महावितरण वीज कंपनीतील १३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आणि वीज सहाय्यकांना येत्या १ ऑगस्टपासून ही मानधन वाढ लागू करण्यात आली आहे.
औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ च्या कलम (२)(स) नुसार उपरोक्त कामगार श्रमिक श्रेणीत मोडत नसून ६ ते १० हजार मानधनावर नेमलेले ते कंत्राटी कामगार आहेत. रोजंदारी कामगारांच्या वेतनवाढीचा करार २६ जूनला झाला. मानधनावर नेमलेल्या या कंत्राटी कामगारांचा कंत्राटाचा अवधी संपल्यानंतर त्यांना महावितरण व्यवस्थापन कनिष्ठ तंत्रज्ञ, उच्चस्तर लिपीक आणि कनिष्ठ यंत्र चालक या पदावर नियुक्त करते. त्यावेळी त्यांना २६ जूनला जाहीर करण्यात आलेल्या वेतनश्रेणी व वेतनवाढीचे फायदे मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार उपकेंद्र सहाय्यकांना प्रथम वर्षांत ९ हजार, द्वितीय वर्षांत १० हजार आणि तृतीय वर्षांत ११ हजार रुपये मानधन मिळणार आहे. लेखा सहाय्यकांना प्रथम वर्षांत १२ हजार ५००, द्वितीय वर्षांत १३ हजार ५०० आणि तिसऱ्या वर्षांत १४ हजार ५०० रुपये मानधन रूपात मिळेल. कनिष्ठ सहाय्यकांना प्रथम वर्षांत १० हजार, द्वितीय वर्षांत ११ हजार आणि तिसऱ्या वर्षांत १२ हजार मिळणार. वीज सहाय्यकांना प्रथम वर्षांत ७ हजार ५००, द्वितीय वर्षांत ८ हजार ५०० आणि तृतीय वर्षांत ९ हजार ५०० मानधनापोटी देण्यात येणार आहेत. या संदर्भात प्रकाशगड येथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे कार्याध्यक्ष मोहन शर्मा, सरचिटणीस सी.एन. देशमुख, उपसचिव कृष्णा भोयर यांनी वेतनवाढ समितीचे प्रमुख दत्तात्रय व्हावळ यांच्याशी चर्चा केली.
महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने कायमस्वरूपी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ दिल्यानंतर १३ हजार कंत्राटी सहाय्यकांच्या मानधनात त्याच धर्तीवर वाढ करावी हा प्रश्न फेडरेशनने लावून धरला होता. ही वाढ मान्य करणारे परिपत्रक महावितरण व्यवस्थापनाने २१ जुलैला जारी केले आहे. त्यानुसार येत्या १ ऑगस्टपासून दरमहा उपरोक्त वाढ दिली जाईल.