कल्याण-कर्जत/कसारा परिसरात गेल्या दहा वर्षांत वाढलेल्या प्रवासी संख्येच्या तुलनेत उपनगरी रेल्वे सेवा अत्यंत अपुरी असून या भागात १५ डब्यांची गाडी नको, तर त्याऐवजी दर १५ मिनिटांनी फेरी असणे गरजेचे आहे. सध्या वांगणी-कर्जत भागात सरासरी दर तासाला एक फेरी आहे. टिटवाळा-कसारा मार्गावरही तशीच परिस्थिती आहे. तीन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात ठाणे-कर्जत/कसारा मार्गावर ३२ फेऱ्या सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली होती, त्याची अद्याप पूर्तता होऊ शकली नाही. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे सातत्याने सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याने कल्याण पट्टय़ातील रेल्वे प्रवाशांमध्ये असंतोष आहे.
येत्या १५ फेब्रुवारी रोजी या मार्गावर काही फेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने डिसेंबर महिन्यात दिले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस घोषणा रेल्वेच्या वतीने करण्यात आलेली नाही. यासंदर्भात उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मध्य रेल्वेचे साहाय्यक महाव्यवस्थापक बॅनर्जीची ८ फेब्रुवारी रोजी होणारी बैठकही रद्द झाली. आता ही बैठक येत्या शुक्रवारी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत जादा फेऱ्यांचा आग्रह धरला जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.  
० खरे तर ठाणे-नवी मुंबई रेल्वे सेवा सुरू झाली, त्याच वेळी वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन ठाणे-कर्जत/कसारा मार्गावर नियमित शटल सेवा सुरू होणे आवश्यक होते. प्रवासी संघटनेने बरीच वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या मार्गावर शटल सेवेची निकड रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आली. तीन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मार्गावर ३२ फेऱ्या सुरू करण्याची घोषणाही केली. मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी नाही. पूर्वी कल्याणहून कसारा-कर्जतसाठी नियमित उपनगरी फेऱ्या सुरू होत्या. त्याही मध्यंतरीच्या काळात रद्द करण्यात आल्या. ठाण्याहून फेरी सुरू करण्यात काही अडचणी असतील तर किमान कल्याणहून या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
० गेल्या काही वर्षांत ठाणेपल्याडहून मुंबईकडे अप मार्गावर जशी प्रवासी संख्या वाढली, तितकीच प्रवासी संख्या डाऊन मार्गावरही वाढली. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, शहाड, आसनगांव या भागातील औद्योगिक वसाहती विस्तारल्या. येथील नागरी वस्त्या वाढल्या. विविध महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे कोणत्याही वेळच्या अप व डाऊन दोन्ही दिशेच्या गाडय़ांमध्ये गर्दी होऊ लागली. आता सकाळ-संध्याकाळच्या पीकअवरमध्ये डाऊन मार्गावरील कर्जत गाडी पकडताना अंबरनाथ स्थानकातील प्रवाशांनाही बरीच कसरत करावी लागते. प्रवासी संघटनेने सातत्याने रेल्वे प्रशासनास या वास्तवाची जाणीव करून दिली आहे. तरीही प्रशासनाकडून त्याची अद्याप दखल घेतली गेली नाही.
० मुंबईहून रात्री एक वाजता शेवटची कर्जत लोकल असली तरी कर्जतहून मुंबईकडे जाणारी शेवटची लोकल मात्र १० वाजून ४० मिनिटांनी सुटते. त्यामुळे या भागातील औद्योगिक विभागात काम करणाऱ्या सेकंड शिफ्टच्या कामगारांची गैरसोय होते. कारण त्यानंतर पहाटे दोनपर्यंत मुंबईकडे येण्यासाठी गाडीच नसते. त्यामुळे नव्या वेळापत्रकात कर्जतहून किमान ठाण्यापर्यंत ११ वाजून ४० मिनिटांनी उपनगरी सेवा असावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.