्यात येणार असल्याचे बारगळ यांनी नमूद केले. तपासात निष्पन्न झालेल्या बाबीवरून संशयितावर खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

बॉम्ब की बॉम्बसदृश्य वस्तु ?
संशयिताचा बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न होता. त्याने बनविलेली वस्तू बॉम्ब होती की नाही याची स्पष्टता अद्याप पोलीस यंत्रणेने केलेली नाही. ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा बॉम्बशोधक व नाशक पथकाने तो निकामी केला होता. तसेच पथकाकडून तो बॉम्ब असल्याचे सांगितले गेले. तथापि, पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र ती बॉम्बसदृश वस्तू असल्याचे म्हटले होते. या संदर्भात विचारणा केली असता पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे नमूद केले.