कल्याण- डोंबिवली पालिका हद्दीत विविध ठिकाणी १३२ डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. पालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याची टीका स्थायी समितीच्या बुधवारच्या सभेत सदस्यांनी केली.
पालिका अधिकाऱ्यांनी मात्र हे डेंग्यूचे रुग्ण नाहीत. नियमित आजारात ताप, सर्दी, थंडी, डोकेदुखी असे प्रकार होतात. त्यामधील हे रुग्ण आहेत, असा दावा केला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये तापाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात येत आहेत. या रुग्णांची माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळवली की पालिकेचे अधिकारी आमच्या मागे लागतात आणि कामे सोडून पालिकेत फे ऱ्या मारणे, माहिती देणे अशा कामाला जुंपतात. त्यामुळे आम्ही पूर्ण क्षमतेने रुग्णांवर उपचार करतो. काही संशयास्पद वाटले तरच त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करतो, असे खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी सांगितले.
पालिकेच्या वैद्यकीय विभागाला सक्षम मुख्य वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून पालिकेच्या वैद्यकीय विभागाचा बोजवारा उडाला आहे. पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांची परवड होत आहे. या सगळ्या गोंधळात रुग्णांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागते, अशी टीका रुग्ण नातेवाइकांकडून केली जाते. शासन पालिकेला सक्षम मुख्य वैद्यकीय अधिकारी देत नसल्याने वैद्यकीय आरोग्य विभागाचा गोंधळ उडाला आहे, अशी टीका नगरसेवकांकडून केली जाते.